पुस्तक परिचय क्रमांक:२२६ प्रज्वलित मने




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२६
पुस्तकाचे नांव-प्रज्वलित मने
लेखक: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
अनुवाद: चंद्रशेखर मुरगुडकर
प्रकाशन-चिनार पब्लिशर्स,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -१५वी आवृत्ती २०२४
पृष्ठे संख्या–१३६
वाड़्मय प्रकार-समिक्षण
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२६||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: प्रज्वलित मने 
लेखक: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
अनुवाद –चंद्रशेखर मुरगुडकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
भारतातील सुप्त शक्तीच्या मुक्ततेचे प्रयत्न 
आपल्या रसाळ वाणीतून करणारे भारतरत्न मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘इग्नायटेड माइंड्स’या पुस्तकाचा अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर यांनी मराठी भाषेत केला आहे. भारतातील क्षेपणास्त्रांचे सर्वेसर्वा असणारे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम वैज्ञानिक असून त्यांची भाषा क्लिष्ट असेल,असे वाटते. पण  तसं मुळीच जाणवत नाही.उलट साधी सोपी रसाळ आणि वळणदार आणि अलंकारिक सुध्दा आहे.अनुवादाचा एक स्वच्छ, निर्भेळ आनंद या पुस्तकातून मिळाल्याचे अनुवादक आवर्जून नमूद करतात.
डॉ.अब्दुल कलाम यांचं म्हणणं आहे की,शिक्षण,  विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची चैतन्यशक्तीची अध्यात्माबरोबर सांगड घालणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे.हे पटवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या भाषणांचे उतारे या पुस्तकात लेख स्वरूपात दिलेले आहेत.
डॉ.अब्दुल कलाम यांनी हे पुस्तक इयत्ता बारावीत शिकणाऱ्या स्नेहल ठक्कर हिला अर्पण केले आहे.कारण की आनंदालय हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना आपला शत्रू कोण?असा प्रश्न उपस्थित झाला होता.त्यावेळी तिने दिलेले अचूक उत्तर होते.आपला शत्रू आहे गरिबी!!!
गरिबी हा आपल्या लढाईचा विषय व्हावा,
आपसातील भांडणाचा नव्हे.
डॉ.अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाची प्रस्तावना सन २००२मध्ये लिहिलेली आहे.२०२०नंतर आपल्या भारताचे नाव विकसित देशांच्या यादीत असावे.यासाठी भारतीय तरुणांच्या मनांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करावे म्हणून या पुस्तकाचे लेखन केले आहे.पुढे ते म्हणतात की, “भारताच्या 
आणि भारतीयांच्या क्षमतेविषयी वाटणाऱ्या आदराचे प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक होय”आपल्याकडे सर्व काही आहे.
मनुष्यबळ, बुद्धी, निसर्गाची साथ आणि आशीर्वादही लाभलेला आहे.फक्त साधनसंपत्ती हाताळण्याच्या पध्दतीचा अभाव आहे.
देशातील समस्त तरुणांना पुढे जाण्याचा संदेश प्रत्येक लेखातून अधोरेखित केला आहे.जिद्दीतून ध्येयासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.या पुस्तकातील नऊ लेखात वेगवेगळ्या विषयांवर उहापोह केला आहे.मुख्य विचारधारा ही शांतता आहे.भारतातील मुलांशी केलेला संवाद या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.प्रत्येक लेखाचा प्रारंभ लोकप्रिय महामानवाच्या विचाराने सुरू होऊन  उत्तरार्धात लेखाचा सारांश समर्पक आणि यथार्थ शब्दात प्रस्तुत केला आहे.
  स्वप्न आणि संदेश,आदर्शांच्या शोधात, दूरदृष्टीचे अध्यापक आणि वैज्ञानिक,संत आणि महंतांची शिकवण, राजकारण आणि धर्मकारण यांच्या पलीकडची देशभक्ती, ज्ञानाधिष्ठित समाज,सर्व शक्तींचा समन्वय,राज्याची नव्याने बांधणी, माझ्या देशबांधवांसाठी अशी लेखांची अनुक्रमणिका आहे.समारोप, तारुण्य गीत आणि संदर्भ-सूची समाविष्ट केली आहे.
तरुणांनी या पुस्तकाचे रसग्रहण करणं आवश्यक आहे.कारण नेमकं आपण जीवन कसं जगावं याचं उत्तर म्हणजे हे पुस्तक तरुणांना आयडॉल ठरेल असा विश्वास वाटतो.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:१७जून २०२५

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड