पुस्तक परिचय क्रमांक:२३८ कथाकथनाची कथा



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३८
पुस्तकाचे नांव-कथाकथनाची कथा 
लेखक:व. पु. काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, डिसेंबर ,२०१८
पृष्ठे संख्या–१८६
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह 
किंमत /स्वागत मूल्य-१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३८||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-कथाकथनाची कथा 
लेखक: व.पु.काळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚 तमाम रसिक वाचक आणि श्रोत्यांना आपल्या वाणी आणि लेखणीने भुरळ घातलेले सुप्रसिद्ध कथाकथनकार तथा लेखक व.पु.काळे यांच्या कथांचा अंतरंग उलगडून दाखविणारा एक बहारदार कथासंग्रह ‘कथाकथनाची कथा’. कथाकथन करताना श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही.सतत दोनतीन तास कथेच्या विषयात गुंतवून ठेवायला लागतं.त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घडलेले अनेक किस्से या कथेतून शब्दबध्द केले आहेत.आयोजक संयोजक यांचे कार्यक्रम ठरविण्याच्यावेळीचं आणि कार्यक्रमानंतरचं वागणं.कार्यक्रमानिमित्त झालेल्या रेल्वे प्रवासातील सुखदुःखाच्या प्रसंगाची गुंफण अतिशय समर्पक शब्दात केली आहे.ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते.तेथील यजमानांनी केलेलं आदरातिथ्य तसेच इतर महान साहित्यिकांच्या सोबत घडलेले किस्से यांचेही वास्तवपणे लेखन यातील कथांमधून प्रकटते.असा कार्यक्रमापूर्वीची तयारी,प्रत्यक्ष कार्यक्रम सादरीकरण आणि उत्तरार्धात घडलेल्या प्रसंगांची पोतडी या कथासंग्रहातून आपल्याला भेटत राहते.
कथा जगलेला कथायात्री म्हणजे व.पु. काळे.
कथा कथन करणे.ही एक कला आहे. कथा वाचणे,पाठ केलेली म्हणणे आणि प्रेक्षकांचा कल पाहून कथा सादरीकरण हे वेगवेगळे आहे.विनोदांचे फवारे उडवित हसवता हसवता एखादं शल्य मनात भिडतं.आणि तेच ऐकणाराला अन् वाचणाराला चटका लावून जातं.अशा एकसोएक कथा.त्यांच्या कथांमधून विचारांचा गंध दरवळत राहतो.तर मानवी मनाचे अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या कथा आहेत.
           कथाकथनकार व.पुं.काळे यांनी अनेक साहित्यिकांसोबत कार्यक्रम सादर केले आहेत. सर्वश्री शंकर पाटील, गदिमा, द.मा.मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, आशा काळे अशी कितीतरी नावे आहेत.संपादक महाशय त्यांना ‘कथाकथन’या विषयावरील लेख मागतात.तेंव्हा त्यांची पंचाईत होते.खरतरं कथाकथन यावर कथन आणि लेखन या ललित कलांविषयी लिहिणं म्हणजे गोंधळात टाकणारा विषय. लेखन करणं म्हणजे विचार करून लिहावं लागतं.ते म्हणतात की, “कथन ही परफॉर्मिंग आर्ट आहे.”कथन हा त्यांचा अडीच तपांचा आनंदप्रवास आहे.
 त्यांनी केलेल्या कार्यक्रमातील हकिकती काही मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना आणि संयोजकांना पाठविलेल्या पत्रांचा उलगडा यातील बऱ्याचशा लेखातून आपणास समजतो. कथाकथकनाचे अनुभव कथन या कथांतून उलगडत जाते. 
 हे पुस्तक साहित्यक्षेत्रातील दिग्गज श्री व्यंकटेश माडगूळकर,श्री द.मा.मिरासदार, श्री शंकर पाटील ह्या कथाकथनकारांना आणि कथा कॅसेट्समधून घरोघरी नेणाऱ्या श्री सुरेश अलुरकरांना हा कथासंग्रह अर्पण केला आहे.
चिंचोरे मास्तरांचे कथाकथन त्यांना शाळकरी वयात शाळेत,धड्यांचा अनुभव घेताना ऐकायला मिळाले. 'कथाकथनाची कथा’या कथासंग्रहातील ‘पानिपत’, ‘कार्यक्रम कसा झाला,कळव’,’परतीचा प्रवास’, ’खुर्चीच हवी…’, ‘प्रश्न सोपा असतो’, ‘संख्येवर काय आहे?’, ‘कविता म्हणजे माणसं!’कोणे एके काळी’, ‘आकाशाचे हात’अश्या अनेक कथांतून 
कथाकथन आमचे मर्म नेमकेपणाने व्यक्त केले आहे.बरेचशी त्यांची पत्रेच या कथांतून शब्दबध्द केली आहेत. 
 कथाकार श्री व.पु.काळे यांच्या कथांचा आस्वाद घेणाऱ्यांना हे पुस्तक म्हणजे लिखित साहित्याची मेजवानी मिळते.यातील कथाकथनकार व.पु.काळे यांच्या कथा कथन कलेचा सर्वंकष आस्वाद या पुस्तकातून लाभतो…अतिशय सुंदर पुस्तक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २१जुलै २०२५








Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड