पुस्तक परिचय क्रमांक:१६५ ऐक्य
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६५
पुस्तकाचे नांव-ऐक्य
लेखकाचे नांव- जगन्नाथ शिंदे
प्रकाशन-श्री समर्थ प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २०१५
पृष्ठे संख्या–२२४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--३१०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६५||पुस्तक परिचय
ऐक्य
लेखक: जगन्नाथ शिंदे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पारितोषिक विजेते शिक्षक तथा लेखक जगन्नाथ शिंदे यांचा ‘ऐक्य’ कथासंग्रह. आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं निरीक्षण करून त्यांचं शब्दचित्र रेखाटणारे लेखक.या कथासंग्रहातील कथा दैनिक ऐक्य या वृत्तपत्राच्या रविवार ‘झुंबर’पुरवणीत त्यांच्या वर्षभर कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत.त्याच कथांचे पुस्तक “ऐक्य”होय.एक छानशी अविरत आठवण रहावी असं त्यांचं लेखन आहे.
ग्रामीण परिसरातील ग्राम्य संस्कृतीचे दर्शन त्यांच्या कथांमधून ओतप्रोत भरलेले आहे.साधी सहज सुंदर काळजाला भिडणारी भाषाशैली आहे.आपल्या मनोगतात ते मनमोकळेपणाने ते वाचक रसिकांशी हितगुज साधतात.
लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या कथा वाचून अनेक वृत्तपत्र वाचकांनी त्यांच्याशी पत्र लिहून फोनवरून संपर्क साधून प्रतिक्रिया अन् अभिप्राय दिलखुलासपणे दिलेला आहे.पाहिलेली,अनुभवलेली आणि साथसोबत केलेल्या माणसांतच कथेचे बीज आहे.
कथा वाचताना वाचक रसिक कथेतील माणसं पात्रं शोधतात.यातच कथेची लोकप्रियता दडलेली आहे. त्यांना माणसं वाचण्याचा छंद जडला आहे.कथा मनात रुजते.अन् मग लिहिण्याची उर्मी निर्माण होते.या छंदातूनच त्यांनी नाटक कादंबरी आणि कथासंग्रहातील मेजवानी वाचक रसिकांना दिली आहे.
दैनिक ऐक्य वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक
वासुदेव कुलकर्णी यांनी’काळ्या मातीशी इमान’या लेखात कथासंग्रहाची खासियत व्यक्त केली आहे. त्यांच्या कथा गोष्टी वाचल्यानंतर काळजाला भिडतात.विचार मंथन करायला लावतात.अनेक कथातील आशयगर्भता संपादकांनी समर्पक आणि यथार्थ शब्दांत मांडली आहे.
घटना,प्रसंग,व्यक्ती आणि परिसराचे वर्णन मनाला भावते.वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. दुष्काळातील पाणवठ्याचे वर्णन तर काळजात दुखरी जखम करते.इतकं वास्तव आहे.यातील लेखातून गुजगोष्टीतून अनेक ग्रामीण व्यक्तिमत्त्वांची ओळख होते.एखादी कथा आपल्याच भागात घडली असेही वाटतं.
या पुस्तकात चाळीस घटनांचा खजिना आपणाला ‘ऐक्य’कथासंग्रहातून रसग्रहण करायला आहे.सर्वच कथांचे भावस्पर्शी शब्दचित्र रेखाटले आहे.कारण या कथा वास्तव आहेत.त्या वाचताना मनात चिंतन आणि मनन सुरू होते.माणसामाणसातील ऐक्य म्हणजे काय?हे पहिल्याच कथेतून व्यक्त केले आहे.मुस्लिम धर्मिय व्यक्तीने एका मुलीचा सांभाळ करुन तिचं लग्न तिच्या इच्छेने हिंदू धर्मिय मुलांशी केलं. याचा उलगडा ‘ऐक्य’कथेत मांडला आहे.
हिरा कथेतून धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून जिल्ह्यात प्रथम आलेली म्हणून गावाने सत्कार समारंभ आयोजित केलेला असतो.त्यावेळी ती यशाचे श्रेय आईला देते.पण आई वेळेत पोहचत नाही म्हणून ती सत्कार स्विकारत नाही.अशी भावस्पर्शी डोळे पाणावणारी कथा’हिरा’.
आईने काबाडकष्ट करून शिकवलेला मुलगा शहरात नोकरी करत असतो.तेंव्हा तो शेतजमीनीत हिस्सा मागून तो विकतो.आईच्या मयतालाही वेळेत येत नाही.याचा त्याला पश्चात्ताप होतो.ती कथा ‘महापाप’.गावच्या सुताराला वाळीत टाकल्यावर त्याला कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते ती गोष्ट ‘वाळीत’
माणसाला सगळ्यात प्रिय पैसा आहे. एखाद्या गोष्टीचं खूळ डोक्यात बसलं की सतत ते मिळविण्यासाठी विचारचक्र सतत फिरत असते.ती पैश्याची गोष्ट ‘पैसाच पैसा.’ प्रेमात पडायला काळवेळ नसते. प्रेमाला उपमा नाही.प्रेमाची किमया ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं.’या कथेत मांडले आहे.
अंधश्रद्धेचा पगडा अजूनही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्या पायी एका शिक्षकाचा मृत्यू कसा झाला.याचा उलगडा करणारी ‘वाईट वंगाळ’कथा.मनाला भावणारी कथा ‘माणुसकी’तर पुर्वीच्या आणि आत्ताच्या गावजत्रेचा लेखाजोखा ‘मला बी जत्रला’या कथेत रंगतदार शब्दात मांडला आहे.
हल्ली लग्न वेळेत न लागता, स्वागत समारंभच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांचा मानसन्मान करण्यातच धन्यता मानली जाते.लग्नात ऐश्वर्याचा बडेजाव दाखवला जातो.शाही सोहळा संपन्न होतो.त्यातील निवेदक तर वधू,वर,आणि त्यांच्या कुटूंबियांची ओळख करून देताना अनेक उपमा आणि रुपक वापरून आणि राजकीय नेते मंडळींना विशेषणे लावून मानमरातब केलं जातं.त्याग कथा नात्यांचे सर्व्हिसिंग करणारी आहे.सासऱ्यांच्या उतारवयात संशयकल्लोळ करणारी सून. पण जेव्हा सत्य समजतं त्यावेळी तेंव्हा मातेला कडकडून मिठी मारणारी सून आणि पुत्र.याची ‘त्याग’कथा.
अपघातग्रस्त कुटुंबाला मदत करुन माणुसकी दाखवणारे पितापुत्र कुठं आणि त्याच अपघातग्रस्त माणसाच्या मेडिकलच्या दुकानात दीनपणाने औषधे देण्याची विनंती करुन उद्या तुमचे पैसे देईन नाहीतर गहाण राहिन असा शब्द देणारे आजोबा कुठे…तेच आजोबा अपघातातील जखमींना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.ती ‘माणुसकी’कथा काळजात घर करते.
अतिशय भावस्पर्शी कथांचे शब्दचित्र लेखक जगन्नाथ शिंदे यांनी रेखाटले आहे.
त्यांच्या लेखणीस सलाम…
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Wonderful description
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete