पुस्तक परिचय क्रमांक ११९ घरभिंती
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
११९||पुस्तक परिचय
घरभिंती
लेखक: आनंद यादव
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-११९
पुस्तकाचे नांव--घरभिंती
लेखकाचे नांव- आनंद यादव
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण आॅक्टोंबर, २०१७
पृष्ठे संख्या--५४६
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र, तिसरा खंड
किंमत /स्वागत मूल्य--४८० ₹
"""""""""""""""""""""""""""""""
"मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी रसिक वाचकांवर गारुड करणारी साहित्यकृती!आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारत सदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात,यांचे वास्तवपूर्ण,भेदक दर्शन म्हणजे 'घरभिंती'ही अभिजात साहित्यकृती…. साहित्य अकादमी पुरस्कारविजेते झोंबीकार लेखक कवी आणि डॉक्टर आनंद यादव यांची कुटूंबातील सर्वांची जीवनरहाटी उलगडून दाखविणारी आत्मकथा."
"ग्रामीण समाजाच्या सर्वसामान्य स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही भावस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. दुसऱ्याचा मळा खंडाने करणाऱ्या शेतकऱ्याची कथा आणि व्यथा. जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर लेखक आनंद यादव यांनी संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा,हा घरभिंतीचा गाभा आणि त्याच परिस्थितीत केलेली साहित्य सेवा यांचे ज्वलंत चित्रण 'घरभिंती'या तृतीय आत्मचरित्राचे मनभावन शब्दात लेखकांनी वर्णन केले आहे."
लेखक प्राध्यापक झालेपासूनचा अठरा वर्षातील सन १९६१ ते १९७८या काळातील कुटुंब,नोकरी आणि साहित्य या क्षेत्रातील घडलेल्या घटनाप्रसंगांचा परामर्श या आत्म कथेत शब्दचित्र व व्यक्तीचित्रात चित्तर कथेसारखा सदतीस भागात गुंफलेला आहे.
लक्षावधी भारतीय खेड्यांतील सुशिक्षित होत असलेल्या तरुण पिढीस 'घरभिंती'हे आत्मचरित्र समर्पित केले आहे. हा भुमिपुत्रांचा हुंकार आहे.अनेक प्रतिष्ठेच्या मानसन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे. ग्रामीण खेड्यातील कष्टकरी कास्तकऱ्यांच्या व्यथा आणि कथांनी त्यांची साहित्यसेवा झाली आहे.मळ्यात जमिनीची मशागत करताना, नांगरणी, वखरणी करताना जसा फाळ खोलात लागून मेहनतीने वावार, जोमदार पिकं यायला तयार करावं लागतं. घामांचा अभिषेक काळ्या आईला घालावा लागतो.त्याचप्रमाणे साहित्याच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी ह्रदयस्पर्शी व जादुई लेखणीने अनेक साहित्य शिल्पं समृध्द केलेली आहेत. वास्तवदर्शी भावस्पर्शी लेखन शैलीमुळे कथेतील चित्रं बोलकी होतात.दृश्य व घटना प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा टाकून सिरियल मधील मालिकेप्रमाणे काळजाचा ठाव घेत राहतात.
वाचक समरस होऊन आपल्याच भुतकाळात डोकावून विचार मंथन करायला लागतो.इतकी सामर्थ्यवान साहित्यकृती असल्याने भारत सरकार ,महाराष्ट्र शासन व अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.विशेषत: 'झोंबी'या आत्मचरित्र कथा कला अकादमी पारितोषिक विजेती,तर 'हिरवं जग','खकाळ', 'गोतावळा' आणि' मातीखालची माती ' या साहित्यास महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.इतकं दर्जेदार, सृजनशील व वास्तवदर्शी लेखन आहे. वाचक पुर्ण समरस होऊन आपल्याच तंद्रीत तहानभूक विसरून वाचत राहतो. इतकं अवर्णनीय अस्सल मातीतल्या कसदार मृदेसारखं सहजप्रवाही मनाला भिडणारं अन् काळजात घर करणारं त्यांचं लेखन आहे.कुटूंबातील आई,दादा,भावंडं, बहिणी,त्यांचे नातेवाईक ,शेजारीपाजारी, मित्रपरिवार,कुटुंब आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज,महाविद्यालयीन सेवेची कसरत आणि साहित्यिमित्रा़ची मैफल आणि मळ्याच्या शेतातील पिकांचे वर्णन अप्रतिम शब्दात मांडले आहे.अनेक भावनिक प्रसंग वाचताना आपण भावूक होऊन जातो.इतकं दु:ख,सल, आर्तता, मनातील घालमेल आणि करुणा आदींनी ओतप्रत भरलेलं अस्सल मातीतलं हे अक्षरलेणं आहे.घराचे घरपण जपण्यासाठी घरातल्या भिंतींना म्हणजेच आई-वडील आणि भावंडांना एकसंघ राहण्यासाठी केलेली मिनतवारी व वेदना या आत्मकथेत पानोपानी प्रकटतात. अंगठाबहाद्दर माणसं भविष्याचा अंदाज न घेता वर्तमान काळातच मशग्गुल होऊन पोटासाठी वणवण भटकत शेतापिकात राबत असतात.त्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे भान आणि गांभीर्य या कथांमधून लक्षात येतं.
व्यक्तिंची,माणसांची व नातलगांची स्वभाववैशिष्ठ्ये घटनाप्रसंगातून आणि शब्दचित्रातून व्यक्त होतात.ती वाचताना अंतरमनाला त्यातील घटना प्रसंग भिडत जातात.
ग्रामीण मातीचा वतनवारसा आपल्या रक्ताने आणि घामाने भिजविणारा भूमिपुत्र.खुरपं आणि कुदळीने तण काढत, अहोरात्र शेतीची कामं मेहनत करून सुध्दा,मिळालेल्या वेळेचा दिवसांचा रात करुन तो शिकतो.प्रसंगी शिकवण्या घेत,फ्रीशिप मिळवत एम.ए.ची पदवी घेऊन लेखक प्राध्यापक होतात.भक्तीची माऊली पंढरपूर आणि विद्येचे माहेरघर पुणे येथील महाविद्यालयात अध्यापन करत करत स्वत:चा साहित्य क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी 'चालू जमाना' या रेडिओवरील कार्यक्रमासाठी 'स्क्रिप्ट' लेखन करतात. दिवाळी अंक व नामांकित मासिकासाठी काव्यलेखन व कथालेखन करत करत प्रसिध्दीच्या झोतात येतात.
लेखक आनंद यादव यांची कादंबरी आणि कथासंग्रह स्वरुपात प्रकाशक रसिकांच्या पसंतीची मोहर उठविण्यासाठी पुस्तके 'कर्माचा संघर्ष ग्रंथ'म्हणून प्रकाशित करतात.लेखकाला मिळालेल्या बक्षिसातून घरासाठी काय काय दिव्य गोष्टी केल्या त्याचा हा लेखाजोखा म्हणजे 'घरभिंती'.विशेषतः या आत्मचरित्रात पत्रलेखनातून लेखक आणि त्यांची बहीण भावंडे व आई- वडील मित्र एकमेकांशी व्यक्त झाले आहेत.
साहित्यातील मित्रांची बैठक व कागल व कोल्हापूरातील मित्रांच्या गप्पागोष्टी यांचं वर्णन.आई आणि लेखकांचे कागलच्या घरातील हितगुज,संभाषण..आदी घटना प्रसंग वाचताना आपल्या मनाला क्षणभर चटकाच बसतो.त्याची धग सहन न झाल्याने डोळ्यांतून अश्रू अनावर होतात. इतकं अप्रतिम वर्णन अस्सल ग्राम्य ढंगांत व बोलीत केलेले आहे. अनेक नवनवीन शब्दांची ओळख त्यांच्या लेखणीत झाली. शब्दांची पसाभरुन ओंजळ रसिकांना मंत्रमुग्ध करते.इतकं पिकासारखं जोमदार कसदार लेखन आहे.लेखक प्राध्यापक आनंद यादव घरभिंती या आत्मचरित्रात्मक कलेविषयी 'चार शब्दा'त व्यक्त होताना म्हणतात की,''माझं गावाकडचं घर उभं करताना आम्हा सर्व भावंडांची,आई- दादांची जी वाताहत झाली,परिस्थितीच्या वादळात जी पडझड झाली तिला साकार करण्याची धडपड 'घरभिंती'त सामावली आहे.मला या पडझडीत भारतीय जनसामान्यांचा सनातन आणि भीषण जीवन संघर्ष दिसतो आहे.''
यातील सर्वंच व्यक्तिचित्रे काळजात घर करतात.आई आणि दादांचं मळ्याचं सपान कधी पुरं होणार याची विवंचना आणि घरकारभारीन होण्यासाठी सततची पैसे पाठविण्याचा तगादा,मुलींच्या लग्नाची काळजी,माझ्या मुलांनी कमवून माझ्याजवळ पगारपुंजी द्यावी आणि मला सुनांनी सुखात ठेवावं.आदी स्वभावपैलुंची आर्तता आणि व्यक्तता अप्रतिम शब्दांकनात गुंफलेली आहे.तसेच दादांचे व्यक्ती वर्णन व मनभावना आणि मळेकरी बागायतदार होण्याचं सपान हेही शब्दचित्र वाचताना बापलेकाचं नातं उलगडत जातं.
अनसा,शेवंता,हिरा,धोंडूबाई,चंद्रा,सुंदरा,लक्ष्मी या बहिणींची घरातील कष्टाची कामे, लग्नासाठी होणारी धावपळ,सोयरिक पाहणी व जुळवाजुळव करायला लागलेली कसरत, लग्नसोहळा, पुन्हा नांदवण्यासाठी खाल्लेल्या खस्ता, तडजोडी वास्तवपुर्ण पध्दतीने मांडलेल्या आहेत.यातील अनसा,शेवंता,चंद्रा आणि सुंदरा याची दु:खं आणि मृत्यू आदी भाग वाचताना हळहळता वाटते.
अशिक्षित रोजगारी भाऊ शिवा,शिक्षित झालेले आप्पा व दौलत यांचं शिक्षण, नोकरी आणि काबाडकष्ट यांचे शब्दचित्रणही मनाचा ठाव घेते.तसेच लहानपणापासून मदत करणारा धाकटा मामा लिंगाप्पा,मधू सणगर, मळेकरी चौगुले व देसाई,शिर्पा,आबाजी सणगर, शाळकरी मित्र वसंत पाटील, शिक्षक प्राध्यापक पत्नी स्मिता,मुली स्वाती व किर्ती,गंगाराम कुंभार,दादांचे मित्र, सासरवाडीचे नातलग व साहित्यिक मित्रमंडळी आदी व्यक्तीचित्रे वाचताना त्याकाळातील राहणीमान आणि त्यांच्यातील स्वभावगुण व अंतरंगाचा ढंग लक्षात राहतात.लेखकांचा पंढरपूर, पुणे ते कागल, मुंबई प्रवासातील मनातील तडफड व उलघालीतून बहिणभावंडांचे आई-दादांचे प्रेम दिसून येते.लेखनातील गोडवा,ऋजुता आणि निर्मळता अनेक घटनाप्रसंगातून दिसून येते.नेमकं आणि वेधक शब्दात आत्मचरित्र गुंफलेले आहे.
आयुष्याचा झोंबी,नांगरणी ते 'घरभिंती' असा प्रवासपट प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभे-आडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खऱ्या छेदाभेदासकट विस्तृतपणे साहित्यस्वरुपात साकार झाले आहेत.त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते.
अतिशय दर्जेदार सृजनशील ग्रामीण साहित्य वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.सर्वंच साहित्यसंपदा ग्रामीण जीवनोन्नती आणि शेती,शेतकरी आणि गावं अधोरेखित करणारी आहे. उच्चशिक्षितशेतकरी भुमिपुत्राची नाळ मातीशीच जोडली आहे.त्यांची साहित्यकृती सुध्दा माती आणि नात्याशी इमान राखणारी समृध्द लेखणी आहे. त्यांच्या लेखणीस मानाचा मुजरा आणि त्रिवार वंदन!!!! अप्रतिम बहुजन समाजातील शेतकरी मुलाची उच्चशिक्षणासाठीची धडपड आणि कुटुंब काफिला सांभाळण्याची कसरत असणारं अक्षरशिल्प 'घरभिंती' ……
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment