पुस्तक परिचय क्रमांक:१९८ भोकरवाडीतील रसवंतीगृह
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पुस्तक परिचयाने साजरा करुया.....
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-१९८
पुस्तकाचे नांव-भोकरवाडीतील रसवंतीगृह
लेखकाचे नांव-द.मा.मिरासदार
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण सप्टेंबर २०१९
एकूण पृष्ठ संख्या-१४८
वाङ् मय प्रकार --कथासंग्रह
मूल्य--१५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚
१९८||पुस्तक परिचय
भोकरवाडीतील रसवंतीगृह
लेखक-द.मा.मिरासदार
#########################
विनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखणी अन् वाणीने श्रीमंत करणारे जेष्ठ साहित्यिक कथाकार द.मा.मिरासदार ‘भोकरवाडी नामे’ गावातल्या माणसांच्या इरसाल, ढंगदार,बेरकी व विक्षिप्तपणाच्या बहारदार विनोदीकथा आपल्या लेखणीने व वाणीने हुबेहूब अस्सल चित्र उभे करून रसिक श्रोत्यांना मनसोक्त खळखळून हसविणारे कलाकार,लेखक, सिनेमा पटकथाकार द.मा. मिरासदार होत.
हास्यविनोदी कथाकथनाच्या क्षितिजा वरील एक जेष्ठ साहित्यिक,आपल्या आवाज आणि हावभावाने अन् साभिनयाने रसिक प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावणारे द.मा. म्हणजे दत्तात्रय मारुती मिरासदार.तसेच आपल्या अमोघ वाक् चातुर्याने रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे उत्कृष्ट कथाकार म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.त्यांच्या विनोदी इरसाल कथा लेखनाचा पॅटर्न तसेच कथाकथनाच्या उस्फुर्त, बहारदार,हावभावयुक्त सादरीकरण,अचूक शब्दांची समयसूचकता आणि ढंगदारपणामुळे त्यांच्या साहित्यावर निस्सीम प्रेम करणारा वाचक व श्रावक वर्ग हास्यनगरीत मनसोक्त खळखळून हसण्याचा आनंद घेत असतो.त्यांच्या अनेक कथासंग्रहापैकी लोकप्रिय विनोदी पठडीतले पुस्तक ‘भोकरवाडीतील रसवंतीगृह’.
एकोणवीस कथांचा हास्याचा खजिना या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.त्यांनी लिहिलेल्या कथा पुस्तकरुपाने या आवृत्तीत येण्यापूर्वी अनेक मासिकातून व दिवाळी अंकातून वाचक रसिकांना वाचायला मिळालेल्या आहेत.भोकरवाडीतील रसवंतीगृह,जीव देणे आहे,न झालेला भूकंप, वशीकरण अत्तर,आणीबाणीतील गणेशोत्सव, भोकरवाडीतील चमत्कार, भोकरवाडीतील बिबट्या, दिव्यदृष्टी, कानफाट्या,येथे खुर्च्या मिळतील,एका सदोबाची चित्तर कथा, उपद्व्याप, नांगरट,आमुची मास्तरांची जात,आपले मंदिर केंव्हा प्रसिद्ध होते, दामूची गोष्ट, एका मित्राचे लग्न, भोकरवाडीतील समाजसेवा आणि आय विटेनस. अश्या विनोदी कथा.
विनोदी साहित्याची मोठी समृद्ध परंपरा आहे.तीच वाट चोखाळत ग्रामीण जीवन आणि विनोदी कथा या दोन प्रवाहांना एकत्र घेऊन एक वेगळा आयाम मराठी साहित्याला द.मा.मिरासदारांनी दिलेला आहे.
भोकरवाडीतील रसवंतीगृह ही कथा गावातल्या तालमीचा जिर्णोद्धार करण्यासाठी रसवंतीगृह सुरू करण्याची मांडलेली कल्पना बाबू पैलवान, गणा मास्तर, शिवा जमदाडे,रामा खरात आणि नाना चेंगट या मंडळींच्या आयडीयाच्या कल्पना पुर्णत्वास जाताना काय काय घडतं? त्याचं वर्णन वाचताना पदोपदी चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली इतकं सुंदर लेखन केले आहे.तर ‘जीव देणे आहे’ ही कवी बजरंग देशपांडे यांची कथा. प्रेमप्रकरणात अपयश आल्याने,जीव द्यायला नाना प्रयत्न करुनही ते सजीवच कसे राहतात.त्याची
कहाणी छानच शब्दात सांगितली आहे.
वर्तमानपत्रातून भूकंप होणार असल्याचे भविष्य आणि त्यामुळे उडालेली घबराट.तोंडी सांगण्याद्वारे पसरलेली भीती आणि त्यावरच्या उपायांची चर्चा‘न झालेला भूकंप’या कथेत मांडला आहे.
बाबू पैलवान आणि नाना चेंगट या जोडीने इंग्रजी सिनेमा बघितल्यावर त्यावर झालेल्या गप्पा आणि परदेशातील मुक्त वातावरण यावरील दोघांची मतं आणि नावावर एखादी बाई फिदा होण्यासाठी त्यानं साधुचं ऐकून केलेला उपाय याची कहाणी म्हणजे ‘वशीकरण अत्तर’.
तालुक्याच्या गावी एका नामांकित फडाने मुक्काम केलेला असतो.तो तमाशा बघायला गावातील लोकं दररोज रात्री जात असतात.त्याला आळा घालण्यासाठी बाबू पैलवानाने सुचविलेला उपायाला लोकं अंगठा दाखवितात.त्या प्रसंगांचे शब्दचित्र ‘भोकरवाडीतील बिबट्या’या कथेत रेखाटले आहे.बालपणी शाळेत गोटे मास्तरांनी व्रात्य पोरगं म्हणून शिक्कामोर्तब केला होता. त्यामुळे शाळेत काही आगळीक घटना घडली की माझ्याकडे अंगुलीनिर्देश केला जायचा.ती कानफाट्या कथा वाचताना आपल्या समोर आपली शाळा उभी राहते.अन् घडलेले प्रसंग मनात रुंजी घालतात.असं कथा लेखन द.मा.मिरासदारांनी केले आहे.
‘येथे खुर्च्या मिळतील’राजकारणात प्रवेश करुन निवडणुका कश्या जिंकाव्यात यांचाही प्रात्यक्षिकासह अनुभव देणारा क्लास देशभक्त बाबूरावांनी खोललेला असतो.त्या माहिती घ्यायला शिक्षक गेलेले असतात.ते संवादरुपी कथानक वास्तवता दर्शवते.
पुस्तक विक्रेता सदोबा कालौघात स्वतः
बदलला नाही.त्यामुळे वृद्धावस्थेत त्याला दुकान बंद करून इतर कष्टाची कामे करत जीवन कंठावे लागले.दुकानदारीची सदोबाची काय कल्पना होती,कोण जाणे ! गिर्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही नवे करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात. दुकानाची सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या अर्थात हा त्यांचा दोष नव्हेच. गावचे वातावरण तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले होते.दुकान मांडून बसायचं.गिऱ्हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही. अशीच एकूण पद्धत होती.आधुनिक विक्री कलेचा गंधही त्याकाळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्ष संपल्यानंतर गिऱ्हाईक कमी-कमी होत गेले आणि शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करीत मृत्यू पावला..ती ‘एका सदोबाची चित्तरकथा’.पातेलेभर लोणी पैज लावून खाणाऱ्या दामूची गोष्ट तर हसून हसून पुरेवाट होईल इतकी अप्रतिम शब्दात गुंफलेली आहे.लेखक मित्राचा प्रेमविवाह रजिस्टर विवाह कसा झाला त्याची कथा ‘एका मित्राचे लग्न’या फारच अफलातून आहे.दुष्काळात भोकरवाडीचे पाच समाजसेवक दुसऱ्या गावाहून बैलगाडीत मोठं तपेलं ठेवून पाणी आपल्या गावात ठरवतात.त्याच शुभ दिवशी काय घडतं यांचा अहवाल ‘भोकरवाडीतील समाजसेवा’या कथेतून समजते.तर शेरास सव्वाशेर ही म्हण साध्य करणारी चेकमेट देणारी जबरदस्त कथा ‘आय विटनेस’.
द.मा.मिरासदार यांच्या कथा ग्रामीण ढंगदार बेरकीपणा उलगडून दाखविणाऱ्या आहेत…सर्वच कथा वाचनीय आहेत.
परिचयक :श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक: ८ जानेवारी २०२५
खूप छान शब्दात पुस्तक परिचय👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete