पुस्तक परिचय क्रमांक:१९६ झोपाळा
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-१९६
पुस्तकाचे नांव--झोपाळा
लेखकाचे नांव--व. पु. काळे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण ऑक्टोंबर,२०१८
एकूण पृष्ठ संख्या-१२२
वाङ् मय प्रकार ---कथासंग्रह
मूल्य--१२०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚
१९६||पुस्तक परिचय
झोपाळा
लेखक-व.पु.काळे
#########################
‘वपु’ या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या कथामहर्षी वसंत पुरुषोत्तम काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र रसिक चाहता वर्ग आहे.वपुंचे नाव कुणाला माहीत नाही,मात्र त्यांचे विचार अनेकदा व्हाट्सअप,फेसबुक,स्टेटसवर गुडमॉर्निंग गुडनाईटच्या संदेशात वाचायला मिळतात. 'वपु'म्हणजे शब्दांचे महाल बांधणारे वास्तुविशारद. वपुंचे साहित्य वाचणारा माणुस तर त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्यांचे लिखाण आयुष्याला प्रेरणा देते.अन् मरगळलेल्या मनाला नवी ऊर्जा देते. अशी अक्षरसाधना ‘झोपाळा’या कथासंग्रहात प्रतिभासंपन्न साहित्यिक तथा कथाकार व.पु.काळे यांनी रेखाटलेली आहे.
मनाच्या विविध रंगछटांचे दर्शन या पुस्तकातून घडतं.यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा हुंकार वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेस जगणाऱ्या मनस्वी व्यक्तींच्या,मनस्वीकथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वतःचा शोध घ्यायला भाग पडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव,सुखदुःखे,त्यांचे समस्या,यांचे ध्येय,त्यांची स्वप्ने ही खरंतर आपल्या आजूबाजूलाच असतात.त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याची प्रतिबिंब बघितलेले असते.म्हणूनच ती माणसं आपल्याला आपलीशी वाटतात. छोट्याशा कथाबीजाला फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला खरोखरच वेगळेच बळ देतो. अतिशय सुंदर असा कथासंग्रह‘झोपाळा’ आहे.
या पुस्तकात नऊ कथांची मालिका आहे.
वाचक रसिक वपुंचा अप्रतिम कथा पॅटर्न सदैव वाचतच राहणार…त्यांच्या विचारांचा प्रभाव कथेतून जाणीव करत राहतो.झोपाळा,अमिताभ -चिंटूचे चार दिवस,श्रोता, किस्सा कुर्सीका, माया,एक मोती चिमणीचा, ऐकावे जनाचे, श्रीमंत रघुनाथराव पेशवे आणि एक क्षण भाळण्याचा या नावाने कथांची मालिका आहे.
‘झोपाळा’ कथेत ललित शहाच्या पुर्व रंगातील किशोर आणि कुमारवयातील प्रेमिकांचा पंचवीस ते तीस वर्षांनंतर गाठभेट होते.पुर्वीचे प्रसंग डोळ्यांसमोर तो मित्रांसोबत शेअर करत असतो त्याची कथा.माणसाला माणूस का म्हणावे हा विचार अधोरेखित करते.लेखक मित्र सोनटक्के यांची पत्नी आणि मुलगी अमिताभच्या अभिनयाचे फॅन असतात. अमिताभच्या सिनेमातील एका दृश्याचे शुटिंग आपल्या घरात घेण्याची परवानगी मिळवितात.मग काय काय घडतं याचं आँखो देखा वर्णन ‘अमिताभ-चिंटूचे चार दिवस’या कथेत शब्दबध्द केले आहे.तर ‘श्रोता’कॉफीहाऊसमध्ये नित्यनेमाने येणाऱ्या कॅप्टनची रहस्यमय कथा आहे.
अति झाल्यावर खुर्च्यासुध्दा संप कसा पुकारतात आणि देवानं वर दिल्यावर समाजसेवेऐवजी स्व:ताचेच घर कसं पुढारी संपतराव भरतो? ती कथा ‘किस्सा कुर्सीका’ समर्पक शब्दात गुंफलेली आहे.पतीपत्निचं प्रेम कसं खुलत रहावं याची जाणीव करून देणारी कथा ‘माया’.
चिमणीला मोती सापडतो पण तिच्या घरट्यातून कावळा उचलून नेतो.तो मोती मिळवण्यासाठी चिमणी काय करते.ते ‘एक मोती चिमणीचा’या कथेतून समजते.
तर वजन वाढलं की पोट सुटतं.ते कमी करायला सकाळी चालण्याचा व्यायाम करावा असे अनेक जण सुचवतात तर काहीजण टिंगलही करतात…फिरण्या ऐवजी येथेच्छ पंचपक्वान्नापासून भेळ पाणीपुरी ते पावभाजीपर्यंत जे निरनिराळे शोध लागले.ते खाणाऱ्या माणसांमुळे.डायटिंग करणाऱ्यांमुळे नाही.यामुळे ऐकावे कुणाचे हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
अतिशय सुंदर कथांची भेट ‘झोपाळा’ पुस्तकातून मिळते…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक: ३जानेवारी २०२५
Comments
Post a Comment