ओझर्डे गावची शिमग्याची सोंगं
ओझर्डे गावची शिमग्याची सोंगं
फाल्गुन महिना सुरू झाला की निसर्गाचे रुपडे बदलत जातं.काही झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटते. पळस, सुईर, पांगाऱ्याच्या फुलांचे सौंदर्य लाल गुलाब शेंदरी आणि पिवळ्या रंगात खुलून दिसतं तर उन्हात चमकदारपणे नजर वेधून घेते. क्षणभर तरी ही फुलांची वृक्षरंगावली आपल्याला रंगाविष्कारातील साज बघायला भुरळ घालते. वेगळीच नजाकत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नयनांस आनंद वाटीत राहतात.तर शेतीच्या सराईची धांदल उडालेली असायची.अश्याच वेळेला आनंदाची धमाल उडवून द्यायला, शिमग्याचा सण आलेला असतो.शिमगा म्हणजे धमाल करामती करायला भाग पाडणारा दिवस….
शाळा सुटल्यावर आळीतली समदी बारकीसारखी पोरंठोरं सगळ्यांच्या घरुन शेणकुटं गोवऱ्या गोळा करून आणायला घरोघरी फिरायची.काही घरातली समंजस माणसं चारपाच थापीव शेणी लगेच हातात द्यायच्या."होळीला गोवऱ्या द्या होळीला गोवऱ्या द्या,"असा गलका केला की, काही माणसं नाही नाही म्हणत रानातून आणलेली खांडखुंड अंगणात रचून ठेवलेली घेऊन जायला सांगायच्या. काहींच्यात शेणी नसल्याने चुलीसाठी आणलेल्या ढपल्या द्यायची.तर काहीजणं हातचलाखी करत कुणाच्या तरी परड्यातून शेणकुटांवर डल्ला मारायची.तर काहीजणं कडुसं पडायच्या वेळी ओढ्याच्या काठावरील डगरीवर थापलेल्या गवऱ्यांवर धाड टाकून हाताला लागतील तेवढ्या गोवऱ्या पळवायचे.त्यात काहीवेळा ओल्याही शेणी असायच्या. चांगली दोनतीन पोती शेणकुटांची बेजमी व्हायची…..
मानकरी आणि माहितगार माणसं होळी रचायचे.
तो सरजाम गोळा करतानाच आज स्वांग कुणाला द्यायचं याचीही थोराडपोरं चाचपणी करायची,गुपचूप ठरवायची.
आमच्या गावची सोंगं शिमग्याच्या सणापासून सुरू व्हायची.ती पुढे पाच दिवस रंगपंचमीच्या सणापर्यंत (पहाटे) चालायची.दररोज रात्री वेगवेगळी सोंगं निघायची.अगोदरची दोनतीन दिवस लहान मुलं सोंगं काढतात.शिमग्याची सोंगं म्हणजे पौराणिक कथामधील विशेष लोकप्रिय पात्र, ऐतिहासिक काळातील शूरवीर मावळे आणि भटजीबुवांचं. लाकडापासून चाकाचा गाडा नाहीतर लहान मुलांच्या ट्रायसिकलवर आम्ही सोंगं काढायचो. काही वेळा पायदळी सोंगं निघायची…
काहीवेळाने चांगलं कडुसं पडून अंधार दाटलेल्या वेळी, होळी पेटल्यावर तिच्या भोवती गोलाकार फिरत फिरत तोंडावर हात मारत बोंब ठोकायची आणि गलका करायचा. वर्षभराची बोंबाबोंब करायचा शिमग्याचा सण.तदनंतर मग ज्याला पात्र द्यायचं त्याला कुणाच्या तरी घरात कंदिलाच्या नाहीतर दिव्याच्या उजेडात खडू,तोंडाला लावणी पावडर, कोळसा आणि रंगपेटीतल्या रंगांनं रंगवायचं. कुणाच्या तरी घरुन आणलेलं आज्याचं धोतर येईल तसं त्यांना नेसवायचं. इतर पात्रांसाठी लागणारी कपडे,टोप,माळा ही सामग्री गोळा करून आणलेली असायची. सोंगाचं गाडं डहाळ्या नाहीतर पडदे बांधून आमच्यातील जाणत्या पोरांनी बांधून तयार केलेल्या असायच्या.पात्रं रंगवून झाल्यावर गाड्यांवर बसवायचं. सायकलच्या टायरचा पेटवलेला 'टेंबा' म्हणून इतरांना स्वांग दिसण्यासाठी एकदोघं धरायचे.फुटकं डालड्याचं नाहीतर तेलाचं फुटकं टिनचं डबं वाजवत सोंगांची गावातून मिरवणूक निघायची.समदी पोरं गलका करत ओरडायची.उत्साहात काहीजण पुढं नाचायची.एक वेगळीच मजा वाटायची.आत्ता त्या दिवसाच्या केलेल्या करामतींची आठवण झाली की मनसोक्त हसायला येते. सोंगं मिरवणूक पाटावरुन पेठेतून(गांधी चौक)पद्मावतीच्या देवळाकडे जायची.गावदेवीला नमस्कार करून पुढे महात्मा फुले चौकातून फिरुन परत मारुतीच्या मंदिराकडून स्टॅण्डवर आणि मग आमच्या आळीत यायची.तवर आठसाडेआठ वाजलेले असायचे.घरचे जेवायला हाक मारायचे.पण आमचा मनसुबा वेगळाच असायचा.शिमग्याची सोंगं आळीत पोचली की बरीच पोरं पुरणपोळी हादडायला घराकडे पसार व्हायची.होळी रे होळी पुरणाची पोळी…… …दे दान सुटे गिराण….असं काहीतरी म्हणत म्हणत होळीच्या ठिकाणी उद्या कोणकोणती सोंगं काढायची हे गुपचूप ठरवलं जायचं. आणि पुन्हा एकदा होळीभोवती फेर धरून,बोंब ठोकून घराकडे पसार व्हायचे..
काळानुसार सोंगं उत्सवात बराच बदल झालेला दिसून येतो. ढोल ताशे वाजवत, लाईटिंगचा उपयोग करत सायकलच्या चाकाची गाडी बनवून ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक देखावेही सादर होऊ लागले आहेत.ही सोंगं आमच्या बालपणीच्या काळातील शिमग्याच्या सोंगांची आठवण करून देतात...
Comments
Post a Comment