पुस्तक परिचय क्रमांक:२३७ सूत्रसंचालनाविषयी सर्व काही
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३७
पुस्तकाचे नांव-सूत्रसंचालनाविषयी सर्वकाही
लेखक:संदीप मगदूम
प्रकाशन-मिरर प्रिंटिंग प्रेस, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती ,१४फेब्रुवारी ,२०२५
पृष्ठे संख्या–२२५
वाड़्मय प्रकार- संकलन
किंमत /स्वागत मूल्य-२७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३७||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-सूत्रसंचालनाविषयी सर्वकाही
लेखक: संदीप मगदूम
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚
आवाजाच्या मैफिलीत बहारदार वातावरण केवळ वाणीतून निर्माण करणारे, निवेदक सूत्रसंचालक यांचंही नाव आता प्रसिध्द होतंय.त्यांची बोलण्याची ढब,संयमी भाषा ,भाषेतील आरोहअवरोह, दोन शब्दातील योग्य अंतर,स्पष्ट शब्दोच्चार यामुळे निवेदन ऐकतच रहावे असे वाटते..त्या निवेदन कलेची सर्वंकष माहिती कोल्हापूरचे नामांकित सूत्रसंचालक संदीप मगदूम यांनी ‘सूत्रसंचालनाविषयी सर्व काही’ या पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे.
‘वाचे बरवे कवित्व,कवित्व बरवे रसिकत्व,रसिकत्वे परतत्वे स्पर्शू जैसा’
या सूवचनाप्रमाणे रसिकत्वाला परतत्वाचा
स्पर्श होण्यासाठी ‘सूत्रसंचालकाच्या’ वाणीला संस्कारीत बनावे लागते.आपल्या वाणीतून बाहेर पडणारा शब्द, श्रोत्यांच्या कानांसोबत मनापर्यंत पोहचला पाहिजे. प्रत्येक शब्दाला अर्थाची जोड दिली आणि शब्दांमधून माधुर्य पाझरू लागले की आपले आणि श्रोत्यांमधील द्वैत संपते.
कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालकाची गरज निर्माण झाली आहे. कार्यक्रमात समयसूचकतेपणे वाणीतून प्रगटणारे बोल श्रोत्यांच्या मनात घर करतात.इतकं ओजस्वी बोलणं तेही स्वत:चा आवाज कमवून,मधाळ वाणीत, अचूक शब्दशैलीत आणि समर्पक संवादफेकीतून रसिकांना,श्रोतृवृदांना कानसेन बनविले.ते ख्यातनाम निवेदक प्रदीप भिडे, सुधीर गाडगीळ,भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किर्पेकर,मंगला खाडीलकर, चारुशीला पटवर्धन,अनंत भावे,अमीन सयानी, रामदास फुटाणे, कवी अरुण म्हात्रे,निलेश साबळे, लक्ष्मीकांत रांजणे, श्यामसुंदर मिरजकर, विठ्ठल माने आणि संदीप मगदूम असे सुहास्य व प्रसन्न चेहऱ्याचे वृत्त निवेदक तथा मुलाखतकार किंवा सुत्रसंचालक.
पुस्तकाच्या नावावरुन आपल्या लक्षात येते की, विविधांगी कार्यक्रम सोहळे संपन्न करण्यासाठी निवेदकाने भूमिका कशी पार पाडावी? तयारी काय करावी?याची इत्यंभूत माहिती देणारा देस्तावेज म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित सूत्रसंचालक श्री संदीप मगदूम यांच्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले पुस्तक ‘सूत्रसंचालनाविषयी सर्व काही’.
या पुस्तकाला महाराष्ट्राच्या निवेदन क्षेत्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रस्तावना लाभली आहे.मलपृष्ठावरील ब्लर्ब म्हणजे प्रस्तावनेतील आशयसंपन्न लेखन.तसेच ज्यांच्या वाणीला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक श्रोते आणि नवयुवक ओळखतात.तसेच महाराष्ट्रातील सुपरिचित व्याख्याते मा.इंद्रजित देशमुख यांचाही कौतुकपर शुभ संदेश या पुस्तकाची खासियत अधोरेखित करतो.निवेदकाने श्रोत्यांचं मन ओळखून त्यांचा स्नेही होऊन श्रोत्यांशी संवाद कसा साधावा याची नेमकी माहिती देणारं उपयुक्त पुस्तक आहे.सहजसोप्या बोलीतून निवेदन कसं मांडावं याची परिपूर्ण माहिती देणारं पुस्तक..लेखक संदीप मगदूम यांचा ‘मनातलं बोलणं’हा लेख सुत्रसंचलन क्षेत्रातील बारकाईने बारकावे टिपून प्रत्यक्षपणे सादर करताना व्यवस्थापन कसं असावं याची इत्यंभूत माहिती देणारं अप्रतिम पुस्तक
‘सूत्रसंचालनाविषयी सर्व काही'.
लेखक संदीप मगदूम यांनी गेली वीस वर्षे या क्षेत्रात चौफेरपणे मुक्त फलदांजी केली आहे.शब्दांच्या साजांनी ओजस्वी आणि रसाळ वाणीतून चौकार षटकार मारुन अनेक कार्यक्रमांना उंचीवर नेऊन ठेवले आहे.त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्यक्रमांचे दर्शन या पुस्तकातून होते. अनेक साहित्यिकांनी या क्षेत्राची माहिती पुस्तक स्वरूपात प्रकाशित केली आहे.निवेदक हा हृदयाचा संवाद आहे.आपण जे बोलतो ते उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या मनातलं वाटायला हवं.
नव्याने या क्षेत्रात हौसेने पदार्पण करणारे तसेच व्यावसायिक म्हणून निवेदन संचलन करणाऱ्यांसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल असे मला वाटते.या पुस्तकात लेखक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम संपन्न करताना काय काळजी घ्यावी लागते.याचे थोडक्यात पण महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.सूत्रसंचालकाची आचारसंहिता,भूमिका,कार्यक्रमाचे विविध प्रकार तसेच, आपल्या आवाजाची काळजी, निवेदन सूत्रसंचालनाचे वेगवेगळे नमुने आणि नामांकित सूत्रसंचालक सूत्रसंचालन कसे करतात.त्याची टिपणी सविस्तरपणे दिली आहे.तसेच या पुस्तकात नामवंत साहित्यिक लेखक आणि कवी यांचे समयपरत्वे बोलण्यासाठी लागणारे उतारे, चारोळी,कविता,अवतरणे,कोटेशन्स, शेरोशायरी, संतांची वचने, सिनेमातील गाजलेले संवाद आदींचे संकलन उपयुक्त आहे.तसेच नामवंत सूत्रसंचालकांच्या संहितांचाही समावेश केलेला आहे.यामुळे नेमका कार्यक्रम सादरीकरण करण्यापूर्वी पुर्वतयारी काय करावी लागते.याचा उलगडा होतो.तसेच इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम कसं करावं याचीही सविस्तर माहिती या पुस्तकातून मिळते.
सूत्रसंचालन ही एक कला आहे.हीचा व्यासंग होण्यासाठी आपली वाणी कशी असावी.संवादफेक कशी करावी आणि पुर्वतयारी करायच्या आवश्यक बाबींची तपशीलवार माहिती या पुस्तकातून मिळतेय.याबद्दल लेखक संदीप मगदूम यांचे विशेष अभिनंदन!आणि त्यांच्या लेखणीस आणि वाणीस त्रिवार वंदन!!!
या क्षेत्रात शिकण्याच्या उमेदीने पहिलं पाऊल टाकणाऱ्या निवेदकांना अनमोल खजिना या पुस्तकात भेटतोय.ज्याचे वाचन लेखन चिंतन मनन करून या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. असा मला ठाम विश्वास वाटतो.आपले काही किस्सेही अफलातून आहेत.एकंदर अप्रतिम पुस्तक! सूत्रसंचालन क्षेत्रात सहभागी होऊन कार्यक्रमात संचलन व निवेदन करणाऱ्या प्रत्येकाकडे हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून संग्रही असावे.अप्रतिम पुस्तक आहे.
परिचयक– श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १९ जुलै २९२५
Comments
Post a Comment