पुस्तक परिचय क्रमांक:२२८ लवंगी मिरची कोल्हापूरची




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२८
पुस्तकाचे नांव-लवंगी मिरची कोल्हापूरची
लेखक: शंकर पाटील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण जुलै,२०१७
पृष्ठे संख्या–५६
वाड़्मय प्रकार-नाटक
किंमत /स्वागत मूल्य-७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२८||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: लवंगी मिरची कोल्हापूरची
लेखक:शंकर पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 शंकर पाटील ह्यांच्या अस्सल ग्रामीण कथा विनोदी आणि हसता हसता रडवणाऱ्या असतात ज्यांना ग्रामीण कथेत अधिक रस आहे त्यांच्या साठी ही पुस्तके पर्वणी आहेत.ग्रामीण भाषेचं सौंदर्य अनुभव त्यांच्या कथा वाचन व श्रवण करताना होतो. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिंचा स्वभाव व शरीरयष्टीचे वर्णंन अस्सलपणे करतात.त्यामुळे प्रत्यक्ष घटना-प्रसंग डोळ्यासमोर तराळतात.त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही.याच मुशीत लेखणीतून उतरलेले ग्रामीण तमाशाप्रधान विनोदी वगनाट्य 'लवंगी मिरची कोल्हापूरची'आहे.या नाटकातील सामाजिक विषय दोन बायका केल्यावर नवऱ्याची फटफजिती कशी होते. ते नाटक वाचल्यावर समजते.
  शब्दांच्या मळ्यात अक्षरांचे धान पेरुन,निरस मुळाक्षरांचे तण वेचून, साहित्याचे अमाप पीक काढणारे पाटील म्हणजे शंकर पाटील त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या लोकप्रिय आहेतच पण त्यांची दोन वगनाट्यही लोकप्रिय आहेत.त्यातीलच एक प्रसिद्ध धमाल वगनाट्य,'लवंगी मिरची कोल्हापूरची' या नाटकाचा पहिला प्रयोग २४ हे १९६८ रोजी सोलापूर येथील प्रताप टॉकीज येथे संपन्न झाला होता.आजही सिने आणि नाट्यरसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवलेल्या नामांकित अभिनय सम्राटांनी अरुण सरनाईक,निळू फुले, उषा चव्हाण आदींनी भूमिका साकारल्या होत्या.या नाटकास राम कदम यांनी संगीतबद्ध केले होते तर दिग्दर्शन अनंत माने यांनी केले. यातील ठसकेबाज लावण्या आणि गीते आघाडीचे गीतकार जगदीश खेबूडकर यांची होती.
'तमाशा'हा अस्सल अदाकारी मैफिल ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन करणारे सिनेमापटाच्या पुर्वी एकमेव साधन होते.
 गावचा इरसाल,रसिक आणि रंगेल पाटील एका चटकचांदणीच्या  लावणी शृंगाराने मदमस्त होऊन प्रेमात पडतो अन् दुसरी बायको करून तिला घरात आणतो.अन् मग घरात गोंधळात गोंधळ एक शेर तर दुसरी पावशेर अशी दोन हक्काच्या बायकांमध्ये कळवंड लागते.सुप्रसिध्द लेखक शंकर पाटील यांच्या खास शैलीतलं हे नाटक!खटकेबाज संवाद ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढविणारी …'लवंगी मिरची कोल्हापूरची'.रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कलाकृती.यातील सगळ्यांच्या लक्षात राहणारं पात्र म्हणजे जेष्ठ रंगकर्मी निळू फुले यांनी वठवलेले जयसिंग पाटलाचा दोस्त हरी..हजरजबाबी अचूक शब्दफेक.वाचतानाही हरीचे व्यक्तीचित्र समोर दिसतं.अतिशय खुमासदार शैलीत खुशखुशीत संहिता लेखन शंकर पाटील यांच्या लेखणीतून उतरलेले आहे...

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २५ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी