पुस्तक परिचय क्रमांक:२९६ सोनहिरा डॉ पतंगराव कदम जीवन चरित्र





📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९६ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव - सोनहिरा डॉ.पतंगराव कदम 
लेखक: बा.ग.पवार 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९६
पुस्तकाचे नांव-सोनहिरा डॉ. पतंगराव कदम 
लेखक: बा. ग. पवार
प्रकाशन-मातृभूमी प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१९९६
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–३०४
वाड़्मय प्रकार-जीवनचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
”””””””””””””””””””””””””””””””””””
भारती विद्यापीठाचे संस्थापक, लोकश्री डॉ.पतंगराव कदम यांच्या  जीवनचरित्राचा आणि कार्यकर्तृत्वाचा आलेख सन १९९६ साली एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने हडपसर येथील शाळेतील सहकारी श्री बा.ग.पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सहकाऱ्याचे ‘सोनहिरा डॉ पतंगराव कदम’यांचे जीवनचरित्र भावस्पर्शी शब्दात आणि समर्पक रंगीत छायाचित्रात उलगडून दाखवले आहे.
एखाद्या असामान्य व्यक्तिचा स्वप्नवत ध्यास प्रत्यक्ष साकार होत असताना त्या प्रवासाचे साक्षीदार असणारे लेखक बा. ग. पवार आहेत.त्यांच्या सहवासातून , अनुभवातून आणि कृतीतून सिद्ध झालेले डॉ पतंगराव कदम यांचे जीवनगाणे सहज सुंदर शब्दात शब्दबद्ध केले आहे.उत्तुंग व्यक्तिमत्त्वे बालपणापासून स्वप्नांचे इमले रचत असतात आणि योग्य वेळी पुर्णत्वाकडे नेहण्यासाठी सकारात्मक विचाराने एकेक पाऊले चालून अतिभव्य दिव्य कार्य साकार करतात.अशातील एक जिद्दीने  झपाटलेले थोर नेते, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. पतंगराव कदम साहेब .विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात ‘भारती विद्यापीठाची’स्थापना करून ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची कवाडे खुली करुन देतात. एकाच छताखाली पी.ई.ते पी.जी.पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देणारे शिक्षणतज्ज्ञ लोकश्री डॉ पतंगराव कदम.राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आदर्श शिक्षणसंस्थेची स्थापना करतात. त्या कार्याची गौरवगाथा या चरित्रात आपणास वाचायला उपलब्ध करून देण्याच महनिय कार्य लेखक श्री बा. ग.पवार यांनी केले आहे.
    थोरांचे विचार “डॉक्टर पतंगराव कदम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू माझ्या निदर्शनास आले आहेत.सतत माणसांच्या गराड्यात असणारे साहेब.ते जेथे जातील तेथे त्यांच्या भेटीला आलेल्या माणसांची रीघ आसते.त्यापैकी कित्येकांची नांवे तोंडपाठ. प्रत्येकाच्या कामाबद्दल दिलासा देणारं स्नेहार्द व्यक्तिमत्त्व.”
-डॉ.ग.वि.जोगळेकर 
 “यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे.तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे.”-असे विचार डॉ पतंगराव कदम यांचे आहेत. 
साहेबांचे जीवनचरित्र सत्तावीस विभागात रेखाटलं आहे.त्यामध्ये कदम घराण्याचा इतिहास, डॉ पतंगराव कदम यांचे शिक्षण, विद्येच्या माहेरघरी पुण्यात,भारती विद्यापीठाची स्थापना,एस.टी.महामंडळ सदस्य,मुद्रण-प्रकाशन क्षेत्रात,वेलू गेला गगनावरी, शैक्षणिक कार्याचे आगळेपण, डॉ पतंगराव कदम यांची कार्यपद्धती, केल्याने देशाटन, पैलू सोनहिऱ्याचे,डॉक्टर पतंगराव कदम साहेब विचारवंतांच्या दृष्टीकोनातून,सामाजिक कार्याचे योगदान,विधानसभा निवडणूक, मंत्रीमंडळात समावेश,भारती विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी सोहळा, मान्यवरांचे शुभसंदेश,लोकश्री ॲवॉर्ड, स्वयंभू नेतृत्व, थोरांचे विचार, डॉ पतंगराव कदम यांचा विविध संस्थांशी कार्यात्मक नाते, संक्षिप्त जीवन परिचय,भारती विद्यापीठाच्या सर्वविध शाखांची यादी, संदर्भ साहित्य आणि विषयसूची यामधून त्यांच्या सर्वांगीण जीवनाच्या यशोगाथेची ओळख रसिक वाचकांना होते.त्यांच्या विचारांची उंची समजते.अनेक मान्यवरांनी गौरवलेले शुभ संदेश वाचताना त्यांच्या शैक्षणिक कार्याची प्रचिती येते..
डॉक्टर पतंगराव कदम'यांचे जीवनचरित्र वाचताना त्यांच्या कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दिसून येतात. अपार कष्ट करण्याची तयारी, योजकता, तर्कशक्ती, दुसऱ्यांचे चांगले गुण हेरून त्यांना संधी देणे, आर्थिक चोख व्यवहार आणि समोरच्या व्यक्तीला विचार पटवून देण्याची हातोटी. समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि गुणी माणसांच्या गोतावळ्यात ते असत.
  स्वतःजवळ गुणांचा चांगुलपणा असल्याशिवाय गुणी माणसांचा ठेवा वाढविता येत नाही हीच डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्वप्नातील पंखांतली खरी ताकद आहे.त्यांचे कार्य म्हणजे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतलेलं कार्य आहे.
 साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘झोंबी’कादंबरीचे आत्मचरित्रकार डॉ.आनंद यादव म्हणतात की, “भारती विद्यापीठाचे प्रमुख कार्य ग्रामीण भागातील तरुण पिढीला कालोचित शिक्षण देऊन त्याला अत्याधुनिक नवशिक्षित तरुण बनविण्याचे आहे.” यामुळेच भारती विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरत आहे.
सोनहिरा हे जीवनचरित्रातून डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कार्याची ओळख भावी पिढीला तसेच वाचकांना उद्बोधक आणि दीपस्तंभासारखी प्रेरणादायी ठरेल.

पुस्तक परिचयक :श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक- ३०ऑक्टोंबर २०२६


Comments

  1. समर्पक शब्द आशय मांडणी👌🙏

    ReplyDelete
  2. धन्यवाद 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी-- सोंगे

कविता आनंदाची शाळा

पुस्तक परिचय क्रमांक:२५७ पुसट रेषा