पुस्तक परिचय क्रमांक:२३० जुगलबंदी



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३०
पुस्तकाचे नांव-जुगलबंदी
लेखक: शंकर पाटील 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण,ऑक्टोंबर२०१८
पृष्ठे संख्या–११६
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३०||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: जुगलबंदी 
लेखक: शंकर पाटील 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 तमाम महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्ति चित्रांतून घेणारे पटकथाकार,जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण व खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.ऐकायला व वाचायला मिळतात. नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते बारकाईने व  चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात.
 कथा,कादंबरी,वगनाट्य, चित्रपट पटकथा या सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.ऊन,खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा,जुगलबंदी, धिंड, इल्लम,पाऊलवाटा यासारख्या अनेक कथासंग्रहाने आणि  टारफुला या कादंबरीने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे.
कथा निर्मितीमागे ध्यास आहे.सुक्ष्म निरीक्षण आहे.वास्तवतेत घडणारा संवाद आहे.गप्पा चर्चेतील संभाषण आहे. चिंतनाच्या डोहातूनच तीचा जन्म झाला आहे.मराठी कथेला ऐश्र्वर्याचा लाभ दिला आहे.मौखीक प्रसिध्दी देणाऱ्या शाळा, शेतं, चावडी,देऊळ, माळ, नदीनाले आणि गावं या ठिकाणी घडलेले संभाषण सहज सुंदर शब्दात गुंफले आहे.यातील ग्रामीण लकब आणि  कोल्हापूरी बोलीभाषेचा वापर रसदार केलाय. कथेचा रसास्वाद घेताना हास्याची लकेर चेहऱ्यावर आपोआप उमटते.इतकं कथेचं गोष्टीरुप लेखन रसदार आहे.
असाच एक खुमासदार आणि बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करणारा जबरदस्त कथासंग्रह ‘जुगलबंदी’.त्यांची लेखणी केवळ रंजनार्थ नसून सामाजिक जाणीवांवर वाचकांना  चिंतन करायला लावणारी आहे. पाटलांची कथानिर्मिती प्रचंड घडामोडींची आहे.जणू चिंतनाच्या डोहातून ती प्रसवते. आणि हसत हसत सामाजिक प्रश्नांवर भाष्य करते.त्यांच्या अनेक कथासंग्रहातील कथांनी मराठीला श्रीमंती बहाल केली आहे.या कथांच्या गाठोड्यात अस्सल पट्टणकोडोलीच्या गावरान भाषेतील ग्राम्यसंस्कृतील गावाची तालेवार तसे कष्टजीवी माणसांच्या स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखविले आहेत.त्या कथांतील नायक वाचकांना भावतात.इतकं कुतूहल निर्माण करणारं अप्रतिम लेखन शंकर पाटील यांनी अकरा कथेत केले आहे.भावकी,एक मंगलकार्य,काखेत कळसा, मास्तर मास्तर तिरकमठा, कणा,जुगलबंदी,दरवेशी आणि अस्वलं,इथं कायदा झक मारतो!, खासदारांची जनसेवा,खरं की खोटं?,वेध या कथांचा समावेश आहे.
आबांचा मुलगा दवाखान्यात अॅडमिट असतो.त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं म्हणून पैशाची तजवीज करायला आबा इतरांच्या घराकडे हेलपाटे मारत असतात. त्यांनी मदत केलेला देवाप्पाही नन्नाचा पाढा वाचतो म्हणून चालतच लेकीच्या घरी जातात..पण तोंडातून पैसे मागायला शब्दही फुटत नसतात.एक कावळा मरुन पडला तर त्याचे झाडून सगळे भावबंद, सगेसोयरे जमा झाले होते. तो भाव बघून आबा अचंबित झाले.पण सकाळपासून भेटलेल्या कोणत्याही माणसांनी त्याच्या मुलाच्या तब्येतीचं विचारलं नाही. माणुसकीची उणीव दाखविणारी ‘भावकी’कथा.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचे नियोजन शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहविचार सभा घेऊन कसं आखतात.त्याची जबरदस्त कथा ‘एक मंगलकार्य’.
वकील आणि पक्षकार यांच्यावर शब्दबध्द केलेली कथा ‘काखेत कळसा’.खेडवळ माणूस आपलं इप्सित साध्य करण्यासाठी पुढच्याला कसं पटवून देतो.याचं आणि खेड्यातील पक्षकारांचे विविध किस्से अफलातून मांडलेले आहेत.
 शिक्षा करणाऱ्या मास्तरांची विद्यार्थी फटफजिती कशी करतात याचं सुंदर वर्णन ‘मास्तर मास्तर तिरकमठा’या कथा रंगवलं आहे.शीर्षक कथा आणि मुखपृष्ठावरील चित्राची उलगडा करणारी कथा जुगलबंदी.
स्त्रीलंपट भालबाची ही गोष्ट.त्याला महिलांचे भयंकर आकर्षक त्यापायी त्याच्या पत्नीला काय दिव्य करायला लागतं.पुराव्यानिशी लफडी करताना सापडला तरी वठणीवर न येणारा अन् प्रियशीला भेटायला नवनवीन भानगडी करणाऱ्या भालबाची कथा वाचताना हसून हसून पुरेवाट होते.म्हातारा म्हतारीचं खरं एकमेकांच्या दुखाण्यातून दिसून येते. आपण सहजच म्हणतो पाठीचा कणा ताठ असेल तर कोणतंही अंगमेहनतीचं काम पार पडणारचं. एक कणा तेलपाण्याविना जुना होऊन मोडला होता.तर दुसरा कणा तेलपाणी खाऊन नव्याने तयार झाला होता.ज्या वयात वाकायचं त्या वयात तो ताठ उभा राहिला होता. सळसळत्या पानागत नवी उभारी तात्यांच्यात आली होती.एका कण्याची जागा, दुसऱ्या कण्याने घेतली होती.तात्या आणि त्यांच्या कारभारणीची कथा ‘कणा’.
शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना आयोजकांच्या तालावर कशी कसरत करावी लागते.त्यांचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘दरवेशी व अस्वलं’ही कथा.
गावच्या आडदांड आणि भडकू डोक्याच्या 
बापूची चित्तरकथा ‘इथं कायदा झक मारतो’ही अस्सल कथा दांडगावा करणाऱ्या पण गावच्या लोकांची कोर्ट खज्जा न करता होणाऱ्या कामांची ओळख देणाऱ्या बापूची कहाणी आहे.
नातू आणि आजोबा म्हणजे दुधावरची साय.त्यांचे एकमेकांशी खरं प्रेम असतं.ते एकमेकांशी सगळ्या गोष्टींवर गप्पा मारतात.त्यांच्यातील नातेसंबंध दृढ करणारी कथा ‘खरं की खोटं?’
कथाकाराला कथा लिहायला होमवर्क काय करावा लागतो.विचार चक्र कसं चालतं.अन् कुठं कुठं कथेला विषय सापडतो.यावर भाष्य करणारी ‘वेध’ कथा
 अतिशय समर्पक शब्दात गावची माणसं 
लेखक शंकर पाटील यांनी कथेतून शब्दबध्द केली आहेत.नेहमीप्रमाणेच हास्यमस्करी करायत सामाजातील उणीवा 
टिपणारा आणि इरसाल माणसांच्या स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखविणारा कथासंग्रह….
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:९जुलै २०२५


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी