काव्य पुष्प क्रमांक:२६२ निसर्गाचा रंगोत्सव
निसर्गाचा रंगोत्सव
पळसाच्या फुलांचा शेंदरी रंग
आसमंती गुलाल उधळीत येतो
पांगाऱ्याचा पसरलेला भगवारंग
चमकदार ज्योतींचे तुरे लेवतो ||
काटेसावरीचा पिवळा गुलाबी रंग
ठिपक्यांची रांगोळी रेखाटत असतो
निलमोहराचा गर्द निळसर मनरंग
आकाशात उठावदार नक्षी कोरतो ||
आंब्याचा पिवळसर मोहोराचा रंग
परिसर गंधित करायला धजावतो
देवचाफ्याचा सफेद पिवळसर रंग
भुईवरी फुलांचा सडा अंथरत राहतो||
मोगऱ्याच्या फुलांचा पांढरा रंग
गजरा करायला उतावळा होतो
रानातल्या हळदीचा पिवळा रंग
लगीन सराईचं आवातनं देतो ||
निसर्गातील मन भुरळणारी वृक्षवल्ली
दिमाखात जादुई रंगमहाल उभारतात
पक्ष्यांच्या किलबिलाटांच्या सूरतालात
पानेफुलेफळांचा रंगोत्सव साकारतात||
रानावनातल्या पर्णिका हिरव्यागार
पांथस्थाला बहाल करतात गारवा
सावलीत रंग उडवती मित्रपरिवार
निसर्गाचा रंगोत्सव नजरेत भरवा||
सौंदर्यवान निसर्गाची रंगावली
माणुसकीच्या नात्यात बहरुया
परोपकारी आनंदानुभव देणारी
वने वृक्षसंपादनाने जतन करुया||
काव्य पुष्प क्रमांक:२६२
श्री.रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक:७ मार्च २०२३
Comments
Post a Comment