पुस्तक परिचय क्रमांक:२४३ ब्रॅण्ड काटदरे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४३
पुस्तकाचे नांव-ब्रॅड काटदरे
लेखिका : अर्पणा वेलणकर
प्रकाशन-रोहन प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २१जून ,२०२५
पृष्ठे संख्या–२१४
वाड़्मय प्रकार-आत्मकथा
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४३||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-ब्रॅड काटदरे
लेखिका: अर्पणा वेलणकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
एका कुटुंबातील तीन पिढ्यांचे अपरिमित कष्ट,समर्पक आणि दूरदृष्टी यांच्या बळावर व्यवसायाचा मजबूत पाया लाभलेल्या व्यवसायातील प्रगती कशी वेगाने होत जाते.ती ‘खमंग मसालेदार चटणी मसाले आणि लोणची’यांच्या चवीने मनाला भुरळ घालणाऱ्या काटदरे यांच्या पोटाला चरितार्थासाठी केलेल्या गृहउद्योग, लघुउद्योग ते काळाची पावले ओळखून त्यांचे कारखानदारीत रुपांतर केलेल्या तीन पिंढ्यांची ही कहाणी ‘ब्रॅड काटदरे’ही लोकमतच्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांनी रेखाटली आहे.अगदी मसाल्यांचा वास दरवळतो एखादी भाजी शिजताना अन् मग तोंडाला पाणी सुटतं.
त्याचप्रमाणे त्यांची लेखणी रसिक वाचकांना मंत्रमुग्ध करणारी आहे.कारण पुस्तक वाचन करताना ते आपलं कुतूहल वाढत राहतो.याची प्रचिती पानोपानी येते.
वास्तव दर्शन आणि आपलेपणाची भावना ही यशोगाथा वाचताना येते.
जुन्या काळातील भाजीला फोडणी करायला तसेच शेंगदाणे कुटायला लागणारा खलबत्ता आणि खमंग चवीच्या मसाल्यांची सजावट करुन बनवलेलं आकर्षक मुखपृष्ठ आपली नजर खेचते.ते पुस्तक हातात घेऊन पाने चाळायला.तर मलपृष्ठावर लोकल ते ग्लोबल काटदरे मसाले कसे घडत गेले? या ब्रॅडचा लोकल ते ग्लोबल प्रवास कसा घडत गेला. त्याची ओळख ‘ब्लर्ब’वाचताना होते.
ही कहाणी आहे मराठी गृहउद्योगाच्या ग्लोबल महत्त्वाकांक्षेची. कुटूंबाच्या चरितार्थासाठी ‘कांदा लसूण’चटणी करण्याचा घरगुती व्यवसाय हाती घेतलेल्या बाळकृष्ण आणि प्रमिला काटदरे या आजी-आजोबांची…त्यांनाच ही कहाणी निरपेक्षपणे समर्पित केली आहे.
ही यशोगाथा म्हणजे केवळ कुटूंबाची कथा नसून नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात नवं घडवू शकणाऱ्या तरुणांना मोलाचं मार्गदर्शन मिळेल. कुटूंबातील स्त्रियांना फॅमिली बिझनेस ही बेडी न वाटता बेस कॅम्प वाटावा.तसेच जुन्या पिढीने कुरकुर न करता कमरेची किल्ली नवी पिढी सक्षम झाल्याचे लक्षात आल्यानंतर काढून द्यावी.व्यवसायासाठी टीमची निवड व टीम वर्क कसं असावं. तसेच व्यवसायाची ग्रोथ व टर्न ओव्हर वाढवायला सल्लागाराची मदत कशी घ्यावी. व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी नवउद्योजकांना हे पुस्तक म्हणजे दीपस्तंभ ठरेल असे मला वाटते.
‘ब्रॅण्ड काटदरे’या कहाणीला डॉ.आनंद देशपांडे आणि इंद्रनील चितळे यांची प्रस्तावना लाभली आहे.तसेच लेखिका अपर्णा वेलणकर यांचे मनोगत या कहाणीचे बीज अधोरेखित करते.
‘ब्रॅड काटदरे'या यशोगाथेत एकूण नऊ विभागात लेखन केले आहे.प्रत्येक विभागाचे शीर्षक हे त्यातील आशयाचे दर्पण आहे.मध्यवर्ती कल्पना असून ते व्यवसायातील ‘माईलस्टोन’आहेत.शीर्षक वाचतानाच त्यातील आशय वाचनाची लालसा निर्माण होते.१)कोयनेच्या पुलावर मध्यरात्री…
२)”मंजुळा बाई, तुम्ही घरी चटणी कशी बनवता?’’
३)४२, मंगळवार पेठ
४) मसाले आणि चटण्यांचं मेतकूट
५)जे-२/१७,ॲडिशनल एमआयडीसी, सातारा
६) ‘...सइ तर कुठं करता येत व्हती?’
७).....बरं,मग?
८)सहा अधिक एक एकूण सात काटदरे
९) ‘बदलणार नाही अशी एकच गोष्ट…’
पराग काटदरे यांच्याशी संवाद
मुंबईच्या एका मासिकात वाचलेला लेख बाळूकाकांच्या आठवणीत आला.मे.व्ही. पी.बेडेकर ॲंड सन्स या उद्योगाची यशोगाथा समोर आली.ते मसाल्याचा व्यवसाय करुन शंभर लोकांना काम देतात.उद्योगात भरारी घेतात.तर मग आपणही मसाल्याचा व्यापार केला तर! मसाले घरच्या घरीच बनवायचे आणि नवा व्यवसाय उभा करायचा! डोक्यावरची कर्जफेड होईल आणि आपल्या कुटूंबाचं पोट तरी भरेल ! मृत्यूला जवळ करायला निघालेल्या बाळूकाकांची पावलं चटणीचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचाराने माघारी वळली. इथचं मसाला चटणीच्या व्यवसायाची पायाभरणी झाली.आयुष्याला मसाल्यांच्या चमघमाटाचा स्पर्श झाला.मसूरच्या घरी धुण्या-भांड्याला मदतीचा हात देणाऱ्या मंजुळाबाईंचा चटणी बनवायला सल्ला घ्यायचं प्रमिला काटदरे यांनी ठरवलं.कांदा-लसूण मसाला कसा बनवतात हे समजून घेऊन स्वानुभवापुढे थोडेफार बदल करत स्वतःची चव मिसळून चटणी तयार केली.हाच कांदा लसूण मसाला चटणीचा पहिला फॉर्म्युला.
एखादा ब्रॅण्ड कसा घडतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. केवळ यशाने हुरळून न जाता संकट समयी, आपत्कालीन परिस्थितीत सामोरे कसे जायचे तसेच न कळत झालेल्या चुकांची नमूद केलेल्या आहेत.मागच्या लोकांनी केलेल्या चुकांपासून पुढल्या पिढीतल्या लोक शिकतात आणि नुकसान टळतं. व्यवसायातील चढ उतार यांचाही समावेश केलेला आहे.
काटदरे यांच्या व्यवसायाचा लोकल ते ग्लोबल प्रवास थक्क करणारा आहे. व्यवसायाला घराचावारसा नसताना प्रपंचाला सुखी ठेवत डोक्यावरची कर्जफेड होईल या विचाराने चटणीचा घरगुती व्यवसाय बाळकृष्ण काटदरे आणि प्रमिलाबाई काटदरे यांनी सुरू केला.त्यास सुपुत्र अनिल आणि स्नुषा शैलजाताईंनी यांनी व्यवसाय वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली तर नवनवीन संकल्पना मशीनरी आणून नातू पराग आणि नातसून दिपा यांनी हा व्यवसाय ग्लोबल केला.तर पल्लवीने अमेरिकेच्या स्वयंपाकघरात काटदरे मसाले पोहचवले आहेत.तसेच अशोक काटदरे यांनी पुण्यातील नोकरी सांभाळून काटदरे मसाले किरकोळ दुकानदारांच्या मदतीने ग्राहकांना आकर्षित केले आहे.
अशी ‘काटदरे फूड आणि प्राॅडक्ट’ यांच्या व्यवसायाची कहाणी.शंभर पेक्षा जास्त उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.चटणीमसाले,पीठं, विविध मसाले,पावडर,चटण्या, लोणचं आदी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत.
अस्सल चव,विनम्र सेवा,माफक दर आणि क्वालिटी यामुळे ‘काटदरे ब्रॅण्ड’बाजारात दर्जा टिकवून आहे…
उद्योग जगतातील नवव्यवसायिकांना
ही तीन पिढ्यांची कहाणी मार्गदर्शक ठरेल!असे रसिक वाचकांना आवडेल अशी यशोगाथा आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २०ऑगस्ट२०२५

Comments
Post a Comment