मीना मावशी एकसष्ठीपुर्ती सोहळा
अभिनंदन संदेश – मीनामावशीच्या एकसष्ठीपूर्ती निमित्त 🌸
प्रिय मीनामावशी,
सस्नेह नमस्कार!
जीवनाच्या या सुंदर प्रवासात एकसष्ठीचा सुवर्ण टप्पा गाठल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या प्रेमळ सहवासामुळे आमचं आयुष्य नेहमीच आनंदाने बहरलं आहे.
देवाच्या कृपेने तुमचं आयुष्य निरोगी, सुखी, समाधानाने आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
हीच आपल्यासाठी आमच्या सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं आजवरचं आयुष्य प्रेम, त्याग, कष्ट आणि आनंदाचं सुंदर दर्शन घडवणारं आहे.
आगामी जीवनप्रवासही तुमच्यासाठी आरोग्य, आनंद,शांती आणि समाधानाने भरलेला असो, देव चरणी अशीच प्रार्थना!
"साठ वर्षांचा प्रवास गोड,अनुभवांच्या मोत्यांनी सजलेला ठसा गोड!
आता आयुष्याचा नवा अध्याय फुलू दे,
सुख,शांती,आरोग्य,आनंद तुमच्या सोबत असू दे!"
कष्टाचं जीवन जगत असलेल्या मातापित्यांच्या पोटी तुझा जन्म झाला.पोरसवदा वयातच भट्टीवर विटा उचलणं, शेतात भांगलायला जाणं.या साऱ्या कामांनी तुम्ही बहिणभावंडांनी आई-वडिलांच्या संसाराला मोठा हातभार लावलात.
कालौघात एकाच मांडवात तुम्हा दोघी बहिणींचा शुभविवाह सोहळा ओझर्डे येथे संपन्न झाला.आणि तू डांगरे घराण्याची सून झालीस. अरुणकाका म्हणजे तुझ्या मामाचा मुलगा.तिथेही तू पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतीस. मला आजही आठवण येते.की तुमचा गोडोली नाक्यावरील चहा- भजीपावचा गाडा, भाजीपाल्याची गाडी, रिक्षाचा व्यवसाय,काकांची फोटोग्राफी हे सारे व्यवसाय आजही आठवतात. कष्ट करत सुखासमाधानाने जीवन जगत राहिलात.
तुमच्या संसारवेलीवर मनोज आणि मनिषा ही दोन अपत्यं उमलली,पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी पिंगा घालित होतं.अचानकपणे काकांचे निधन झालं आणि संसाराच्या गाडीचं एक चाक निखळून पडलं.पण पतीच्या अकाली निधनानंतर तू दोन्ही मुलांना आईच्या मायेसोबत बापाचही प्रेम दिलेस.घराची सर्व जबाबदारी तू खांद्यावर घेऊन येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिलेस.प्रपंच चालवण्यासाठी घरगुती खानावळ सुरू केलीस, छोटासा स्टॉल उभारलासआणि त्यातील उत्पन्नातून हळूहळू संसाराला आकार दिलास.दोन्हीही मुलामुलांची लग्ने छोटेखानी समारंभात साजरी केलीस.
त्यांचा संसार सुरळीतपणे चालावा यासाठीही तू सतत कामाच्या धबडग्यात राहिलीस.आताआजी होऊन नातवंडांमध्ये रमली आहेस,पण साठ वर्षे झाली तरी तुझं कष्टाचं जगणं कमी झालेलं नाही.
मी डी.एड. करत असताना, तुम्ही दोघांनी मला गोडोलीत राहण्याची आणि जेवणाची सोय घरच्यासारखी केली होती, हे तुमच्या दोघांच्या उपकाराचं ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.
मावशी,साठ वर्षांच्या काळात तू खूप कष्ट केलास.परमेश्वर तुला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवो!,हीच मनःपूर्वक शुभेच्छा! मनोज आणि मनिषाने तुझा एकसष्ठीपूर्ती सोहळा आयोजित करून तुझ्या जीवनात आनंद पेरण्याचा आणि उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
🌺 पुनश्च,एकसष्ठीपूर्ती निमित्त तुला आभाळभर शुभेच्छा! 🌺
शुभेच्छुक :
श्री.रविंद्रकुमार गणपत लटिंगे
ओझर्डे, वाई
Comments
Post a Comment