रुखवताचे उखाणे, आला आला रुखवत





   

        लग्नसोहळयातील रुखवताचे उखाणे 


आला आला रुखवत त्यात होता सातारी कंदी पेढा

विहीणबाई चला आता आम्हाला पयलं जेवायला वाढा.


आला आला रुखवत त्यात होती कुरकुरीत टोस्ट अन् खारी

विहीणीच्या नाकापेक्षा नथीचंच वजन लय भारी.


आला आला रुखवत त्यात होती स्टीलची डबी

उघडून बघितली तर आत दिसतेय आत्यासाबांची छबी


   लग्नात नवरदेवाचे आगमन,हळदी, जेवणावळी, मानपान,श्रीवंदन,मंगल सोहळा आणि आहेर झाल्यानंतर नवरीची पाठवणी करायच्या अगोदर रुखवत बघायचा कार्यक्रम असायचा. सगळी बायामाणसं (महिला) तिथं जमायची.खाद्य पदार्थांच्या दुरड्या मध्ये मांडून रुखवत सुरू होयचा.वराकडील महिलांना नवरी कडील महिला मंडळी हळदकुंकू लावून एकमेकींना रुखवताची दुरडी उघडायच्या अगोदर उखाणा घेण्याची लडिवाळपणे आग्रह करायच्या. नवरानवरी कडील विहीणीबाई, आत्या, मावश्या आणि आज्या एकमेकींना उखाण्यातून लगीनघाईचं कौतुक करीत जेवणावळीची स्तुती करीत उखाण्यातून टोमणे मारायच्या.ते एकूण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचं.'घे गं घे गं उखाणा तुला चांगला जमतो',असं लडिवाळपणे एकमेकीला फोर्स करायच्या. मग उखाण्यातून एकमेकींना चिडवायच्या. मग तेवढ्यापुरता लटका राग तोंडावर दिसायचा.त्यातलीच एखादी जाणती म्हातारी तर लांबलचक उखाणा ठसक्यात घेऊन सगळ्यांना हासवायची.तिच्या उखाण्यात निसर्गाचे, गावाचं,देवाचं,घराचं,शेतीचं,जित्राबांचं पदार्थांचे, नातलगांचे अशी वळमाळ लावलेली असायची.भारदार आवाजात माईकवरुन वर्णन करायची. ते शब्द कानावर पडल्यावर आणखी वऱ्हाडी मंडळी जमा व्हायची.उखाण्यात समर्पक शब्दांचा वापर चपखलपणे करून,यमक जुळवून त्याच्यात गेयता असायची.हे पुढील उखाणे वाचल्यावर आपल्याला समजून येते.

पाणी आणा गंगेचं, मखर बांधा भिंगाचं,

विहीण आल्या डोंगराच्या, पट्ट्या पाडा भांगाच्या, 

भांगी भरला गुलाल, नेत्री घातलं काजळ,

कुंकू लावलं कपाळभर, विहीणव्याही लोळा पलंगावर , 

 दुध प्यायला दोन म्हशी,चहा प्यायला नवी कपबशी 

दोन म्हशीवर दोन हेलगं, नऊ मण शेतात पिकलं हुलगं, 

शेतात दहा मण झालं गहू, त्याचे जेवायला प्रकार केले बहू, 

व्याह्याला विहीणीला घाला पोटभर जेऊ आणि आनंदानं उद्या वर्‍हाड लावून देऊ.

रुखवताचे उखाणे म्हणायला दोन्हीकडच्या महिला फार तयारीच्या असतं.लग्नातील गमतीजमती,मानपान, घडामोडी, चांगल्या बाबींची रचना उखाण्यात केलेली असते. स्पष्टपणे न सांगता उखाण्यातून एकमेकिंची मिश्किलपणे गंमत करत, चिमटे काढणं चाललेलं असतं.उखाणे घेऊन झाल्यानंतर रुखवतावर वराकडील मंडळी साडीचोळीचा मान ठेवून,तो भरायला सुरुवात करतात.तदनंतर वऱ्हाडी मंडळी रुखवत मंडपातून जान्हवस घरापर्यंत वाजतगाजत नाचवत घेऊन जायची. लोकप्रिय गाण्याच्या तालावर सनई ढोलकीच्या ठेक्यावर हौशी कुलवऱ्या कुलवरे,मित्रमंडळी ठेका धरुन नाचत.तर काही ठिकाणी टेपरेकॉर्डवरील उडत्या चालीच्या गाण्यावर बेहोश होऊन झिंगाट करत.काही गावातील लग्नामध्ये ढोल लेझीमचाही डाव घुमायचा.मग सगळी वऱ्हाडी बघायला जमायची.

रुखवत हे नवरीला सासरी पाठवणी करताना देण्याची पारंपारिक प्रथा आहे. तसेच वरपक्षाला खाद्यपदार्थ व इतर साहित्य भेट म्हणून दिली जाते. लगीन मंडपात किंवा कार्यालयात सर्वांची नजर जाईल अशा एका कोपऱ्यात तो मांडलेला असतो.तिच्या नवीन संसाराला उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी वस्तू, फर्निचर,घर सजावटीच्या वस्तू,भांडी,धान्य, कडधान्य, किराणा जिन्नस,खाद्यपदार्थ सजवून ठेवलेले असतात.विशेषत:हे खाद्यपदार्थ दुरडीत भरलेलं असतं. दुरडीला वरुन रंगीत कागद पारदर्शक असायचा.त्यामुळे आतील जिन्नस ओळखू यायचा.रुखवत म्हणजे नवरीला निरोप देताना,बिदाई करताना तिच्या संगे,आपल्या घरातील काही खास वस्तू तिच्या दिल्या जातात.त्या वस्तूंशी तिचे भावनिक नाते असते.घरातल्या अतिशय जवळच्या नातेवाईकांची आठवण तिला यावी.या खास उद्देशाने नवरीची मावशी,आत्या, काकी,वहिनी, बहिणी आणि मैत्रिणींनी एकत्र बसून यातील खाद्यपदार्थ व सजावटीचे साहित्य बनविलेले असत. 

पुर्वीच्या काळी दळणवळणाची साधने मर्यादीत होती. हल्लीच्या जमान्यासारखा तिचा माहेराशी त्याकाळात सतत संपर्क नसायचा.त्यामुळे तिच्या संसाराला  हमखास उपयोगी पडेल असा रुखवत करून दिला जायचा.झट मंगणी, पट शादी होणाऱ्या फास्ट जमान्यात काळाच्या ओघात यातील बऱ्याच प्रथा मागं पडून त्यांच्या जागी नवीन प्रथा इव्हेंट म्हणून समाविष्ट होतायत.रुखवतातील बऱ्याच वस्तू काळाच्या ओघात रेडिमेड रुपात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हसतखेळत होममेड रुखवताचं स्वरूप बदललं.विहीणींचं आणि नातेवाईकांचे रुखवतात उखाणे घेणं.रुसणं फुगणं अन् उखाण्यातून बोलणं आता मागे पडतंय.

  

फोटो फीचर्स सौजन्य...गुगल


उखाणे संदर्भ-- ऐकलेले,मौखिक आणि संकलित







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड