पुस्तक परिचय क्रमांक:२०० मित्रांना शत्रू करु नका!

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-२००
पुस्तकाचे नांव-मित्रांना शत्रू करु नका!
लेखकाचे नांव--डॉ.आ.ह.साळुंखे
प्रकाशक-लोकायत प्रकाशन, सातारा 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती२००८ , पुनर्मुद्रण:फेब्रुवारी २०१९
एकूण पृष्ठ संख्या-७२
वाड्मय प्रकार --वैचारिक लेखन 
मूल्य--७०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
   २००||पुस्तक परिचय
    मित्रांना शत्रू करु नका 
लेखक- डॉ.आ.ह.साळुंखे
 #########################
मैत्रीच्या नातं वाढवायला, टिकवायला अन् 
जपायला खूप काही आवश्यक असते.ती मोडायला, संपवायला एखादा शब्द,एखादं पाऊल, एखादा क्षण पुरेसा होतो.ती जपली जपली,तर जीवनाचा जमाखर्च फायद्याचा, नाही तर….?
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत तथा लेखक आदरणीय डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या वैचारिक ‘मित्रांना शत्रू करु नका!’या पुस्तकातील आशय वाचण्याची उत्सुकता 
निर्माण करतात.पुढे ते म्हणतात की, “आपल्या आयुष्यातआपण ज्यांच्याबरोबर कधी काळी एक पाऊल का होईना टाकलं असेल,एकाच वातावरणात एक श्वास का होईना घेतला असेल, त्याच्यापासून नंतरच्या काळात आपण काही कारणाने दूर आलो असलो,तरी आपण त्या एका पावलाची, त्या एका श्वासाची आठवण जरुर जपावी.”
‘’कृतज्ञतेच्या भावना म्हणजे मनाचं सौंदर्य आहे.तो आपल्या अंतःकरणाचा मधुर स्वाद आहे.तो आपल्या काळजाचा सुगंध आहे.तो आपल्या मनुष्यत्वाचा स्पर्श आहे, आप अस्तित्वाचे संगीत आहे…’’किती सुंदर विचार,कृतज्ञतेविषयी व्यक्त केले आहेत.
पुढे ते म्हणतात की,“परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना माझी अंत:करणापासून विनंती वा ‘प्रार्थना’ कळकळीने करतो की, आपल्यापैकी अनेक जण मित्रांना शत्रू करण्याच्या कलेत अत्यंत धुरंधर पारंगत असतात.पण हा मार्ग आपला नव्हे,तर आपल्या विरोधकांच्या यशाकडे घेऊन जाणारा आहे.मैत्रिचा स्नेह चिरंतर रहावा म्हणून या पुस्तकातून आपणाशी संवाद साधत आहे.
 मनोगतात त्यांनी या पुस्तकाचे सार समर्पक शब्दात व्यक्त केले आहेत.आपली लेखन शैली कशी असावी. ज्ञानोपासक कसे असणं आवश्यक आहे.याचे व्यक्तिगत अनुभव लेख स्वरूपात मांडले आहेत.आपण प्राप्त केलेले ज्ञान व्यवहारातील घटनाप्रसंगी कसं वापरायचं यासाठी लेख उपयुक्त ठरतील असे त्यांना वाटत आहे.ग्रामीण भागातील युवक आत्मभानाने विविध क्षेत्रात चमकतआहेत.
आत्माविष्काराची उत्कट इच्छा त्यांच्या मनात निर्माण होतेय.त्यातूनच ते आपले वास्तव अनुभव लोकांपुढे मांडत आहेत.
आपले विचार शिस्तबद्ध शैलीत मांडणे. आपले यश अधिक उंचीवर ठेवून जीवन आनंदी करता येतं,या भावनेने ‘मित्रांना शत्रू करु नका’या पुस्तकाचे लेखन केले आहे.
विचारांचे सौंदर्य पंधरा लेखात गुंफले आहे.वैचारीक लेखनाला श्रीगणेशा केलेल्यांनी लेखनशैली कोणत्या कसोटीने शब्दबध्द करावी याचे मुद्देसूद स्पष्टीकरण केले आहे.ज्ञान घेत असताना अज्ञानाचं भान असणं का आवश्यक आहे हे सोदाहरण पटवून दिले आहे.परिपूर्ण ज्ञानापर्यंत जायचं असेल, तर आपल्याला स्वतःकडं असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा कळणेआवश्यक आहे.अज्ञानाचंअस्तित्व, स्वरूप, प्रमाण आणि व्याप्ती यांचंही भान असणं महत्त्वाचं आहे.
तर ‘चिकित्सेचा अधिकार वापरायचा-पण त्याआधी कष्टपूर्वक प्राप्त करायचा’या लेखात आपण घेतलेली माहिती तपासून घेणं महत्त्वाचं आहे.तरच यथार्थ ज्ञान मिळते.यासाठी पुढील पायऱ्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे.चिकित्सेचं पध्दती शास्त्र शिकणे.चिकित्सा करण्याचा आवाका हवा,मत मांडणाऱ्या व्यक्तिपेक्षा मताचा दर्जा महत्त्वाचा आहे.ज्याचं जेवढं श्रेय,तेवढं त्याला देणं, उद्दिष्ट निकोप असावेआणि सरशेवटी चिकित्सा करताना मोघम,धसमुसळेपणानं नकरता मुळाशी जाऊन सूक्ष्मपणे समर्पक शब्दात मुद्दे खोडून काढावेत.
अज्ञानाचं भान ठेवण्यासाठी ‘जिज्ञासा ते उपयोजन’या लेखात ज्ञानप्रक्रियेचं स्वरूप विषद केले आहे.यामध्ये ज्ञान जाणणे म्हणजे जिज्ञासा, चयन,प्रयत्न,आकलन, निर्दोषीकरण, वर्गीकरण, धारण,स्मरण,उपयोजन.ज्ञानाचीप्रक्रिया उपयोजनाजवळ न संपता नवनिर्मितीक्षमता असणे हा ज्ञानप्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे.नवनिर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिमा. बुध्दिमत्तेची सर्वोच्च अवस्था होय.
नवनिर्मितीत उपक्रमशीलता, कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता असली पाहिजे. पुनर्मांडणीचे विविध प्रकार अजमावून घेतले पाहिजेत.सर्जनाबरोबर विसर्जन व नूतनीकरण हा देखील नवनिर्मितीचा प्रकार आहे.नावीन्याला नकार देऊ नये.अनिष्टाची निर्मिती करण्यात धोकादायक ठरू शकते.खरं म्हणजे माणसांत ‘मनुष्यत्वा’चा बहर आणणं,ही सर्वात प्रिय नवनिर्मिती आहे.
‘बॅरन ब्युटी नव्हे व्हर्जिन ब्युटी’हिमालयाचे विलोभनीय दृश्य व दर्शन देत विचारांची मिमांसा या लेखात केली आहे.हिमालय पर्वतावर असंख्य ठिकाणी गवतही नसलं तरी त्या पर्वताचे सौंदर्य आपणाला भुरळ घालतेच.स्थूल दृष्टीच्या, ढोबळमानानं पाहणाऱ्या,निर्मितीविषयी चाकोरीबद्ध भूमिका असलेल्या लोकांसाठी त्यापलीकडे जाऊन आनंदनिर्मितीच्या सूक्ष्म छटांना कृतज्ञतेनं, भावुकतेने, रसिकतेने दाद देणारे लोक मात्र त्या विस्मयकारक सौंदर्याच्या अंतर्यामी असलेली अपार निर्मितीक्षमता अतीव आनंदाने अनुभवतील यात शंकाच नाही.
आपण स्वतः:च चांगल्या, हितकारक गोष्टींना मुकू नये किंवा नकार ताणू नये. आपल्याकडे येणारं अपायकारक असेल ते दूर अडवले पाहिजे.पण प्रकाशकिरण येण्याच्या वाटा मात्र कधीही बंद करु नये.
त्या वाटा जर बंद केल्या,तर प्रकाशाचं काही नुकसान होत नाही,पण आपल्या भोवतीचा अंधार मात्र गडद होतो! अप्रतिम विचारांचे दर्शन वरील लेखातून घडते.स्वानुभव उदाहरणे देऊन ते पटवून दिले आहे.
आपण प्रवास करत असताना रस्त्यावरुन अनेक प्रकारची वाहने ये-जा करत असतात.या वाहनांवर बहुतांश मागील बाजूस वचन, सुविचार किंवा एखादी ओळ लिहिलेली असते.याविषयाचे ‘हे’ही कवी आणि तत्त्ववेत्ते आहेत’या लेखात ती वचनं लिहिण्यापाठीमागची भावना अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे. तसेच समर्पक उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले आहे.उत्तम लोकसंपर्क करून यशस्वी होणाऱ्या लोकांच्या संपर्कशैलीकडं पाहिलं,तर ते अनेकदा आपल्या शत्रूंनाही मित्र बनवतात.पण काही वेळा सामाजिक बांधिलकी मानणारे,तत्त्वनिष्ठा आचरण असणारे स्वभावातील अनुचित आक्रमकतेला आवर घालता न आल्याने नात्यांचा सत्यानाश करुन टाकतात.आपण इतरांशी संवाद साधताना आपलं बोलणं काळवेळ पाहून विषयानुसार आवश्यक असावे. पण त्या बोलण्याने इतरांना काळजीत पाडू नये.तसेच ज्यामुळे आपणास चिंता लागून राहते.त्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजेत.तर ज्यांच्या मुळे आपल्याला फायदा झाला असेल त्याची आठवण सदोदित ठेवली पाहिजे.
अतिशय सुंदर विचारांचे मंथन करायला उद्युक्त करणारे सर्वच लेख आहेत.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:१४ जानेवारी २०२५



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड