पुस्तक परिचय क्रमांक:२६८ साताऱ्याच्या मुलखात
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६८
पुस्तकाचे नांव-साताऱ्याच्या मुलखात
लेखक: आदित्य फडके
प्रकाशन-स्नेहल प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल-२०१६
द्वितीय
पृष्ठे संख्या–१७४
वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन
किंमत /स्वागत मूल्य-२२५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६८||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -साताऱ्याच्या मुलखात
लेखक: आदित्य फडके
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
सातारा जिल्हा म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगररांगेतील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वरदान लाभलेले नंदनवन.गडदुर्ग,मंदिरे,अभयारण्ये, तलाव आणि अनवटवाटेने भटकंती करायला अनेक पर्यटकस्थळे तर आहेतच शिवाय भारतातील प्रेक्षणिय थंड हवेचे ठिकाण पांचगणी,महाबळेश्वर आणि तापोळा ही नैसर्गिक देणगी लाभलेली स्थळे साताऱ्यातील आहेत.
सातारा जिल्ह्यातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी मार्गदर्शक वाटाड्या म्हणून उपयोगी पडणारे हे पुस्तक, ‘साताऱ्याच्या मुलखात’साताऱ्याचे निसर्ग भटकंतीकार आदित्य फडके यांनी लेखणीबध्द केले आहे. प्रत्येकाच्या भटकंतीचा प्रवास आनंदी करणारं हे पुस्तक आहे. निसर्गाच्या समवेत मुशाफिरी करताना निसर्गाबरोबरच माणसांचे चित्र टिपून त्यांचे व्यक्तीचित्रण सजग शैलीत लिखित केले आहे.
या पुस्तकातील भाषा साधी सोपी आहे. साताऱ्यातील अनेक नवनवीन स्थळांचा परिचय त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक संदर्भासह आपल्या लेखणीतून केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगड आणि संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या तीरावरील वाई येथील गणपती घाटाचा चितारलेले मुखपृष्ठ आपल्या नजरेत भरते आणि दिसल्या क्षणी पुस्तक हातात घेऊन पाने चाळायला आपोआप सुरूवात होते.इतकं देखणं आकर्षक देखणं मुखपृष्ठ.तर सातारा जिल्ह्यातील विविध प्रेक्षणिय स्थळांनी फेर धरून भ्रमंतीचे रिंगण केले आहे.त्या पर्यटन स्थळांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती मिळवून पुस्तक रुपाने सादर केली आहे.तो आशय अधोरेखित करणारा ब्लर्ब पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण करतो.घरबसल्या सातारा जिल्ह्यातील विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद वाचकांना करून देणारं हे पुस्तक आहे.
भ्रमंतीकार तथा लेखक आदित्य फडके यांनी ‘साताऱ्याच्या मुलखात' या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे तीन प्रकरणात लेख समाविष्ट केले आहेत. पहिले प्रकरण साताऱ्यातील गड व किल्ले यांचे असून दुसरे प्रकरण धार्मिक स्थळांचे तर तिसऱ्या प्रकरणात पर्यटन स्थळांची माहिती आहे.सतरा गडकिल्ले सव्वीस मंदिरांची गावे आणि चोवीस पर्यटन स्थळांची माहिती समाविष्ट केली आहे.
पुस्तकातील लेखांचे वाचन करताना आपणाला अनेक स्थळांची नव्याने माहिती मिळते.त्या स्थळांचे ऐतिहासिक संदर्भ समजतात.मंदिरांच्या स्थापत्य शास्त्राचे ज्ञान मिळते.पर्यटन स्थळांना भेटी देताना अगोदरच आपणाला त्या स्थळाची माहिती असेल तर पुर्व नियोजन करण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग भ्रमंती करणारांना होईल असे मला वाटते.
पुण्याचे गडदुर्ग अभ्यासक व लेखक प्र.के.घाणेकर यांच्या दृष्टीतून यातील लेखांचे संस्करण झाले असून निनाद बेडेकर यांनी बारीकसारीक माहिती दिली आहे.याचा आवर्जून उल्लेख लेखकाने मनोगतात केला आहे.तसेच सकाळचे संपादक श्रीकांत कात्रे यांनी यातील लेखांना प्रसिद्धी दिली आहे. इतरही मासिकं आणि दैनिकात यातील लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच गड दुर्ग अभ्यासक व लेखक प्र. के.घाणेकर यांचा शुभेच्छा संदेश या पुस्तकाची खासियत वाढणारा आहे.तसेच समर्पक आणि यथार्थ शब्दात स्थळांचे वर्णन लेखक आदित्य फडके यांनी केले आहे..
‘साताऱ्याच्या मुलखात’या पुस्तकातील भ्रमंतीचे पर्यटनाच्या लेखनासोबत योग्य तिथं मार्गदर्शक नकाशे रेखाटले असून हरेक ठिकाणांचे साताऱ्यापासून अंतर नमूद केले आहे.तसेच साताऱ्याच्या मुलखातातील लोकप्रिय आणि प्रेक्षणिय किल्ले अजिंक्यतारा, चकदेवच्या कड्यावरील शिड्या, चारभिंती, पुसेसावळी येथील संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा,मेणवली येथील कृष्णेचा घाट,केटस् पॉईंट,परळी येथील स्तूप, शेमडीचे श्री गणेश मंदिर,दाते गडावरील विहीर,धोम येथील पुष्करणी, लिंबची बारामोटेची विहीर,निसर्ग दृश्य,मल्लिकार्जुन परबत,माहुलीचे मंदिर,चंदन गडावरील पाषाणस्तंभ आणि पाटेश्वर मंदिराचे रंगीत छायाचित्रे आपणाला भुरळ घालणारी आहेत.
साताऱ्यातील विविध स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी पुर्व नियोजन करण्यासाठी हातभार लावणारे हे उपयुक्त पुस्तक आहे.तसेच अनवटवाटेने सह्याद्रीच्या डोंगररांगा पायदळी भटकताना काय काळजी घ्यायची याचीही माहिती दिली आहे. एकदंर फिरस्ती करणाऱ्या रसिक वाचकांना हे पुस्तक वाचनाचा आनंद देत भटकंतीचे मनसुबे रचायला उद्युक्त करेल असे माझे मत आहे.. अप्रतिम शब्दात गडकिल्ले,मंदिरे आणि पर्यटन स्थळांचे वर्णन केले आहे.
पुस्तक परिचय:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ८फेब्रुवारी २०२६

खूप छान परिचय करून दिला आहे
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete