काव्य पुष्प क्रमांक:२६१ मनभावना
मनभावना.
मौलिक क्षणांना टिपणं
आठवणी जपून ठेवणं
स्मृतिपटलावर गोंदणं
अन् जीवाला हळवं करणं….
रमणीय स्थळ भुलावतं
परतण्यासाठी खुणावतं
विभोर मन मागं रेंगाळतं
आठवांच्या झुल्यात झुलतं….
मन रिमझिम पावसासारखं
धरेवर हळूवारपणे झरझरतं
चित्त मोकाट वाऱ्यासारखं
वृक्षांच्या पानातून भिरभिरतं….
अंतःकरण धबधब्यासारखं
मुक्तपणे कड्यावरुन कोसळतं
अंतरयामी कृष्णढगांसारखं
स्वैरपणे आकाशातून धावतं…..
जशी धुक्याच्या पदराने
लपेटलेली डोंगररांग
लख्ख झाली प्रकाशाने
हे चंचल मनाला सांग…..
काव्य पुष्प क्रमांक:२६१
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक-५ मार्च २०२३
Comments
Post a Comment