पुस्तक परिचय क्रमांक:१९४चिकन सूप फॉर द टीनएज सोल भाग -२
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९४
पुस्तकाचे नांव-चिकन सूप फॉर द टीनएज सोल भाग-२
संपादन व संकलक- ‘जॅक कॅनफिल्ड’,’मार्क व्हिक्टर हॅन्सन’ आणि ‘किम्बर्ली किर्बर्जर’
अनुवादक -अवंती महाजन
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती ऑगस्ट २०१७
पृष्ठे संख्या–१५८
वाड़्मय प्रकार- अनुवादित कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९४||पुस्तक परिचय
चिकन सूप फॉर द टीनएज सोल भाग-२
संपादन व संकलक- ‘जॅक कॅनफिल्ड’,’मार्क व्हिक्टर हॅन्सन’ आणि ‘किम्बर्ली किर्बर्जर’
अनुवादक -अवंती महाजन
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जीवन,प्रेम आणि शिकणं या विषयीच्या अनुभवाधिष्ठीत गोष्टी.किशोरवयातील भावभावनांचा उत्कट आविष्कार, आयुष्याच्या प्रवासातील किशोरवय हा नाजुक अन् हळवा टप्पा.एकीकडे जाणिवा उमलत असतात.डोळ्यात नवी स्वप्नं हसत असतात.त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाऱ्या,धीर देणाऱ्या,आधाराचा खंबीरपणे हात देणाऱ्या,उमेद चेतवणाऱ्या, दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या,पाय रोवून ठाम उभे राहायला शिकवणाऱ्या या कथा आहेत. मनाशी हळूवार संवाद साधित निखळ मैत्रीची अनुभूती देतात. चेहऱ्यावर स्मित हास्य फुलविता फुलविता नकळत डोळ्यांच्या कडा पाणवतात..इतक्या सुंदर कथा या पुस्तकात आहेत.
या पुस्तकाचे संपादन आणि संकलन ‘जॅक कॅनफिल्ड’,’मार्क व्हिक्टर हॅन्सन’ आणि ‘किम्बर्ली किर्बर्जर’ यांनी केले असून या पुस्तकाच्या अनुवादक अवंती महाजन आहेत. प्रारंभीच लोकप्रिय अभिनेत्यांचे अभिप्राय आहेत.या अभिप्रायातून किशोरवयीन मुलांच्या विश्वातील अनुभव अधोरेखित होतात.या वयातील मुलांची बुद्धीमत्ता व दृष्टी , भावना आणि मैत्री यांचे बीज भांडवल असलेल्या कथा एकापेक्षा एक सरस आहेत. या पुस्तकाची लोकप्रियता अभिप्राय व मलपृष्ठावरील ब्लर्बने उठावदार मृदांकित केली आहे.
संपादकांनी ईश्वराला हे पुस्तक समर्पित केले आहे.ज्या मुलांनी पहिलं पुस्तक वाचून;आपल्या कथा-कविता संपादकांना पाठविल्या आणि वेळात वेळ काढून आभाराची पत्रे आवर्जून पाठविली. अश्या टीनएजरना हे पुस्तक समर्पित केले आहे.
अनुवादक अवंती महाजन यांनी मनोगतात या पुस्तकाचे कथासार आणि टीनएजर मुलांचे विश्व सुंदर शब्दात मांडले आहे. हे वय म्हणजे केवळ मौजमजा मस्ती करत मुक्तपणे जीवनात रममाण होणं नसून प्रेम भावनेतून जुळलेली विशुद्ध मैत्री टिकवणे. प्रेमभावनेची ओळख करून घेणे. कुटूंबातील नात्यांचा अर्थ, जबाबदाऱ्या, समस्या, संघर्ष यांची जाणीव होण्याचा काळ,हक्क आणि कर्तव्ये समजून घेणे.स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ध्येय साध्य करणे.
भोवतालचं जग दिवसेंदिवस विस्तारत असतं.नव्या गोष्टींचा परिचय होतो.अपार कुतूहल निर्माण होतं. सळसळणारं रक्त आणि शिवशिवणारे हात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगतात. महत्वाकांक्षांना धुमारे फुटतात.झोकून देऊन काही करताना श्रमनिष्ठेचे बीजांकुरण होत असते.भारतीय संस्कृती मानते ती मुलांची पौगंडावस्था.टीन एजला समांतर अशी ही कल्पना आहे.
मुलांच्या दृष्टीने कुटूंबाची अशी साथ , मैत्रीचा हात,समाजाचं भान आणि जबाबदारीची जाण असणारा काळ सुखाचा!!!या पुस्तकातील आशयघन कथा किशोरवयीन मुलांना आपल्या वाटतील.मार्ग दाखवतील.अन् प्रेरणा देतील.
यातील सर्व कथा चार विभागात विस्तारलेल्या आहेत.नातेसंबंध, मैत्री , कठीण समय येता आणि प्रेम व हृदयता."सर्व ऋतूंमध्ये येणारे आणि प्रत्येक हाताच्या आवाक्यातील फळ म्हणजे प्रेम".-मदर तेरेसा यांच्या विचारांवर आधारित नातेसंबंधाच्या कथा आहेत.तर मैत्री प्रेममय कथा ,"आपल्या मनात प्रत्येक मित्राचं असं एक जग असतं.तो भेटेपर्यंत एखाद्या वेळी ते जन्मलेलंही नसतं,पण फक्त त्या भेटीमुळेच हे जग मनात जन्म घेतं!'' अॅनिस निन या सुविचाराप्रमाणे 'मैत्री'च्या कथा आहेत.
यातील कथा छोट्या-छोट्या,काहीतर केवळ एखादा प्रसंग वाटावा अशा;पण मुलांच्या मनात खळबळ माजवण्याचं सामर्थ्य कथेत आहे.टीनएज मधल्या मुलांचं अवघं भावविश्व आपल्यापुढे खुलं करणाऱ्या या कथा आहेत. किशोरवयातील मुलांसाठी एखाद्या आरशासारख्या .प्रत्येकाला आपण त्यात कुठेतरी दिसूच,अशा! पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद साधणारा कथासंग्रह वाचनिय आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक: ३०डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment