पुस्तक परिचय क्रमांक:२९३ ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील



📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९३ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील
संपादक: प्राचार्य रा. तु. भगत
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९३
पुस्तकाचे नांव-ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील 
संपादक-प्राचार्य रा. तु. भगत
प्रकाशन-चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२ऑक्टोंबर २००६
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–७४४
वाड़्मय प्रकार-गौरवग्रंथ 
किंमत /स्वागत मूल्य-७००₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
 कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मानसपुत्र,शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅ.पी.जी.पाटील यांच्या जीवनाकार्यातील वाणी आणि लेखणी 
यांची मनोवेधक शब्दचित्रात विचारांची शिदोरी ज्ञानामृताचा कुंभ प्राचार्य रा.तु.भगत यांनी संपादित केला आहे ‘ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील’या गौरव ग्रंथात.प्रज्ञा व प्रतिभा,काव्य व करुणा, हास्य व विनोद यामुळे सरांची व्याख्याने प्रबोधन आणि प्रमोदाचा सुंदर आविष्कारच असे.तोच आपणाला या गौरवग्रंथातून आस्वाद घ्यायला उपलब्ध करून दिला आहे.

 जीवनातले सारे चढउतार ज्यांनी अनुभवले,जाणले, आस्वादले आणि ओळखले हे ‘मोठे मन!’या मनाला परंपरेच्या कुशीत दडलेल्या अस्मितांचा अभिमान आहे.तर आधुनिकतेच्या उंबरठ्यावरील विज्ञाननिष्ठेबद्दल अपार आदर आहे.ज्ञान , भक्ती आणि कर्म या त्रिवेणी संगमावरील एक तीर्थस्थान, वक्तृत्व आणि लेखणीतून अमृत अनुभव देणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मानसपुत्र ज्ञानयोगी बॅरिस्टर पी.जी. पाटील….रसाळ वाणी आणि निर्मळ मन लाभलेला विलोभनीय माणूस! ज्ञानपंढरीचा वारकरी अन् भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील धारकरी,स्वावलंबनाचे बीज मस्तकी धारण केलेला ‘कर्मयोगी’, विद्यार्थी हेच दैवत मानून त्यांच्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेला आभाळाएवढा माणूस.इंग्रजी आणि मराठी भाषेचे ज्ञान भांडार फोडून ते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सामान्य माणसापर्यंत पोहचविणारे ज्ञानपंढरीचे ‘पांडुरंग’.
 त्यांच्या समृद्ध विचारधनाचे भंडार लेखक तथा संपादक प्राचार्य रा.तु.भगत यांनी अप्रतिम अक्षर शब्दांच्या रंगावलीत एकजिनसी करून रसिक वाचकांना विचारांची शिदोरी ‘ज्ञानयोगी बॅ.पी.जी. पाटील’या गौरव ग्रंथात प्रसिध्द केली आहे.गौरव ग्रंथाचा आशय अधोरेखित करणारा ‘पांडुरंगाच्या प्रकाशात’हा लेख अवर्णनीय आणि  वाचकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.हा लेख वाचतानाच आपणाला आदरणीय बॅ.पी. जी.पाटील आणि  कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार हरेक अवतरणात दिसून येतात.
   आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे,काव्यप्रतिभेने रसिकांना आनंदाचा अभिषेक घालणारे कवी,शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कर्मवीर भाऊराव पाटीलांचे लाडके मानसपुत्र बॅरिस्टर पी. जी.पाटील.
  नामदार यशवंतराव चव्हाण यांना 'राजकीय क्षितिजावरील तारा'हे विशेषण बहाल करून त्यांच्या जीवनकार्याचा आलेख मांडताना ते म्हणतात की, ''हिमालयाच्या हाकेला प्रतिसाद देऊन हा सह्याद्री धावला. यशवंतराव भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्यानंतर कर्तृत्वाची पदचिन्हे भारतीय इतिहासावर उमटविली. ''ते प्रतिपादन करतात की,“चरित्रनायकाचे नातलग, जिवलग मित्र व समकालीन हे त्यांच्याविषयी शब्दचित्र चांगले रंगवू शकतात.कारण बारीकसारीक तपशीलाशी ते संबंधित असतात.अन् काय सांगावे याची जाण त्यांना चांगली असते .किती समर्पक शब्दांत त्यांनी विवेचन केले आहे.”
‘ज्ञानयोगी बॅ.पी. जी.पाटील’ग्रंथात एकूण अकरा विभाग असून त्यांच्या लेखणीने समर्पक शब्दांत शब्दबध्द झालेलं लेख वाचनीय आहेत.ते लेख वाचताना लेखाच्या प्रारंभी संपादक प्राचार्य रा.तु. भगत यांनी समर्पक शब्दांत त्या लेखांचे सार निवेदन शैलीत प्रस्तुत केल्याने वाचनाची आवड निर्माण होते.तसेच त्या लेखातील आशयाचा मतितार्थ संक्षेपाने संपादकांनी अधोरेखित केला आहे. विचारधन,शब्दगंध, प्रस्तावना, पत्रप्रपंच, कर्मवीर गीतांजली, मान्यवरांचे मनोगत, आठवणी, श्रद्धांजली,जीवनदर्शन, संकीर्ण,परिशिष्ट.
   या ग्रंथातील पहिल्या भागात बॅ.पी.जी. पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, सद्गुरू गाडगे महाराज, महात्मा फुले,थोर महापुरुष,स्वातंत्र्य सेनानी,माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई,क्रांतिवीर,शिक्षणमहर्षी,स्नेहीजन यांच्या विषयी लिहलेले विचारधन आहे. विविध विचार, हृद्यस्पर्शी आठवणी,उत्कट भावना,चटकदार चुटके,बोधपर वचने, सरस काव्यपंक्ती,नवनवीन संदर्भ  आणि वेचक अवतरणांनी भरलेले विचारसंपन्न व प्रेरणादायी लेखन आहे.समाजिक जाणीव जागृती निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांची मने चैतन्याने फुलवावीत असे परिपुर्ण लेख.
सन १९४८साली सद्गुरू गाडगे महाराज यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना थैली देण्यात आली होती.त्यावेळी अध्यक्षीय भाषणात गाडगे महाराज महाराज म्हणाले की,“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हयातभर गोरगरीब जनतेची जीवापाड सेवा केली. शेतकऱ्यांची मुले बैला-म्हशींच्या शेपट्यात मोडत न राहता ती आता शिकू लागली. स्वावलंबी झाली. मी फक्त माणसांची सेवा करून त्यात जीव ओतला व त्याला देवपण आणले. सुशिक्षित व शहाणी पिढी तयार करून देशसेवकाची एक प्रचंड आघाडी त्यांनी उभी केली.कर्मवीरांच्या पवित्र कार्याला सढळ हाताने मदत करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.कित्येक अनाथ मुलांचे संसार त्यांनी उभे केले.त्यांच्या रुक्ष व खुरटलेल्या जीवनात नंदनवन फुलवले आहे.”असे विचारकार्याचे अमृतकलश ‘ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील’या विचारग्रंथात वाचकांपुढे ठेवले आहेत.

*कृष्णा कोयनेच्या संगमी बंडोपंतांची लक्ष्मी नि कर्मवीर अण्णांची सरस्वती यांचा गुप्त संगम घडवून आणला तो सद्गुरू गाडगे महाराजांनी! महाराष्ट्रात त्यांच्या अशा उज्ज्वल कर्तृत्वाचा खुणा विखुरलेल्या आहेत.संत गाडगेबाबा महाविद्यालय कराड.
 *पी. जी. पाटील सरांच्या इंग्रजी भाषेचा थरार,खळाळ, नाट्य आणि प्रभाव शब्दांच्या पलिकडचा आहे.त्यांच्या इंग्रजी भाषेच्या अमृतवाणीचा अभिषेक महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना लाभला.
*द्वितीय भाग विविध समारंभातून दिलेली प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, भारावून जाणारी सरस शब्दसौरभाने फुलवलेली निवडक भाषणांचा आहे.तसं भाषण वाचण्यापेक्षा ऐकणं केव्हाही चांगलं. श्रोत्यांच्या हृदयाला हृदय भिडवून नव विचारांचे अभिसरण निर्माण करण्याचे सामर्थ्य बॅ.पी.जी.पाटील यांच्या भाषणात ज्ञानाचे तीर्थस्थान शिवाजी विद्यापीठाची ख्याती वाचावी एवढं  शब्दप्रचुर व विचार संपन्न आहे.
* तृतीय विभागात विविध पुस्तकांचा परिचय; प्रस्तावना म्हणजे पुस्तकाच्या अंतरंगावर टाकलेला शब्दांचा अभिषेक.
लिहिणाऱ्याची ओळख,पुस्तकाचे प्रयोजन,बलस्थाने, वैशिष्ट्ये,आशय वाचकांच्या लक्षात आणून देणे.यातील प्रस्तावनांचे रसग्रहण करणे म्हणजे पी.जी.पाटील सरांच्या विद्वत्तेची आणि प्रतिभेची चमक दिसून येते.चपखल शब्द,संदर्भ, भावात्मक व ओजस्वी शैलीने सर्व प्रस्तावना सकस, सरस, रमणीय आणि वाचनीय आहेत.

# त्यांच्या हृदयातील हुकारांचा अमृतमणाच्या अमृतवाणीचा लिखित दस्तावेज ‘पत्रप्रपंच’चौथ्या विभागात आहे. त्यांना आलेला आणि त्यांनी केलेल्या निवडक पत्रांचा. त्यांचे लेखन म्हणजे जीवनप्रणाली व जीवननिष्ठांचा सुंदर आविष्कार. समाजप्रबोधनाने परिपूर्ण भरलेली अन् आपुलकी,माया, प्रेम, तळमळ, कळकळ आणि दयेने ओथंबून भरलेली.शुभेच्छांच्या सोबतीने आशीर्वाद आणि प्रेरणा देणारी पत्रे.तर थोरांविषयी कृतज्ञतेने भरलेली आहेत.
 पाचव्या विभागात मानवी मनात निर्माण झालेल्या उत्कट भावनांचा आविष्कार कर्मवीर गीतांजलीचा आहे.‘शिलेदार’या नावाने काव्यलेखन करून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला आहे.त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
या ग्रंथाच्या सहाव्या भागात आदरणीय पी जी पाटील सरांच्या जीवनकार्याची महती सांगणारी अनेक मान्यवरांची मनोगते आहेत.तर अनेक आठवणींचा स्मृतीगंध सातव्या विभागातून दरवळत आहे.
बॅ. पी. जी. पाटील यांचे देहावसान झाले नंतर त्यांच्या कार्याविषयी शब्द पुष्पांजली आठव्या विभागात आहे.
ग्रंथाच्या नवव्या विभागात कृष्णधवल दुर्मिळ छायाचित्रे त्यांच्या जीवनाचे दर्शन घडवतात.तर दहाव्या विभागात चिंतन आणि मुलाखती आहेत.त्यांना मिळालेले सन्मानपत्र व मराठी व इंग्रजी हस्ताक्षर आहे.अकरावा विभाग परिशिष्टाचा असून सरांचा जीवनपट, प्राचार्या सौ सुमतीबाई पाटील यांचा जीवनवृत्तांत व बॅ.पी.जी. पाटील सरांची ग्रंथसंपदा आणि हा गौरव ग्रंथ ज्या दस्तावेजांचा अभ्यास केला त्या संदर्भग्रंथाची सुची समाविष्ट केली आहे.
एकंदर बॅ पी.जी.पाटील व प्राचार्या सौ सुमतीबाई पाटील यांच्या जीवन कार्याचा गौरव ग्रंथ ‘ज्ञानयोगी बॅ.पी.जी. पाटील’ अप्रतिम शब्दसाजात संपादक प्राचार्य रा. तु.भगत यांनी प्रकाशित केला आहे. ‘विद्यार्थी देवो भव:’आपल्या कृतीतून सिद्ध करणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व व महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर स्वयंभू तेजाने तळपत राहणारे ज्ञानयोगी बॅरिस्टर पी जी पाटील आणि प्राचार्या सौ सुमतीबाई पाटील….. विनम्र अभिवादन!!!
आस्वादक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक:२०ऑक्टोंबर २०२६
विजयादशमी….


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....