पुस्तक परिचय क्रमांक:२४६ पोस्ट मास्तर आणि इतर कथा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४६
पुस्तकाचे नांव-पोस्टमास्तर आणि इतर कथा
लेखक :रवींद्रनाथ टागोर
अनुवाद -मृणालिनी गडकरी
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जून,२०१७
पृष्ठे संख्या–१७०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१६०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-पोस्टमास्तर आणि इतर कथा
लेखक:रवींद्रनाथ टागोर
अनुवाद -मृणालिनी गडकरी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य हे आनंदघन आहे.विचारांच्या सौंदर्याची खाण आहे.ते जेवढं एकाग्रतेने रसग्रहण करावं.तेवढी तृप्ती मिळते व ज्ञानलालसा वाढत राहते.म्हणूनच सगळं विलक्षण आनंददायी त्यांचं साहित्य आहे.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्या काळी गुंफलेल्या कथा आजही तेवढ्याच ताज्या,टवटवीत आणि कालातीत वाटतात.म्हणजेच आधुनिक बंगाली कथांच्या पायऱ्या ठरलेल्या आहेत.या कथांचे लेखक आणि कवी एक महान साहित्यिक. १९१३ सालचे आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विश्व कवी साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या “गितांजली’’ काव्यसंग्रहास मिळाले होते.
आदरणीय सरांच्या अनेक कथा कादंबऱ्या कविता आजही जनमानसात उच्च स्थान मिळवून आहेत. समाजाला भेडसावणाऱ्या सामाजिक समस्यांवर वैचारिक मंथन करायला लावणाऱ्या त्यांच्या कथा माणसाच्या मनाचा वेध घेतात.असेच एक बहारदार अक्षरभंडार म्हणजे “पोस्टमास्तर आणि इतर कथा’’रवींद्रनाथ टागोरांचे समस्त साहित्य बंगाली साहित्या प्रमाणेच भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे.
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनात माणूस आणि निसर्ग यांना असाधारण महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णन करता येत नाही, तर निसर्गातील भावभावनांच्या खेळात महत्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूप, माणसाच्या बदलणाऱ्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातून फुललेली विश्वकवींची कथा तो महामानव होता.हे नकळत आपल्याला सांगून जाते.
त्यांच्या कथांमध्ये मानवी भावना, निसर्ग, सामाजिक मूल्ये, प्रेम, विरह, वेदना आणि अध्यात्म यांचे सुंदर चित्रण आढळते. अनेक कथा त्यांनी भावस्पर्शी शब्दांकनात गुंफलेल्या आहेत.त्या कथांचे रसग्रहण करताना आपले मन निश्चितच त्या कथेतील नायक पात्रांच्या स्वभावविशेषांंची आठव करत तिथेच रेंगाळतं.क्षणभरासाठी आपण त्या व्यक्तीच्या विचार करत राहतो.
आकर्षक आणि सुंदर मुखपृष्ठावर शिडाच्या होडीतून प्रवास करणारी माणसं आपली नजर वेधतात.तर मलपृष्ठावर भारतातील थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांची चिंतनशील प्रतिमा.अन् हा कथासंग्रह उठावदार करणारा ‘ब्लर्ब.’
मराठी भाषेत अनुवाद करणाऱ्या मृणालिनी गडकरी यांनी मनोगतात या कथासंग्रहातील कथांचा परिचय अतिशय सहजतेने समर्पक शब्दात करुन दिला आहे. स्त्रीयांच्या हृदयातील वात्सल्य,प्रेम, ममता, माधुर्य अशा सुंदर अन् नाजूक भावनांचा गोफ विणला आहे.हे कथांतून उलगडत जाते.त्यांनी स्त्रियांचे जगणं जवळून पाहिले.त्यांना अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या.त्यातील सुखदुःखानं कवींचं तरल,संवेदनशील मन हेलावतं, भारावतं आणि याच अनुभवांना गुरुदेवांच्या अपूर्व प्रतिभेचा स्पर्श होवून ते कथारुपाने सृजनात्मक साहित्य झाले.
‘पोस्ट मास्तर आणि इतर कथा’या कथासंग्रहात एकूण पंधरा कथांचा समावेश केला आहे.फक्त पोस्ट मास्तर कथा सोडून बाकीच्या कथांचे नायक स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवितात.त्या घटनेपेक्षा ते माणूस केंद्रस्थानी मानतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या पुढील काव्यातून जीवन व साहित्यात ‘माणूस’ केंद्रस्थानी आहे.याची प्रचिती येते.
“माझ्याच चेतनेच्या रंगाने पाचू झाला हिरवा, माणिक झालं लाल
मी नजर टाकली आकाशाकडे आणि उजळला प्रकाश पूर्वपश्चिमेस,
गुलाबाकडे पाहून म्हणालो, ‘सुंदर…. आणि सुंदर झाला तो.”
सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कथा आजघडीलाही तेवढ्याच ताज्या टवटवीत वाटतात.सुंदर शैलीत अनुवाद मृणालिनी गडकरींनी केला आहे.
पुस्तक परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ९सप्टेंबर २०२५

Comments
Post a Comment