पुस्तक परिचय क्रमांक:१९५ फक्कड गोष्टी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९५
पुस्तकाचे नांव-फक्कड गोष्टी
लेखक: शंकर पाटील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जानेवारी २०१९
पृष्ठे संख्या–१४६
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९५||पुस्तक परिचय
फक्कड गोष्टी
लेखक: शंकर पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
लोकप्रिय ज्येष्ठ ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या कथेत एक स्वर हास्य उमटविणारा तर एक स्वर दु:खाचा असतो.त्यांच्या कथेला विनोदी ढंग असतो.ती कथा वाचताना चेहऱ्यावर हास्य फुलत राहते.हास्याची अनंत बीजं असणाऱ्या विविध जाणिवांतील गमती जमती आणि विसंगती ह्या त्यांच्या कथांचे बीज आहे.किंवा मध्यवर्ती घटना प्रसंग कल्पना आहे.मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या नमुनेदार,इरसाल अन् फक्कड सगळ्या कथा “फक्कड गोष्टी”या कथासंग्रहात आहेत. लेखक शब्दांच्या फडात कथांच्या गुजगोष्टी करणारे आहेत. त्यांच्या प्रत्येक कथेतून गावचं तऱ्हेवाईक वर्तन करणारं पात्र आपल्यासमोर लेखणीतून त्यांनी उभं केलं आहे.इतकं दमदार आणि सकस लेखन त्यांचे आहे.जणू अस्सल व्यक्तीचित्र उभं ठाकतं. खेड्यातल्या माणसातून ते गावच्या संस्कृतीतलं चालतं बोलतं वर्तन ते सुंदर शब्दात टिपतात.या पुस्तकातील त्यांच्या कथा म्हणजे चतूर,खट्याळ आणि मिस्कील कथांचे सुग्रास भोजन केल्या सारखं वाटतं.वाचताना हसून हसून पुरेवाट होते. अन् हसता हसता चिंतन करायला लावते.इतकी ताकद कथांमध्ये भरलेली आहे.सामाजिक जाणिवा अधोरेखित करणाऱ्या 'ग्रामसंस्कृती' तल्या गोष्टी खुमासदार शैलीत गुंफलेल्या आहेत.
मुखपृष्ठावर नजर गेली की आपसूकच हास्याची लकेर गालावर उमटते.गावात जत्रंखेत्रला विविधांगी खेळ अथवा शर्यती असतात त्याचप्रमाणे काही नामांकित गावात बैलांच्या टकरांचे (धडका) मैदान भरवतात.त्याचे आकर्षक चित्र रेखाटले असून एका डिरक्या बैलांनं एकाला शिंगावर कसं उचललं आहे;त्यांचे चित्र रेखाटले आहे.’टकरा’कथेचं रंगीत छायाचित्रे अप्रतिम आहे.त्यातूनच कथा कशी फक्कड इरसाल मासलेवाईक असेल याची प्रचिती येते.तर मलपृष्ठावर ‘ब्लर्ब' कथासार संक्षेपाने अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.
कथाकथन आणि कथा लेखनात मिरासदारी असणाऱ्या द.मा.मिरासदार यांना ‘फक्कड गोष्टी’हा कथासंग्रह समर्पित केला आहे. कारण एक तपाहून अधिक काळ लेखक शंकर पाटील यांचा स्नेह अभंग आहे!
गावातल्या इरसाल रत्न जी गावाहून ओवाळून टाकलेली असतात.त्यांची बढेजावी सर्वच कथांमध्ये पानोपानी दिसून येते.एकंदर चौदा करांची मालिका या पुस्तकात समाविष्ट केली आहे. अतिशय मिश्कील कथा आहेत. ‘ब्राॅडगेज’ कथेत आपल्या गावातून रेल्वेलाईन जाण्यासाठी दिन्नूइटू काय काय दिव्य करतो.त्याची सुरस कथा उत्कंठावर्धक आहे.पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्राचा आशय ठळक करणारी ‘टकरा’कथा.गावात माध्यमिक विद्यालय उघडून मुलांच्या शिक्षणाची सोय करायची.पण ते विद्यालय नियमित सुरू राहण्यासाठी ‘बापूजी’गावात बैलांच्या टकरांचे मैदान भरविताना काय काय ? करावे लागते.त्या कथेचं समालोचनाची कथा ‘टकरा’.अण्णा डोईफोडे या बेरक्या
गावपुढाऱ्याची कथा ‘अपील’.तर गावातील पंचरत्न गावची गाळीव पंचरत्ने.दारुपिण्यासाठी दिल्लीला जाऊन तिथं मद्यपान कसं करतात.अन् पंतप्रधानांना भेटायसाठी काय शक्कल लढवून किल्ला सर करतात.ती कथा म्हणजे ‘डेलिगेशन.’
फ्रंटशीट कथा टांगेवाला आणिअनोळखी सावित्री यांचं सुत कसे जुळते. ते उलगडून दाखविणारी ‘फ्रंटशीट’ कथा.फारच वेगळी वाटते.तर जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधायचे असते.पण ते पाडण्यासाठी मानाजी घरात भला मोठा भुजंग घुसल्याचे बायकोला सांगतो.अन् ती सगळ्यांना साप घरात शिरल्याचे सांगत सुटते. शाळेतली मुलं व गावकरी सापाला पकडण्यासाठी भिंती कश्या जमीनदोस्त करतात ती कथा ‘शक्कल’.जमीनदार नानासाहेबांचे धाकटे दिवटे चिरंजीव मानसिंग यांच्या खट्याळ आणि खोडसाळ नादीक वृत्तीने बापाला कसे हैराण करतात.ती गोष्ट ‘शेंडेफळ’.
जंगलात रामायण मालिकेचे शुटिंग झाल्यावर बैठकीला बसल्यावर महाभारत काय घडले.याचे वर्णन वाचताना पदोपदी घटनाच डोळ्यासमोर उभी राहते.इतकं अस्सल मराठमोळं लेखन ‘रामायणाचे महाभारत’या कथेत मांडले आहे.
सरपंच अण्णा हगवणे खानावळीत राईस प्लेट खाताना भाजी संपली म्हणून मागितली तेव्हा खानावळवाळ्याने त्यांचा भाजी न देता अपमान केला म्हणून त्याला हिसका दाखवण्यासाठी गावच्या खादाड बाळा बसवन्नाला घेऊन जातात. मग तिथं पोटाला तडस लागेपर्यंत तो खानावळीतल्या सगळ्यांची कशी भंबेरी उडवतो ती कथा ‘हिसका’.तसाच एक अवलिया पदार्थ खाण्याची भरमू पैज जिंकणारच.तो भरमू एकदा आधिलीभर (सहाशेर) उसाचा रस पिवून,तो पैज जिंकतो.पण त्याला अस्वस्थ वाटते.मग त्यावर इलाज काय केला?ती कहाणी ‘पैज’ कथेत गावरान भाषेत रेखाटली आहे.तर ‘एक अमर कहाणी’ लेखकाच्या मातेस आठवं अपत्य नको असते.ते पोटातून नाहिसं करण्यासाठी,ती काय काय उपाय योजते.तरीही लेखकाचा जन्म होईल जीवनात आलेल्या संकटावर मात करत ते भाग्यवान लेखक होतात.ती चित्तरकथा उत्तरार्धात आहे.
या पुस्तकातील बकरा,नहाण आणि बदल यासुद्धा वाचनिय आहेत.खरचं लेखक शंकर पाटील यांच्या ग्रामीण जीवनातील कथा वाचताना आपल्याला हसत हसत त्या काळच्या सामाजिक जाणिवांवर मंथन करायला उद्युक्त करतात…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:१ जानेवारी २०२५
Comments
Post a Comment