पुस्तक परिचय क्रमांक:२९२ दिवेलागणीची वेळ




📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९२ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -दिवेलागणीची वेळ 
लेखक:ना.धों.महानोर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९२
पुस्तकाचे नांव-दिवेलागणीची वेळ 
लेखक- ना.धों.महानोर
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१६सप्टेंबर २०१८
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१३६
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-१६०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
 निथळ घामाची शाई करुन 
शेतीमातीची ओवी बहरली
खुरप्याची लेखणी करुन 
रानातली कविता फुलविली ||

मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन 
शब्दांचे पुष्पमळे फुलवले
शेतीत काबाडकष्ट करून 
शब्दफळांचे सुगंध दरवळले||
  शेती आणि साहित्य यांचा सुरेख संगम साधत पिकं अन् लतावेलींच्या मनातलं आपल्या लेखणीने कागदावर झरझर लिहून त्यांचे सृजनगाणं करणारे शेती मातीचे प्रतिभावंत लेखक व सृजन कवी.कृषीभूषण, कृषिरत्न, वनश्री,पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी विधानपरिषद सदस्य आदरणीय लोकसाहित्यिक ना.धो.महानोर यांचे ‘दिवेलागणीची वेळ’हे शेतीवरील नवनवीन प्रयोग आणि घाम गाळून शेती करणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांची ओळख करून देणारे साहित्य होय. निसर्ग साहित्यावर जितके प्रेम तितकेच त्यांनी खेडी,शेती,पाणी आणि शेतकरी यांच्यावर केले आहे.
 त्यांनी विविध शेतीविषयक पुस्तकातून शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे अनेक लेख आहेत.निराशेमुळे जे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतात त्यांना हे पुस्तक खरोखर संजीवनी देतं. ते आमदार असताना आपल्या गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेत आणि अनेक सुधारणा देखील केल्यात.
शेतकऱ्यांच्या अडचणी वारंवार सरकारला सांगून त्यांच्या जीवनात बदलही घडवून आणले. 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही संकल्पना त्यांचीच आहे.त्यांची प्रगत तंत्रज्ञान असलेली शेती बघण्यासारखी आहे. एका मोसंबीच्या झाडांना हजार हजार मोसंबी लागलेल्या असतात. झाडाला लदबदलेली फळे बघून ते म्हणतात, झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत-गाजत ये थेंब अमृताचे..
 फक्त कवी कल्पना न करता आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा हा कवी आहे.ते कवितेतील प्रतिमांना, आशयाच्या जाणिवांना घेरून घेतात जणू.उत्तम शेतकरी असल्यामुळे त्यांना माहीत होतं की शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीमुळे अधिक उत्पन्न येतं.तसेच अनेक पिके एकमेकांच्या जोडीने पेरली जातात आणि ती बहरत जातात.
हे पुस्तक महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सौभाग्यवती गोविंद बागेतल्या घरात व शेतीत रममाण होऊनही मानवी ऊब आणि ओलावा जपणाऱ्या श्रीमती प्रतिभा शरदचंद्र पवार यांना अर्पण केले आहे.मुखपृष्ठावर पाऊलखुणा आणि त्यात उठावदार दिसणारी हिरवाई तर मलपृष्ठावर लेखकांचा साहित्य आणि शेतीपाणी यांचा उंचावत जाणारा आलेख समर्पक शब्दांत लिहिला आहे.तसेच तो पुस्तकाचा आशय अधोरेखित करणारा आहे.
‘दिवेलागणीची वेळ’या पुस्तकातील लेख यापूर्वी दैनिक सकाळ आणि लोकमत या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहेत.त्याच लेखांना एकत्रितपणे या पुस्तकात समाविष्ट केले आहे.आमदार असताना जगभर दिलेल्या भेटी तसेच महाराष्ट्रभर शिष्टमंडळ व पाहणी दौऱ्यात भेटलेले शेतकरी.त्यांच्या शेतीविषयक समस्या व प्रश्न आणि नवनवीन प्रयोग करून व तंत्रज्ञानाची उपयोग उत्पादनात भरघोस वाढ करुन आर्थिक सुबत्ता मिळवलेल्या शेतकऱ्यांची यशोगाथा संक्षेपाने उठावदार केली आहे.शेतीवर  प्रेम करणाऱ्या लेखकांच्या सहवासातील लहानथोर व्यक्तींच्या पैलूंचे दर्शनही या लेखातून समजून येते. किती समर्पक शीर्षक या पुस्तकाचे आहे.’दिवेलागणीची वेळ’खेड्यांमधल्या काळोख्या दुनियेत ही नवी दिवेलागणीची वेळ. पारंपारिक शेतीला नवतंत्रज्ञाची जोड देऊन बळीराजाची आर्थिक सुबत्ता यावी.यासाठी शासनाने कोणते उपाय योजले आहेत.याचाही मागोवा घेणारे यातील लेख वाचनीय आहेत.अतिशय सहज सुंदर शब्दात त्यांनी वाचकांशी संवाद साधला आहे.या पुस्तकात एकूण तेहतीस लेखांची मालिका गुंफून ना.धों.महानोर यांनी शाश्वत शेतीच्या 
विकासासाठी कोणती उपाय योजना केली अथवा सुचवली.कोणती कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे.यावर  माहिती दिली आहे.सर्व लेखांची शीर्षके काव्यात्मक असून वाचण्याची उत्सुकता निर्माण करतात.अशी प्रवाही लेखणी आहे. सविस्तरपणे वर्णन केले आहे.शेती व वृक्षांना जीवन संपत्ती मानणाऱ्या व्यक्तींची ओळख या लेखातून करून दिली आहे. उत्तरार्धात दयाघना प्रार्थना आणि ना.धों.महानोर यांच्या जीवनप्रवाहातील माईलस्टोन साहित्याची सूची, गीतरचना कॅसेट, व्हिडिओ व फिल्म, सांस्कृतिक क्षेत्रातील नियुक्ती, पुरस्कार-बहुमान, काव्य वाचन सोहळे आदींची सूची दिली आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या बळीराजासाठी एक मार्गदर्शक कोश म्हणून या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल असं माझं मत आहे.तसेच वाचक रसिकांना लेखकाची शेतीमातीची जीवापाड मैत्री या पुस्तकातून पानोपानी प्रचिती येते.इतकं सुंदर शब्दात व्यक्तता आहे.

आस्वादक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक -२ ऑक्टोबर २०२६

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....