पुस्तक परिचय क्रमांक:१७५ तारांगण





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७५
पुस्तकाचे नांव-तारांगण
लेखकाचे नांव- सुरेश द्वादशीवार 
 प्रकाशन-साधना प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती 
१४फेब्रुवारी २०१२
पृष्ठे संख्या–२२०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह 
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७५||पुस्तक परिचय 
             तारांगण 
        लेखक: सुरेश द्वादशीवार 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वर्णन करावयाच्या व्यक्तीला आपल्या व्यक्तीमत्त्वापासून तटस्थपणे दूर राखणे आणि त्याचे यथातथ्य व वाचकाला भावेल असे वर्णन करणे ज्यांना जमले असे लेखक मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत.त्या परीघातील एक पत्रकार संपादक मुलाखतकार सुरेश द्वादशीवार यांचे व्यक्तीचित्रणं असलेलं पुस्तक ‘तारांगण’.यापूर्वी‘साधना’ साप्ताहिकातून यातील लेख प्रसिद्ध झाले आहेत.“ही नुसती व्यक्तीचित्रे नसून त्यापलीकडे जाऊन अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आणि अगोदर हाती आलेल्या काही उत्तरांविषयी संशय उत्पन्न करणारी चित्रणे असल्याचा अभिप्राय” अनेकांनी कळवला असल्याचे मनोगतात नमूद केले आहे.तारांगणात सोळा व्यक्तिरेखांपैकी एखादा अपवाद वगळता लेखकांना सर्वांना जवळून पाहता आले,संभाषण करण्याची संधी मिळाली आणि अनुभवण्याचे भाग्य लाभले आहे.
तारांगण लेखमालिकेत व्यक्तिचे अंतरंग लेखक तथा पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी उलगडून दाखविले आहेत.कोणाची प्रतिभा वेड लावते. कोणाचे ज्ञान आदर उभा करते. कोणाची वाणी, तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते आणि या साऱ्याच गोष्टी एकत्र असतील, तर त्यांतून उभे होणारे व्यक्तिमत्व एकाच वेळी आदरा एवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्व सहवासाने वा योगायोगाने जवळचे असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते.असे एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचे म्हणणे आहे. आपल्या जवळच्या आणि दूरच्या स्नेही जणांना अशा उंचीचा अनुभव देणारे तारांगण हे व्यक्तिमत्त्वांनी भरलेलं,भारलेलं भारदस्त असं ‘तारांगण’ आहे.यामध्ये मानवतेसाठी अन् समाजासाठी झटलेल्या मान्यवर समाजधुरंधर, समाजसेवक,साहित्यिक,सांगितीक कलाकारांचाही समावेश आहे.
हैदराबादच्या मुक्तीसंग्रामात एका हाती शस्त्र तर दुसऱ्या हाती शीर घेऊन लढलेले लढवय्ये क्रांतिकारक,राज्यशास्त्राचे प्राध्यापक, मराठवाड्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संपादक चोखंदळ रसिक वाचक ‘अनंत भालेराव’ याचं सगळं अफाट सगळी क्रिया-प्रतिक्रिया गडगडाटाची कौतुक धबधब्यासारखे आणि टीका अण्वस्त्रांसारखी.
   माणसं शोधणं, निवडणं, जोडणं अन् त्यांचे कर्तृत्व खुलवणं-फुलवणं हा विशेष गुण असणारे साहित्यिक ‘यदुनाथ थत्ते’ यांचं व्यक्तिचित्रण फारच सुंदर उदाहरण आणि दाखले देऊन गुंफले आहे. त्यांचे लहान मुलांना तसेच विचारवंतांना मार्गदर्शन पडेल असं लेखन केलेले आहे.
   नरहर कुरुंदकर यांच्यावरील लेखात प्रारंभीच्या कोटेशनमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे कोंदण अतिशय समर्पक आहे.ते म्हणतात की,“आपल्यापैकी कोणीही अध्ययन व प्रयत्नाने स्वतःची समज दिग्गज विद्याप्रचुर व्यक्तिंसारखी संवर्धित करु शकतो.”प्रत्येक समस्येचे मूळ तपासून पाहणे आणि परंपरेने दिलेल्या उत्तरापेक्षा नव्या आणि सामान्यांना सहज पटणाऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबरदस्त होती.जर्नेलसिंग भिन्द्रानवाले यांच्या लेखातून  लेखकांनी घेतलेल्या मुलाखतीतून वेगळीच ओळख होते.
कविता अन् गझलेत रममाण होणारे सुरेश भट यांच्या कलाकारीची मैफल छानच शब्दात रेखाटली आहे.कवितेनेच जगवलं, आनंदला, बेहोश केलं आणि दु:खही दिलं अशी ओळख कवीवर्य गझलकार सुरेश भट यांची केली आहे.
माझिया गीतांत वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळलेल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे!!
        --कवीवर्य गझलसम्राट सुरेश भट
त्यांच्या अंतरंगाची ओळख सोदाहरणाने दाखवून दिली आहे.ज्यांच्या श्वासाश्वासात आणि रोमारोमांत गझल आहे.ते गझल जगले.गझल हाच त्यांचा जीवनाधार होता.
  ‘तारकेश्वरी सिन्हा’ तडाखेबंद संसदपटू म्हणून ख्याती असलेल्या लोकप्रिय खासदार यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.ऐन तारुण्यात संसदेएवढाच देश गाजवणारी खासदार,यूनोच्या व्यासपीठावरुन भारताची बाजू जगासमोर मांडणारी प्रभावी महिला.राजकारणात एक वळण चुकीचे घेतले अन् तेवढ्या खातर पडद्याआड आणि स्मृतीआड कशी झाली.याची माहिती या लेखातून समजते.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम चित्रकार एम.एफ .हुसेन यांचे शब्दचित्र वाचताना नवनवीन माहिती समजते.भारताचा सांस्कृतिक इतिहास एका प्रदीर्घ चित्रमालेतून साकारणारे चित्रकार तर ‘मांडूगड’ भावनिक होऊन कसा पहावा.या गडाचा इतिहास आणि भूगोल तोंडपाठ असलेले गाईड पंडित विष्णुदत्त शर्मा यांच्या वरील शब्दचित्रण वाचताना आपलं मन हळवं होतं.मांडूगडावरचा प्राचीन इतिहास ते आजतक ते अगदी बारकाईने अभ्यासपूर्वक माहिती पर्यटकांना देतात.
  वंचित निराधार कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदाचे चैतन्य फुलवविणारे बाबा आमटे.अपंगांना धडधाकट सामर्थ्य प्राप्त करून न देता त्यांच्या हाताला कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांत कार्यप्रवण करून विकासाचा मंत्र पेरतात.हे सगळं बाबा आमटे या एका माणसाचे कर्तृत्व आहे.शृंखला पायी असू दे,मी गतीचे गीत गाई 
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही…बाबांचा अनेकदा सहवास लाभलेले लेखक आहेत.मुलांसारखे त्यांनीलेखकावर प्रेम केलं आहे.बाबांच्या विविध कंगोऱ्यांना कवेत घेत,त्यांचे शब्दचित्र वेलीवरल्या फुलासारखे गंधित केले आहे.
थांबला न सूर्य कधी थांबली ना धारा आणि धुंद वादळात कोठला किनारा दुःखाच्या मुलखातील हा प्रकाशयात्री उडवित घन  निबिडातील भयान रात्री 
शापल्या शिळात प्राणी जागवित आला पांगळ्या मुठीत जिद्द जखमातुन ज्वाला आंधळेच अंतरंग आढळे न थारा 
त्यात एक तेजाचा बांधला निवारा 
 अश्रूंच्या बंडात गर्जला इशारा 
थांबला न सूर्य कधी थांबली न धारा…
….बाबा आमटे 
  कॉग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात यशस्वीपणे पार पाडून आपले स्थानमाहात्म्य सिध्दकरणारे धुरंधर राजकारणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार.वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही.त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान दैनिक मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी ते लोकमानसात उभारु शकते.
‘राम शेवाळकर ‘हे नांव महाराष्ट्राच्या मनावर कोरले आहे.आपल्या वाणीने आणि लेखणीने समस्त मराठी मुलूख जिंकून घेणारे लोकप्रिय वक्ते तथा लेखक राम शेवाळकर.गवयाच्या गळ्यातून येणाऱ्या देखण्या तानांना रसिकांनी दाद द्यावी तशी त्यांच्या व्याख्यानातील पल्लेदार वाक्यांना श्रोत्यांची दाद उठायची.याचे साक्षीदार लेखक आहेत.कोणत्याही बांधील वर्गात सामील न होता त्यातल्या प्रगतशील तत्वांना उचलून धरत त्यांच्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आदरणीय राम शेवाळकर यांनी केले.
 राजे विश्वेश्वराव परखडपणे विचार व्यक्त करणारे.जे आहे तसं.जे दिसलं तसं जे पाहिलं तसं,बेधडकपणे प्रामाणिकपणे सांगणारे.याबाबतचे अनेक किस्से आपणास या लेखात वाचायला मिळतात.
स्वतंत्र भारताताच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका या अगोदर दुसऱ्या कोणत्याही नेत्याने बजावली नव्हती.एका राष्ट्रीय नियतकालिकाने प्रमोद महाजन यांची निवड पंतप्रधानपदाचे दहा संभाव्य दावेदारात केली होती.अल्पवयात एवढी मोठी झेप त्यांना घेता आली असती.सर्वच राष्ट्रीय दिग्गज बुजुर्ग नेत्यांमध्ये सहजपणे वावरणारे नेते.बुध्दिचातुर्य, समयसूचकता व नेतृत्वगुण ठायी असलेले राष्ट्रीय नेते.
प्रमोद महाजन भाजप-शिवसेना युती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राष्ट्रीय नेतृत्व.दूरदृष्टी आणि विश्लेषणाची क्षमता, धैर्य आणि कर्तबगारी,वक्तृत्व व विद्वत्ता, उक्तीत असेल ते कृतीत आणण्याची धमक व या साऱ्यांच्या जोडीला एक देखणे आणि उमदे व्यक्तीमत्व लाभलेला मराठी तरुण महाराष्ट्राने देशाला दिला.
माणसं ओळखण्याची ताकद असणारे जनार्दन पांडुरंग यांच्या जीवनातील महत्वाचे पैलू पत्रकार तथा लेखक सुरेश द्वादशीवार यांनी उलगडून दाखवले आहेत.
अतिशय सुंदर आणि सुरेख शैलीत घटना प्रसंगाची नोंद करत उदाहरण दाखले देत‘तारांगण’ या लेखरुपी आकाशाचे लेखन केले आहे.ते वाचताना प्रत्येक  व्यक्तिचित्रातील व्यक्तिंच्या अंतरंगातील विविध पैलू समजतात.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड