मलई कुल्फी



लहानपणीचा आवडता पदार्थ  
    मलईऽऽऽकुल्फी ''गारेगारऽऽऽ गार है, गोड है , मलईऽऽऽ कुल्फी'',"ग्वाड है गार है|ग्वाड है गार है|"अशी आरोळी ऐन दुपारच्या वक्ताला देत खेड्यातील गल्लीबोळातून एका हाताने घंटानाद करीत कुल्फी वाल्याची स्वारी आलेली दिसली की, हातातले काम सोडुन,खेळ मध्येच थांबवून आम्हा मुलांचा घोळका त्याच्याकडे धावत सुटायचा.तो आमच्या ओळखीचा,नेहमीची मोक्याची जागा आल्यावर तो तिथं थांबायचा.आणि नेहमी प्रमाणे मागोमाग येणाऱ्या मुलांना डोक्यावरील आईस्क्रीमची पाटी उतरायला हात लावायला सांगायचा. मग मुलं बिगीबिगी त्यापाटीला हात लावून ती पाटी खाली घ्यायचे.अन् "आधी मला मला द्या मला द्या,"असं म्हणून हातातलं चाराणे आठाण्याचं नाणं दाखवत अधीरतेने मुलं गलका करायची. त्याच्या भोवती गराडा घालायची.मग तो त्या मुलांना गमतीदार बोलून गप बसायला सांगायचा..
 डब्याच्या सभोवती खोचलेल्या वडाच्या पानांतून एक पान काढून तो पुसायचा.तदनंतर थंडगार कुल्फीच्या पत्र्याच्या डब्याचे झाकण उघडून स्टीलच्या चमच्याने दोनतीन चमचे थंडगार कुल्फी वडाच्या पानावर घालून मग मुलांना द्यायचा. आम्ही मुलं वडाच्या पानावरील कुल्फी चाखतमाखत खायचो. कोणी बोटावर उलीशी कुल्फी घेऊन चाखायचे तर कुणी जिभेने चाटायचे. अस्सल जीभेवर रेंगाळत राहणारी ती अवीट चव असायची. कुल्फी खाल्ल्यावर मुलं शांत व्हायची. त्यातल्या काहींकडे कुल्फी घ्यायला पैसे नसायचे. ती मुलं आशाळभूतपणे एकदा कुल्फीवाल्याकडे तर एकदा दोस्तांकडे बघायची.त्यांना आशा वाटायची, कोणीतरी आपल्याला बोटभर तरी चाटायला देईल. नाहीतर जाताना कुल्फीवाला चमच्याभर हातावर टेकविल.पानावरली कुल्फी सगळ्यांचीच आवडती होती. उन्हाळ्यातल्या उकाड्याने हैराण होणाऱ्या दिवसात जिभेला आणि जीवाला गारवा देणारी चव होती. कुल्फीवाल्याने दुध, साखर आणि क्रीम बर्फात गोठवून स्वतःतयार केलेली असायची. 
  कालौघात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करायला व्यावसायिकांची सुरुवात झाली.पानाची जागा अगोदर छोट्या कागदी वाटीने तर काही वर्षांनी कुरकुरीत शंकूच्या आकाराच्या कोनाने घेतली.तर मध्येच गारवा देणारी, गोडगोड लागणारी पेप्सी; प्लॅस्टिकच्या पिशवीतली आली.तदनंतर कुल्फीच्या भांड्याची जागा हातगाडीने घेतली. टान् टान् टान् घंटा वाजवित हातगाडी गावोगावी फिरु लागली.टीनच्या वेगवेगळ्या कोनासारख्या आकारात कुल्फी गाडीतच तयार होऊ लागली. कळका(बांबू)च्या कांडीला लगडलेली घट्ट कुल्फी बर्फाच्या शीतलतेने तयार होऊ लागली.अन् पानावरची आता कुल्फी कांडीला लगडली.
कारखान्यात बर्फाचे लाल पिवळ्या अन् पांढऱ्या रंगाचे गारेगार (गारीगार) तयार होऊ लागले.ते पत्र्याच्या डब्यात सायकल वरून गावोगावी फिरून विकले जाऊ लागले. बर्फाचे गारीगार तोंडातून हातावरुन ओघळत ओघळत चाखले जायचे.तर कुणी हळूच एका बाजूचा दाताने तुकडा पाडून फोडून खाऊ लागले.ते गारीगार चोखले की जीभ लालभडक होऊन जायची.तदनंतर त्यांच्या जोडीला पूरक म्हणून बर्फाचा गोळा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत पेप्सी येऊ लागली.
  आपला गोळा बनवेपर्यंत नुसता बर्फ चोखण्यातही मजा वाटायची. चरक्यावर बर्फाची लादी किसून  किसून, किस मापाच्या काचेच्या ग्लासात टाकून किस हाताने दाबून त्यात काठी खुपसून पांढरा गोळा तयार मग गोळ्यावर बाटलीतले मागणीप्रमाणे गोडसरबत शिंपडले की रंगीत गोळा तयार.तो तयार होईपर्यंत तोंडाला पाणी सुटलेलं असायचं. मग तो गोड सरबताने ओसंडून वाहणारा गोळा हातात घेऊन तोंडाचा चंबू करून जोरात ओढून घ्यायचा आणि मिटक्या मारीत चुसकी मारायची.खट्टामिट्टा,चॉकलेट,ऑरेंज आदी प्रकारचे गोळे असायचे.पेप्सी तर फारच स्वस्त व मस्त, आठाणे नाहीतर रुपायात मिळायची. काहीवेळा तोच गोळा प्लॅस्टिकच्या कपात घेऊन चमच्याने खायचा. कालांतराने शहरातील नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम बाजारात दाखल झाले होते.त्याचेही वारे चारचाकी गाडीतून वाहू लागले. तदनंतर प्लॅस्टिकच्या कपातील  'आईस्क्रीम' आणि पेप्सी फ्रीजमुळे गावोगावच्या दुकानातही आता सहज उपलब्ध होतात.गावोगावच्या यात्रेजत्रेत तर गारीगार,आईस्क्रीम कप,कोन, कुल्फी आदी जिन्नसांची हातगाडी आणि चारचाकी वाहने गर्दी करतात. सगळ्यात जास्त याच पदार्थांचा खप होऊ लागला आहे.आता तर कोणत्याही सिझनला आईस्क्रीम पॉर्लरमध्ये विविध प्रकारच्या फ्लेवरची तर  रेलचेल असते.आपण हौसेने मनसोक्त आईस्क्रीम खातो. वेगवेगळ्या नावानेही ती लोकप्रिय झाली आहे. 
 वडाच्या पानावरील बोटावर घेऊन चाखत मागत खाल्लेली कुल्फीची बिनतोड चव…. हल्लीच्या विविध फ्लेवरमध्ये ब्रांडेड कंपनी मेड किंवा स्थानिक भागातील लोकप्रिय आईस्क्रीमच्या स्वरुपात उपलब्ध असते.पण कितीही व्हरायटीचं आईस्क्रीम खाल्लं तरी कुल्फीची चव कायम स्मरणात रेंगाळते….

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड