पुस्तक परिचय क्रमांक:२४२ या शेताने मज लळा लावला

 

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-२४२

पुस्तकाचे नांव- या शेताने लळा लाविला 

लेखक :ना.धों.महानोर

प्रकाशन-समकालीन प्रकाशन, पुणे 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती नोव्हेंबर,२०१४

पृष्ठे संख्या–१०४

वाड़्मय प्रकार-आत्मकथा 

किंमत /स्वागत मूल्य-१२५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२४२||पुस्तक परिचय 

पुस्तकाचे नांव-या शेताने लळा लाविला 

लेखक:ना.धों.महानोर

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

 शेतीमातीच्या काव्याने निसर्गभान जपणारे रानकवी

'या शेताने लळा लावला असा असा की

सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...'

यासारख्या कविता ऐकून रसिक वेडे न झाले तरच नवल..ही कवीच्या अंतरात्म्यातील मंत्राक्षरे आहेत. विख्यात लेखक, निसर्गकवी व सिनेगीतकार नारायण धोंडू महानोर (दादा) यांच्या कवितेच्या ओळी 'या  शेताने लळा लावला' या पुस्तकाची बिरुदावली लिहिली आहे.

   कवितेत कमीत कमी शब्द पण आशयाचा नेमका घट्टपणा असावा लागतो ही जाणीव त्यांना झाल्यावर तर त्यांची कविता आणखीच खुलू लागली.शिक्षण संपलं होतं पण वाचनाचा नाद मात्र कायम होता. रात्री झोपडीतल्या कंदिलाच्या मंद प्रकाशात त्यांनी आधुनिक मराठी कविता सुद्धा वाचलेली आहे.असे निसर्ग कवि ना.धों.महानोर आजवरच्या साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मौलिक कर्तृत्वाच्या कार्याचा सन्मान भारत सरकारने 'पद्मश्री'तर महाराष्ट्र शासनाने 'कृषिभूषण' पुरस्काराने केला आहे.तसेच साहित्य अकादमी, जनस्थान आणि कृषिरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आहे.

     शेती म्हणजे भुई रुजवण्याची किमया.जगाचं उदरभरण करायला माणसाला मिळालेलं वरदान!भुईची सेवा करणारा बळी.पण अस्मानी आणि सुलतानी संकटातून बिकट वाट काढत,सरकारी अनास्था जवळून बघत नैसर्गिक संकटांना सामोरे जात शेतकरी टिकून आहे.कितीदा. उध्वस्त झाला तरी नवी तंत्रे,नवी पीकपद्धती, जलसाक्षरता करत जिद्दीने उभा राहतोय.महाराष्ट्रातील तमाम मायबाप शेतकऱ्यांच्या  शेताबांधापर्यंत ना.धों.महानोर यांनी अनुभवातून पिकवलेली बहरवलेली शेती  आणि त्या शेतीत केलेल्या समृद्ध शेती- पाण्याचे प्रयोग मातीतल्या माणसांपर्यंत पोहोचावेत,या हेतूने अनुभवसिद्ध शेतीची आत्मकथा 'या शेताने लळा लाविला' या हिरव्यागार शब्दांच्या रांगोळीत रेखाटली आहे.

    २०१३ साली महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांत दुष्काळ पडला.पेरणी नाही पीकपाणी नाही. शेती,झाडं,फळझाडं खूप परिश्रमाने उभं केलेलं दुष्काळात नष्ट झाले.शेतकऱ्यांच्या संसाराची वाताहात झाली.शेतकऱ्याची शेत मजुरांची आणि खेड्यांची जी मोडतोड झाली त्याची पुनर्उभारणी करण्यासाठी शासनाच्या सहकार्याने पळसखेडा गावी शेतीच्या पाण्यासाठी उभारलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाचे काम,वर्तमानपत्रातील लेखमाला तसेच विधानपरिषदेत आमदार असताना मांडलेले प्रश्र्न.या सर्वांचे एकत्रित टिपणे आणि छायाचित्रे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा पुस्तकाचे लेखन ना.धों..महानोर यांनी केले आहे.

आज वाटते पुन्हा बघावी

सळसळणारी हिरवी शेते

आणि पडावी कानावरती

झुळ झुळणारी निर्झर गीते.

शेतीतून भरघोस उत्पादन घेताना घेतलेल्या कष्टाची मेहनतीची तयारी कशी करावी लागली.हरितक्रांती कशी होत गेली.संकरीत ज्वारी बाजरीचे भरघोस उत्पादन कसे घेतले.मोसंबी बागेने आर्थिक उन्नती कशी करुन दिली.पुस्तकाला मिळालेल्या रोख बक्षिसातून शेतात अधर्वट राहिलेल्या पाईप लाईनचे काम कसं पुर्ण झाले.असे बरड माळावर प्रायोगिक शेती करुन बारमाही शाश्वत शेतीचा विकास कसा केला? यासाठी जलसंधारण कसं केलं.या सर्वांची यशोगाथा म्हणजे ‘या शेताने लळा लाविला.’हे प्रसिद्ध लेखक आणि प्रयोगशील शेतकरी ना.धों.महानोर यांची आत्मकथा…शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल असे अनुभूति देणारे पुस्तक आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा दिनांक–१४ ऑगस्ट २०२५


 





Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी