Posts

Showing posts from February, 2021

फुलांनी बहरलेली काटेसावर काव्य पुष्प-२०७

Image
फुलांनी बहरली काटेसावर   निळ्या आकाशी रुप गोजिरे फांद्यांना लगडली शेंदरी झुंबरे अंगाखांद्यावर फुलले फुलोरे  झाडाचे रुप नव्याढंगात साजिरे| उमलते फुल प्रतिक प्रितीचं   गुलाबी ढंगात सजण्याचं नवलाईचं रुप काटेसावरीचं दुसऱ्यांना हर्ष वाटण्याचं| पंचकार खुलली पाकळ्यांची गोलाकार तुराई पुंकेसरांची काळसर ठिपकं परागाची  फांद्यावर नक्षी  रंगमाळेची| मकरंद शोषायला भुंगे भ्रमरतात  मकरंद खायला पक्षी झेपावतात  मकरंद चाखायला मक्षिका आकर्षितात  अनामिक वासाने परिसर गंधाळतात | फुलांना गुलाबी रंगात खुलविते वृक्षाचे सौंदर्य मनाला भुलविते निसर्गाची रंगपंचमी आरंभिते  रंगउधळण आविष्कारात सजते | निसर्गाची रंगपंचमी गुलाबी शेंदरी रंगोत्सव जुनी पानगळ होऊनी आरंभिला झुंबरं उत्सव❗🍁 श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

आनंदाची सांजवेळ काव्य पुष्प- २०६

Image
आनंदाची सांजवेळ सांजवेळी होतोय दिवाकराचा अस्त जलाशयाचा नजारा फुललाय मस्त  दिवसभराच्या कामात असता व्यस्त छबी टिपण्यात रमलाय  दोस्त | निसर्ग दृश्य मोहिनी घालते  आनंदाला उधाण येते  नजरभरी सिनरी टिपते सांज सेलिब्रिटी बनते | मंदावतात प्रकाश किरणं  धूसरणाऱ्या छटेला बघणं सेल्फित छबी चितारणं नयनांची तृप्तता करणं| आभाळाचं पाण्यासंग नांदणं रंगछटेत मनसोक्त तरंगणं  पर्यटकांना उल्हासित करणं आनंदाचं चांदणं फुलवणं  | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

नक्षीदार वेली काव्य पुष्प २०५

Image
नक्षीदार वेली  नक्षीदार बहारदार वेली वृक्षाच्या संगतीनं गुंतली  जाळीदार नक्षीत सजली  पाहूनी नेत्रपल्लवी हरखली| मनाला भुरळ पाडली पक्ष्यांची कोलाहल गुंजली  वाऱ्याने बासरी वाजवली मनाला मोहिनी घातली| मनात विचारांचा गुंता असाच वेटोळे घालतो  सतत सफलतेची चिंता  मनाला आठवण देतो| गोलाईच्या जाळीसारखे  विचारचक्र सुरू असते  निसर्गरम्य सौंदर्य पाहण्याने  क्षणभरी चित्त एकाग्र होते | मांडव  झाडांच्या फांद्यांचा  झालर लतावेलीच्या जाळीची खांब  झाडाच्या खोडाचे पायघडी पालापाचोळ्याची | जंगलवाटेने भटकताना  जैवविविधता दृष्टीला पडतात  वृक्षवेलींची बहारदार रुपं   नजराणा नजरभेट करतात| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

माझी मायबोली मराठी २०४

Image
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ माझी मायबोली मराठी भाषा  माझा श्र्वास मराठी  माझा ध्यास मराठी  माझी चेतना मराठी  माझी प्रेरणा मराठी | कथा कवितांचे माहेरघर  नाटक कादंबरीच विश्वभर  आजीच्या गोष्टींचे माजघर आरत्या श्लोकांचे  देवघर | लोकगीतांची खाण मराठी  पोवाड्याची जान मराठी  भावगीतांची पवित्रता मराठी अभंगवाणी संकिर्तन मराठी | मातृभाषेतून ज्ञान मनाला भिडते ह्दयातले ओठांवर उमटते  विचारांना चालना मिळते  अभिरुचीने अभिव्यक्ती होते |

खळ्यातली मळणी काव्य पुष्प २०३

Image
खळ्यातली मळणी  शेतीची पारंपरिक वहिवाट यंत्रामुळं दिसेनासी झाली  अनवट वाटेच्या खळ्यानं    गावची आठवण तराळली| शेतीच्या वहिवाटीची पेरणी  एका छायाचित्राने बिंबवली  काबाडकष्ट करणाऱ्याच्या रानी शेतीची सुगी अधोरेखित केली | गव्हाची मळणी धरली  एकाएकी हवा बदलली  वातावरण झालं ढगाळी थेंब टपकू लागलं अवकाळी| खळ्यात पेंढ्या झाकण्याची  उडाली धांदल शेतकऱ्याची  पोटापुरतं धान झोळीत टाका  कष्टाच्या भाकरीची आब राखा | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई छायाचित्र साभार- अॅग्रोवन सकाळ

भजन काव्य पुष्प-२०२

Image
भजन  राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी  संतदेवांच्या स्तुतीचे कवन  आळवायला समूह गायन देवाचिया दारी गाऊया भजन  तल्लीन होतो अवघा जन|| हार्मोनियमचे सूर साथीला  टाळचिपळ्यांचा नाद साथीला तबला डग्गा पखवाजाची थाप रागदारी हरकतींचा घेई आलाप || गवळण भारुड अभंग  भजनात भरला रंग  मनात नाचती श्रीरंग  नामस्मरणात श्रोते दंग|| भक्ती संगीताचा आविष्कार संकिर्तनाचा हरीजागर  हरीनामाचा होतोय गजर  ज्ञानामृताचा होतो पाझर|| मृदंग हार्मोनियमचं नातं तालसूरांचे भजनीमंडळ पाईक सांप्रदायिकतेचे   वारकरी वाजवतात टाळ्या टाळ  भक्तीरसात जुळाली श्रध्देची नाळ|| ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम  श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-२०२ फोटो साभार-विश्वकोश

माझं ओझं काव्य पुष्प-२०१

Image
माझं ओझं उचलू लागाया नाही कोण  झाली जाणीव जबाबदारीची मोळी डोक्यावर तोलून  ओझी वाहते मी जीवनाची || मनाचा हिय्या करून  भारा तोलला हातानं मोळी उचलली डोक्यावर  झालं तरातरा पावलांचं चालणं|| जीवनाचं रहाटगाडगं पोटा पाठीवर चालतं त्याला खायाला घालाय सैपाक रांधाय लागतं|| चूल्हृयात अग्नी पेटवायला  समिधा सरपणाची फाटी त्याच्या जाळा इंगळावर  भाजे भाकरी उकळे आमटी || प्रपंच्याचा सोसत ओझ्याचा भार धन्याच्या संसाराला लावते हातभार घराला मिळतो कष्टाचा आधार  लोकजीवनाचा खरा इतबार || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-२०१ फोटो साभार-श्री नितीन जाधव सर

माझी लेखन अभिरुची काव्य पुष्प-२००

Image
माझी लेखन अभिरुची लॉकडाऊनच्या काळात  फावला वेळ असताना  वेळ व्यथित कसा करावा या विवंचनेत असताना || प्रेरणा दिली आप्पांनी  लेखनातून व्यक्त होण्याची  लेखन प्रपंच कसा करावा   घटना प्रसंग टिपण्याची|| सभोवती रेंगाळणाऱ्या  मनगाभाऱ्यातील आठवणी बालपणीच्या गमती झाल्या  साठवणीतल्या आठवणी || लिहिण्याची संधी मिळाली क्रिकेटच्या लेखाने नांदी केली आजवर फिरलेल्या सह्याद्रीची   माझी भटकंती लिखीत झाली|| भटकंती लिहिता लिहिता  चित्र काव्याने मन वेधले निसर्गातील सांजवेळ टिपता  गवतफुलांचे काव्य गुंफले || आवडीची निसर्ग चित्रे नजरेतली छायाचित्रे बहरत गेली रचनाचित्रे त्यांची झाली काव्य चित्रे|| उपक्रमशिल हितगुज छांदिष्ठ मित्रसमुह दाद देई अचूक  शेअरिंग केलेल्या अभिव्यक्तीचे  रचलेल्या काव्याचे झाले कौतुक||  लेखक कवी मित्रांच्या कौतुकाने  मग चैतन्य मिळाले नव्या उमेदीने व्यक्त होण्याची संधी मिळाली मुक्तपणे भटकंतीचा गौरव केला सन्मानपत्राने|| (सर्व शिक्षकमित्र,अक्षरप्रभू, व फेसबुक मित्रांचे मनपुर्वक आभार .) श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई क...

लावणीचे लावण्य काव्य पुष्प-१९९

Image
लावणीचे लावण्य लोक संगीताची अदाकारी  मराठी माणसं फिदा सारी  अदा भाव भक्तीची शृंगारी  शालूची नजाकत भरजरी|  पायपेटीच्या सूरावर  ढोलकीचा खणखणाट   तुणतुण्याच्या तालावर  घुंगरांचा खळखळाट | पदलालित्याने मोहीत मनमयुरा सातासमुद्रा पलिकडे तिला मान  नेत्रकटाक्षाने घायाळ दिलवरा  उत्सव सोहळ्याची लावणी जान  | नाच कडक ठसकेबाज  शब्द चपखल चटकेबाज  अभिनय भावस्पर्शी भावनेबाज  त्रिवेणी संगम लावणी रंगबाज | तमाशातील अस्सल सौंदर्य नृत्याने नजरकैद करते  दिलखेचक खड्या आवाजाने  अन् हावभावाने मंत्रमुग्ध करते | मराठमोळी लावणी बहार आणते नृत्याविष्काराचा रंग ऊधळते  रसिक मायबापा फिदा करते  टाळ्या शिट्यांचा पाऊस पाडते | लावणी समाजमनातील वेध भावनांचा   कलावंतांच्या निस्सीम कलेचा  नाच गाणं अभिनयाच्या अदाकारीचा  रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९९

वन भटकंती काव्य पुष्प-१९८

Image
     वन भटकंती   ओहळाचं खळाळतं पाणी  वारा गातो गुंजन गाणी  पाखरांची किलबिल वाणी  वृक्षलतांची सळसळ वनी | पाखरे विहरती रानोमाळी जीवनदायिनी नद्या तळी सदाहरित छाया वृक्षवल्ली  मोरपिसांनी गारवा घाली | चढउताराच्या जंगलवाटा  निर्झराचे अवखळ पाणी   किर्र झाडीतल्या अनवटवाटा जंगल वाचूया पाऊलखुणांनी| रम्य दृश्याने मन बावरते कातळ पाषाणाने मन वेडावते  सृष्टी पाहुनी मन सुखावते  कैकदा पाहिलं तरी नवानुभव देते | तुझ्या सौंदर्याच्या गंधाने  आसमंत दरवळू दे तुझ्या निसर्गरम्य दृश्याने  मन रेंगाळत राहू दे| जंगलाची जैवविविधता  वाचायला अरण्यलिपी जाणूया विहंगम नयनरम्य क्षेत्राचे  दृश्य ह्रदयात साठवूया | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९८ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

जीवन गाणे काव्य पुष्प-१९७

       ******जीवन गाणे आनंद आणि दु:खाच्या  भावनेचं आयुष्य आहे  सुखाश्रू आणि दु:खाश्रू  भावनांचा ओलावा आहे❗ हसत का जगायचं  कण्हत  का राहायचं  हे ज्याचं त्यानं ठरवायचं  पण आनंदातच राहायचं ❗ मनाच्या संवेदना गिळून  जीवनाला सामोरे जायचं आभाळ कोसळलं तरी  उमेदीवर आरुढ व्हायचं❗ एक आशेचा किरण सुखाचा ओलावा शिंपडतो  भविष्याचा वेध घेत   जीवन गाणे गातो ❗ चिंते पेक्षा चिंतन करणे  मन गाभाऱ्याला उभारी देणे  मरगळ झटकून कर्मे करणे आनंदाची बाग फुलविणे❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.

बडबड गीत काव्य पुष्प-१९६

       ****बडबड गीत आई बाळाला दूधभात भरविते बाळ खायला आढेवेढे घेते  मधेच पळते भोंगाड पसरते  आई तयाला गोष्ट सांगते | मनीच बाळ ओटीवर आलं  सांडलेलं दुध चाटून गेलं डॉगीच पिल्लू भुंकत आलं  लवंडलेलं दुध चाटून गेलं | कोंबडीचं पिल्लू नाचत आलं भाताची शितं चोचीत गेलं चिऊची पिल्लू चिवचिवत आलं  चोचीनं दुध पिऊन गेलं | करडू म्या म्या करत आलं   चारापाणी न्हाय म्हणून हुंदडलं   गायीचं वासरु धावत आलं  तसं बाळ आईला बिलगलं | पिल्लांच्या गोष्टीनं आनंदलं ताटलीत दुधभात मागू लागलं  आईचं भरवणं सुरू झालं बाळ पटपट खाऊ लागलं | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

निसर्ग सौंदर्य काव्य पुष्प-१९५

Image
               निसर्ग सौंदर्य  निळसर आभाळात पुंजके ढगांचे क्षितीजा पल्याड एकत्र दिसते  हिरवेगार डोंगरावर झाडींचे गालिचे  क्षणभरात दृश्य नजरेस पडते| धरणाचा फुगवटा मातीशी खेळतो  काठाच्या झुडूपांना सामावून घेतो  तरंगावर पाना-फुलांना नाचवितो निष्पर्ण झाडांची शिल्पे घडवितो| खेळायला आभाळ खाली आलं जलातल्या सावलीशी बघतं झालं वारं पानांपानात सळसळू लागलं  हळूवार जलतरंग उमटवू लागलं | विहंगम दृश्याने मन रेंगाळते जलाचे सौंदर्य स्मरणात ठेवते पाखरांची किलबिल गाणं गाते नीरव शांततेत आनंद वाटते| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१९५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com