पुस्तक परिचय क्रमांक:२०१ श्रीगणेशा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०१
पुस्तकाचे नांव-श्रीगणेशा
लेखक: शंकर पाटील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण डिसेंबर २०१७
पृष्ठे संख्या–१४८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०१||पुस्तक परिचय
श्रीगणेशा
लेखक: शंकर पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कायम अस्सल गावरान शैली अन् टवटवीत ताजेपणा टिकवून ठेवणाऱ्या खुसखुशीत खमंगदार विनोदी आणि इरसाल कथांचा मासलेवाईक नमुना आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे कथा-कादंबरी लेखक शंकर पाटील यांचा ‘श्रीगणेशा’हा कथासंग्रह. खेड्यातील माणसांना कथेचं नायिकत्व बहाल करुन त्यांचे अंतर्बाह्य स्वभावाची ओळख रसिक वाचकांना करून देणाऱ्या कथा असतात.
टिपिकल,इरसाल आणि बहुढंगी कथांची कथासंग्रहात मेजवानी आहे.आपण मनसोक्तपणे हसण्याचा आनंद वाचताना घेऊ शकतो.त्यांच्या कथांचे वाचन करताना गावच्या चावडीवर गप्पांची मैफिल सजली आहे.त्यात एकेकजण आपल्या भाषाशैलीत गावातल्या कानगोष्टी इतरांना सांगत आहेत असा भास निर्माण करणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तिंच्या गोष्टी आहेत.त्या खुमासदार शैलीत सादर केल्या आहेत.
त्यांच्या खुशखुशीत विनोदाच्या आडून गावच्या त्या काळातील वास्तवतेचे, सामाजिक विषमतेचे आणि गरीबीचे दर्शन घडते. त्यांची प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि हजरजबाबी चुरचुरीत विनोदाने बहरलेली असते.कथेच्यालेखनात सहजता उस्फुर्तता आणि सोपेपणा असल्याने या कथा वाचकांच्या मनाला भिडतात.
खरंतर गाव म्हणजे बहारदार कथांचा वाहता झराच असतो.शब्दांच्या फडात रमून कथांच्या मोळ्या अक्षरधनानी बांधणारा कसबी कथाकार वेगळ्याच गावची पाटलकी लाभलेले आदरणीय लेखक शंकर पाटील.
‘श्रीगणेशा’हा कथासंग्रह त्यांनी कथेच्या प्रवासाची आणि विकासाची आस्थेवाईकपणे काळजी घेणाऱ्या सर्व चोखंदळ रसिक वाचकांना आणि समीक्षकांना समर्पित केली आहे.
मुखपृष्ठावर ग्रामीण भागातील स्त्रिचं चित्र आणि मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’ चेहऱ्याच्या सौंदर्याचे वर्णन खुलावणारा आहे.तसेच त्यांच्या कथेत शेतकऱ्यांचे जीवन आणि गावातील अलुतेदार बलुतेदार यांच्या व्यावसायिक कथांचे प्रतिबिंब दिसून येते.
एकोणीस फक्कड कथांची मालिका या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.कथेच्या शिर्षकावरुन कथेचं बीज व माणसांचं व्यक्तिमत्त्व कसं असेल,हे वाचताना लक्षात येते.सेवानिवृत्त शाळामास्तरची पेन्शन मंजूर झालेली नसल्याने कुटूंबाच्या जीवन चरितार्थासाठी होणारी होरपळ ‘आधार’ कथेतून मांडली आहे. तर एखाद्या स्त्रीच्या नादी लागल्यामुळे धुळा पैलवान कुस्ती हारतो त्याचं खापर गंगीवर फोडतात ती कथा ‘किटाळ’. जांभळ्याला बैलगाडीच्या शर्यतीचा नाद खुळा असतो.त्यासाठी एक नंबरी पाखऱ्या बैलाची खरेदी करतो.त्या बैलाची आणि त्याच्या जोडीला घेतलेल्या चित्र्या बैलाची गोष्ट ‘जोड’कथेत आहे.लेखकाने मोत्या नावाचं एक कुत्रं लहानपणी पाळलं होतं. त्याचा लळा वडिलांना कसा लागला याची ‘सावली’ कथा. आईच्या पदराखाली वाढलेल्या शामूची कथा ‘वेड’.वयात आल्यावर प्रेमासाठी तो काय करतो त्याची एकांगी कथा.एखाद्याने आत्महत्या केल्याचे समजताच त्याला बघायला कशी तोबा गर्दी होते. आणि बघे त्याचा विषयी कशी चघळत चर्चा करतात ती कथा ‘चक्र’.
अहंभावी आपलच खरं असं म्हणणारी गौराकाकी,दोन प्रेमिकांची नखं कथा,
इनामदार आणि जांभळ्याच्या वर्चस्वाची गोष्ट ‘नशा’.गणपती नाव असणारी अनेक माणसं असतात.त्यांचा स्वभाव, बोलणं,दिसणं आणि राहणीमान यावरून त्यांना टोपणनावाने ओळख असते.एका म्हातारीला गणपती नावाच्या माणसाला भेटायचे असते.पण तो नक्की कोठे राहतो.कसा दिसतो.हे तिला माहित नसते.तेव्हा लेखक आणि म्हातारी यांच्यातील संभाषण कथा ‘गणपतीचा गाव’.हल्ली भावकीतली भांडणं गावचे पाटीलसुध्दा मिटवू शकत नाहीत. काशीबाई आणि रामूची ती कथा ‘रामराज्य’.नमुनेदार कथा वाचताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते. अप्रतिम!ग्रामीण जीवनशैलीचे शब्दचित्र उभे करणाऱ्या कथा‘श्रीगणेशा’ कथासंग्रहात आहेत.
परिचयकर्ते:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:२२ जानेवारी २०२५
Comments
Post a Comment