पुस्तक परिचय क्रमांक:२४५ माझी आत्मकथा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४५
पुस्तकाचे नांव-माझी आत्मकथा
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रकाशन-साकेत प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती २मे ,२०२२
पृष्ठे संख्या–१८४
वाड़्मय प्रकार-आत्मकथा
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४५||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-माझी आत्मकथा
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो.त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालायचे,अशी प्रतिज्ञा मी लहानपणीच केली होती.”
—-------भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न, विश्वरत्न नॉलेज ऑफ सिंबॉल
संविधानाचे शिल्पकार,ग्रंथप्रेमी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक महामानव डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर.त्यांनी समतेच्या चळवळीला प्रेरणा दिली. महिला व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.ते ब्रिटिश भारत सरकारचे मजूरमंत्री आणि स्वतंत्र भारत सरकारचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले.ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सहभागी झाले.समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली.दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा!या नवविचार युवकांना प्रेरणा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘माझी आत्मकथा’या ग्रंथात जीवनाच्या प्रवासाचा वेध घेतला आहे.आयुष्यातील सुखदुःखाच्या प्रसंगांची ओळख या आत्मचरित्रात करून दिली आहे.
या आत्मकथेत एकूण सत्तावन्न भागांत आयुष्याची लेखमाला गुंफली आहे. लेखातील आशय स्पष्टपणे समजणारे शीर्षक आणि आशयाला बळकटी देणारी
कृष्णधवल छायाचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे अक्षरचित्रास छायाचित्रांमुळे वास्तव सत्य उठावदारपणे लक्षात भरते.
“माझी आत्मकथा” हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक महत्त्वपूर्ण प्रेरक व दीपस्तंभ ठरेल असे आत्मचरित्रात्मक लिखाण आहे.ते विशेषतः विद्यार्थी, ज्ञानसाधक आणि अभ्यासक यांना प्रेरक आहे.या पुस्तकात बाबासाहेबांनी आपल्या लहानपणातील संघर्ष, शिक्षणातील अडथळे,अस्पृश्यतेचा कटू अनुभव आणि समाजातील सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा याबद्दल मनोगत मांडले आहे.या पुस्तकात डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील बालपण ते शिक्षण आणि समाजातील जातीय भेदभावाच्या अनुभवांपर्यंतचा महत्वाचा कालखंड येतो.
बालपण आणि कुटुंब पार्श्वभूमी १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले बाबासाहेब एका दलित कुटुंबात वाढले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित अशा वातावरणात बालपण गेले. कुटुंबातील व्यक्तींचे शिक्षणावरील प्रेम, आई-वडिलांचे मार्गदर्शन याचे तपशील या पुस्तकात आहेत.बाबासाहेबांनी लहान वयातच अस्पृश्यतेचे अमानवी अनुभव घेतले. त्याची दाहकता आणि चटके सोसावे लागले.शाळेत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, बाकावर बसण्यास मनाई, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून भेदभाव असे अनेक प्रसंग त्यांनी यात वर्णन केले आहेत.
कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका),लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स,आणि बार-ॲट- लॉमध्ये शिक्षण घेताना आलेल्या संघर्षांची नोंद.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञानाची ओढ आणि शिक्षणावरील अपार प्रेम हे पुस्तकात प्रकर्षाने दिसते. समाजातील जातीय भेदभाव, अन्याय, आणि विषमता पाहून बाबासाहेबांना लढण्याची प्रेरणा मिळाली.पुढील काळात त्यांनी समाजसुधारणा, अस्पृश्यता निर्मूलन आणि समानतेच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.
या आत्मकथेची साधी, स्पष्ट, सोपी आणि हृदयस्पर्शी भाषा काळजाला भिडणारी आहे.बाबासाहेबांच्या अनुभवातून त्या काळातील भारतीय समाजव्यवस्था स्पष्ट दिसते.हे पुस्तक केवळ आत्मकथा नसून, त्या काळातील अस्पृश्य दलित समाजाच्या दुःखद वास्तवाचे दस्तऐवज आहे.
यातील बरेचसे प्रसंग वाचताना आपण मंत्रमुग्ध होतो.त्यांना मिळालेली वागणूक वाचून आपले मन भावस्पर्शी होते.इतकं परखड लेखन यातील लेखांत आहे. बाबासाहेबांच्या ज्ञानयात्रेचा प्रवास, संघर्षशीलता, जिद्द, आणि समाजासाठीचे योगदान “माझी आत्मकथा’’हा ग्रंथ वाचताना सहजपणे लक्षात येते.
‘माझी आत्मकथा’या ग्रंथात सत्तावन्न लेखांची मालिका आहे.ती बाबासाहेबांच्या जीवनातील ठळक घटनांचा उठावदार आलेख आहे.तो मीच तर नव्हे ना?मी मूळ नक्षत्रावर जन्मलो,त्यांनीच मला हे शिकवले,माझे वडील,जिद्दी स्वभाव, आपली परिस्थिती,प्रोफेसर असताना,पुणे करार,गांधी -आंबेडकर चर्चा,मजूरमंत्री, घटना समितीत प्रवेश,आजरपण आणि दुसरे लग्न, कायदेमंत्री, माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान, शैक्षणिक कार्य,मी बुध्दाकडे का वळलो?,...यांनीच मला घडवले,अस्पृश्यांना संदेश,ग्रंथप्रेमी बाबासाहेब , महाराष्ट्रातील संतांचे कार्य, माता रमाईच्या आठवणी…
ज्ञानसाधक,अभ्यासक आणि विद्यार्थी यांना प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल असा ग्रंथ ‘माझी आत्मकथा'आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २ ऑक्टोंबर २०२५

Comments
Post a Comment