पुस्तक परिचय क्रमांक:२५७ पुसट रेषा




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक- २५७
पुस्तकाचे नाव- पुसट रेषा 
लेखक: सुनील शेडगे 
प्रकाशन- साहित्यवेल प्रकाशन, सातारा 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथम आवृत्ती ३ जानेवारी २०२६
पृष्ठे संख्या–१२०
वाड़्मय प्रकार- ललितसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२५७|| पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नाव- पुसट रेषा 
लेखक: सुनील शेडगे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

‘रम्य ते बालपण’या उक्तीप्रमाणे माणूस वयपरत्वे कितीही मोठा झाला, तरी आपल्या बालपणीच्या आठवणी घटना अंगठीतल्या हिऱ्यासारख्या आपल्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवतो. जणू  काही त्याची या आठवणी म्हणजे त्याची बालपणाची मर्मबंधातली ठेव असते.

    आपल्या आठवणींचा, भेटलेल्या साहित्यिकांचा, भटकंती करताना भेटलेल्या माणसांचा, नयनरम्य सोहळा सृष्टीवर साजरा करणाऱ्या पावसाचा  आणि अनवटवाटेने सह्याद्रीच्या पायथा ते माथा डोंगरदऱ्यातील गडकिल्ले तंगडतोड करताना आलेल्या अनुभुतीचा आनंद उपभोगत वाचक रसिकांना आनंदानुभव बहाल करण्याची किमया लेखणीतून साकारुन, भितीच्या कोरोना काळात व्हाट्सअप समूहावर आणि ब्लॉगवर वाचण्याची संधी देणारं आणि ब्लॉग वाचणाची आवड निर्माण करणारे लेखक श्री सुनील शेडगे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून समर्पक आणि यथार्थ शब्दात वर्णन करुन विविधांगी स्थळांचे, माणसांचे अन् निसर्गाचे घरबसल्या दर्शन वाचनातून करून देणारे भ्रमंतीकार, निसर्ग पर्यटक, प्राथमिक शिक्षक, लेखक, लोकसंग्राहक आणि दैनिक सकाळचे पत्रकार, श्रीमान सुनील शेडगे सर. लेखक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांचे लेखन प्रत्यक्ष जळी स्थळीकाष्ठी भेट देऊन, निरीक्षणं नोंदवून, परिसराचे अवलोकन करून लेखन केलेलं आहे. त्या लेखनातील आशयाला संदर्भाची झालर, शब्दांची आरास अन् ओघवत्या भाषेची शैली आहे. लेखातील आशय वाचताना त्यांनी पेरलेल्या शब्दांचे ऐश्वर्य आणि श्रीमंती पानोपानी जाणवते. इतकं मोजून मापून शब्दांचे ममत्व आणि भावना आशयाची खोली दर्शविते.
लेखक सुनील शेडगे यांचा आणि माझा कोरोना काळात ‘उपक्रमशील शिक्षक’ या दैनिक सकाळच्या सदरात लेखन पाठवले तेव्हापासून आहे. माझ्या प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांची प्रस्तावना त्यांच्या लेखणीतून साकारलेली आहे.
  
    आयुष्यातल्या ‘माईलस्टोन’सारख्या घटनाप्रसंगातील धूसर झालेल्या क्षणांचा लिखित मागोवा ‘पुसट रेषा’ पुस्तकातून आपल्याही बालपणीच्या आठवणी मनात रुंजी घालायला आतुर होतात. लेखकाने मनात साठविलेल्या आठवणी बहुरेषातून रसिक वाचकांना आनंदानुभव घेण्यासाठी गोपनीय ते ओपनीय करून भाषेच्या सहजसुंदर आपलेपणाच्या ओजस्वी भाषेतून लेखभंडार रिते केले आहे.
    
    शाहूनगरी सातारा येथे संपन्न झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशक कट्ट्यावर लेखक श्री. सुनील शेडगे यांनी माय मराठीच्या जयघोषाने रंगलेल्या साहित्यिकांच्या शुभहस्ते  प्रकाशित केले. त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारीच आहे.
   
     ग्रंथप्रदर्शनातील 'परिस प्रकाशना'च्या दालनातून लेखणीवर स्नेह वृद्धिंगत करणारे शिवाजी भोसले सरांच्या समवेत मला हे पुस्तक खरेदी करण्याची पर्वणी मिळाली. खेड्यातील संस्कृतीचे घरपण जपणारे मुखपृष्ठ पाहिले, की आपण लगेचच पुस्तक हातात घेऊन पाने चाळायला लागलो की 'आयुष्य समृद्ध व संपन्न करणाऱ्या 
मातीला आणि माणसांना’ हे पुस्तक समर्पित केल्याचे दिसून येते. पुढे 
अनुक्रमणिका बघितली की, अंतरंगातील लेखशीर्षके पाहिली, की  कोरोना काळात व्हाट्सअप समूहावर आणि ब्लॉगवर सरांनी पाठविलेल्या लेखांची आठवण डोळ्यासमोर तराळून येते. पुनश्च एकदा लेख एकसंघ वाचायला मिळतात याचा आनंद वाटतो. मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’‘पुसट रेषा’पुस्तकाचा ऐनाच आहे. 
 
   सिंहावलोकन केल्यावर आयुष्याच्या गतकाळातील घटना प्रसंगातील मनगाभाऱ्यात साठवलेली विचारप्रवाहांची गुंफण अनुभवांची वीण आणि भावरेषांचा संगम ठळकपणे व्यक्त करणारा आहे. तीस ललित लेखांची मालिका अनुभव संपन्न लेखणीतून सजगपणे गुंफली आहे.
 
    बालपणी गारुड करणाऱ्या गावच्या लोकप्रिय स्थळांचे वर्णन माळावरची जत्रा, सिनेमाच्या तंबूत, तमाशाचं जग, रोमांचक रोंडं आणि हरवलेली जत्रा यातून सुंदर शब्दात सांगितले आहे. अध्यापक विद्यालयात गाव ते सातारा येणं- जाणं करताना घडलेल्या गोष्टी कहाणी ‘लालपरी व विंडोसीट’ यात  मांडलीय. जनतेच्या प्रवासाच एकमेव साधन असणाऱ्या एस. टी. विद्यार्थीदशेत असताना केलेल्या प्रवासाची निश्चित आठवण करून देणारा लेख. खेडेगावातील नभोवाणी केंद्र म्हणजे चावडीवरील गप्पा, गावच्या इत्यंभूत बातम्या व्हायरल होण्याचं एकमेव सार्वजनिक ठिकाण ’पारावरचे दिवस’या लेखातून दृष्टीस पडते.

लेखकाची क्रिकेट आणि पुस्तक वाचन
बालपणापासूनची व्यासंगी खासियत. आकाशवाणीवरुन क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन ऐकणाऱ्या पिढीच्या मनातील गुज ‘कॉमेंट्रीचा जोश’ उलगडतो. माझे गुरुजन हे स़स्मरणीय लेख गुरुशिष्याच्या नात्याची वीण घट्ट करणारे भावस्पर्शी आहेत. अरण्यलिपी जाणणाऱ्या  जंगलवेड्या श्री कोकरे यांचे शब्दचित्र ‘जंगलातील वाघ’मध्ये अतिशय समर्पक शब्दात रेखाटले आहे. बापूंच्या सिनेमाची गोष्ट या लेखातून चित्रपट सृष्टीतील खलनायक विलास रकटे यांच्या भेटीतून उलगडलेल्या जीवनपटाची महती कळते.

ग्रामीण भागातील सामान्य माणसाचे व्यक्तिचित्रं  रेखाटन करणारे ‘माणसे अशीही आणि चेहऱ्यामागचे चेहरे’ या पुस्तकाचे लेखक महादेव मोरे यांच्यावरील ‘गिरणीतलं अक्षरधन’. लेखकाला जयवंत दळवींच्या साहित्यसंपदेने भुरळ घातली आहे. त्यामुळे बातमी वाचून मनाला झालेली वेदना ‘न घडलेल्या भेटीत’व्यक्त केली आहे.लेखक तथा सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे डॉ.अनिल अवचट यांच्यावरील ‘बाबां’चं प्रशस्तिपत्र हा लेख वाचताना आपण मंत्रमुग्ध होतं. कारण त्यांच्या समवेत हितगूज साधण्याचं सद्भाग्य लाभलं आहे. सातारा येथे झालेल्या १९९३ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अहवाल ‘साहित्योत्सव’या लेखात मांडला आहे. पुस्तकाचे ऋण ‘वाचनानुभव’या लेखात त्यांनी मांडले आहे.यातूनच मायेचा उमाळा, मनाचा जिव्हाळा आणि भावनेचा कळवळा वाचलेल्या पुस्तकांतून समजला उमजला आणि स्मरणात राहीला. प्राथमिक शिक्षकाचा श्रीगणेशा ते विविध शाळांमधील अनुभुतींची मालिका, ‘मुक्काम पोस्ट सुरवड, गुरुपौर्णिमेची कथा, उंबरीतले दिवस या लेखातून येते. निसर्गरम्य परिसरात सर्वांना आवडणारा पाऊस आणि त्याची नाना रुपं प्रत्यक्ष आनुभवलेला पाऊस, ‘मनभावन पाऊस, पाऊसवेळा,आक्रोशधारा आणि बाईक भ्रमंती’ या लेखातून समजतो.तर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी गरुडाचे घरटे ‘राजांचा गड…गडांचा राजा’ अप्रतिम शब्दांकनात गडभेट घडते. दोन रुपं यातून आजच्या तरुणाईतील वास्तव चित्र आपल्या डोळ्यासमोर तराळून येते.विचारमंथन करायला लावते.

समवयस्क शिक्षक मित्र आणि मॅडम यांचे शैक्षणिक कार्यकर्तृत्व बहाराला येत असताना आजारामुळे अर्ध्यावरच आयुष्याचा डाव मोडून जाणं, अन् दु:खाचे ढग गडद होणं ‘ते हसणं आता नाही, सचिनदा काळाच्याही पुढे गेला.’भावस्पर्शी शब्दात मांडले आहे.
 
एकंदर अतिशय समर्पक शब्दात शब्दभांडाराचा सुयोग्य ठिकाणी अचूक शब्दांची पेरणी करुन ‘पुसट रेषा’ रसिक वाचकांसाठी शब्दसाजाने ठळकपणे उमटविल्या आहेत. निश्चितच हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरेल असे माझे प्रामाणिक मत आहे….

*परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे,*
*वाई (सातारा)*
*लेखन दिनांक- ५जानेवारी २०२६*



    अभिप्राय....
अगदीच सुंदर असा परिचय.
लेखक सुनिल शेडगे सरांच्या " पुसट रेषा " या ललितलेखसंग्रहामधील शब्दसौंदर्य आणि अभिव्यक्ती तितकीच दमदारपणे परिचयातून मांडलेली आहे.

----राजू गरमडे चंद्रपूर पुस्तक समीक्षक 


दादा सुप्रभात 🙏

खूपच छान पुस्तक परिचय. अगदी सहजसुंदर शब्दांतली सुयोग्य मांडणी. पुस्तकावर सर्वात आधी व्यक्त होण्याची संधी आपण साधली. हा लिखित प्रतिसादाचा, प्रतिक्रियेचा श्रीगणेशा आपल्याकडूनच. मनःपूर्वक, कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

--------- सुनील शेडगे लेखक व पत्रकार 







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी