वाऱ्याची फुंकणी भाता..
वाऱ्याची फुंकणी
मृगाचा पाऊस सुरू झाला की लोहारकाम करणारी माणसं छकड्यात संसार भरुन खेडेगावी गावातली मोक्याची जागा बघून पाल ठोकायचं. शक्यतो गावची चावडी नाहीतर देवळाच्या समोर.शेतकऱ्यांची मशागतीची धांदल उडालेली असायची. तेंव्हा शेतीची अवजारे,खुरपी विळे, सुऱ्या ,कुदळी आणि कुऱ्हाडी शेवटायला लोहाराच्या पालावर गर्दी व्हायची.तेंव्हा त्याचे शेवटण्याचे सराजम भाता,ऐरण,घण, हातोडा व पकडी असायच्या तर काहीजवळ भात्याऐवजी फुंकणी असायची.हाताने गरगर फिरवलं की लोखंडी नळीतून वाऱ्याचा झोत वेगाने विस्तवावर पडून कोळसा चांगला पेटायचा आणि आग तयार व्हायची.त्यात ठेवलली लोखंडी वस्तू तापून तापून लालभडक व्हायची.ती ‘वाऱ्याची फुंकणी’(भाता) बऱ्याच दिवसांनी पर्यटनस्थळी मकचं कणीस भाजताना प्रत्यक्ष पहायला मिळाली.पाचच मिनीटात कणीस भाजून तयार…
माझ्या नातीने तर ती लोखंडी फुंकणी गरगर फिरवून बघितली आणि कोळश्याची आग कशी दिसतेय ते सांगितले.
तो भाता (फुंकणी) पाहून मन आठवणींच्या साठवणीत गेलं.आणि या भात्याचा वापर पुर्वी कोण कसं कसं करत होतं ? याची दृश्ये डोळ्यासमोर रेंगाळू लागली….
*लोहारकाम करणारी माणसं यांचा उपयोग करून शेतीचे अवजारे व संसार उपयोगी साधने बनवायची.तसेच त्यांना शेवाटणे,पाणी देणे…यासाठी वस्तू तापवायला फिरणाऱ्या फुंकणीचा उपयोग करायची.
*तांब्या पितळेच्या भांड्यांना कळकू नये म्हणून ‘कल्हई’ करावी लागायची. भांडी तापवण्यासाठी याच फुंकणीचा म्हणजेच हल्लीच्या ब्लोअरचा उपयोग करायची.
*काहीजण व्यावसाया बरोबरच जेवण बनवायलाही यांचा दैनंदिन उपयोग करायची.
*खानापूर स्टॉप येथे तर हॉटेलवजा झोपडीत चहा आणि भजी याच भात्यावर तयार करायचे.एकदा मोसंबी नारंगी सिनेमा पाहून आल्यावर काळाचहा आणि बटरं खाल्लेली लक्षात आले.
*पुणे-बंगलोर हायवे आमच्या गावापासून तीनेक किलोमीटरवर आहे.तिथे जोशीविहीर नामक चौक आहे.वाई ते वाठार आणि पुणे बंगलोर हायवेचा चौक. तिथंही एक घरातच हॉटेल होते.तिथंही हॉटेलचे सगळे पदार्थ याच भात्यावर बनवत असतं…
आणखी काही लोकं कारणपरत्वे प्रपंच्यासाठी जुगाड करून या फुंकणीचा उपयोग करत असतील…
दाट धुके, अचानक पावसाची भुरभुर आणि झोंबणारा गार वारा यातून रफेट मारल्यावर आणि ओलंचिंब झाल्यावर एखाद्या साध्या हॉटेलात ही वाऱ्याची फुंकली गरगर फिरवून शेकायला मिळाल्यावर गारवा कुठं पळून गेला हे समजलंच नाही.आणि साधी माणसं सिनेमातील लोकप्रिय गाण्याच्या ओळी ओठांवर गुणगुणू लागल्या,
‘‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे |आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे|’’

Comments
Post a Comment