पुस्तक परिचय क्रमांक:२६९ नक्षत्रचित्रे






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६९
पुस्तकाचे नांव-नक्षत्रचित्रे
लेखक: शांता ज. शेळके 
प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर-२०२५ 
चौथी
पृष्ठे संख्या–८८
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६९||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -नक्षत्रचित्रे
लेखक: शांता ज.शेळके
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 स्नेहसंबंधाच्या अवकाशात चमकणाऱ्या महत्त्वाच्या नक्षत्रांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे नक्षत्रचित्रे! हे लेखिका शांता शेळके यांनी दिलेले समर्पक आणि यथार्थ नाव. ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील साठ वर्षे त्यांनी चौफेर साहित्य लेखन केले.मग ते गीतलेखन,कथा कादंबरी लेखन, काव्य, चित्रपटातील गाणी लेखन अथवा ललित लेखन.निर्मळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी सृजनशील साहित्य शब्दबध्द केले आहे.
‘नक्षत्रचित्रे’या पुस्तकात ज्यांच्या विषयी लिहिलं आहे ती माणसं सामान्य नव्हेत.तर त्यांचं कलावंत म्हणून किंवा लेखक म्हणून असणारे मोठेपण शांताबाईंनी प्रत्यक्षपणे 
अनभवून,त्यांच्या सहवासात गप्पा गोष्टी करत.अन् त्यांच्या समवेत मिळालेलं काम करत असताना त्यांनी अशा महान कलावंतांची स्वभावविशेष, वैशिष्ट्ये टिपून त्यांच्यावर भावस्पर्शी लेखन केले आहे.
या पुस्तकाविषयी व्यक्त होताना लेखिका अरुणा ढेरे म्हणतात की, “शांताबाईंजवळ माणसांविषयी मोठं जिवंत कुतूहल होतं. माणसांचं हसणं-बोलणं, राहणं -वागणं, त्यांचं घर ,त्यांचं कुटुंब या सगळ्या गोष्टी 
त्यांच्या कुतूहलाचा विषय असत.”
कोणताही उत्तम ललित लेखक एखाद्या घटना-प्रसंगविषयी किंवा व्यक्तीविषयी लिहितो तेव्हा त्या लेखनात तो  नसल्यासारखा असला तरी असतोच.तर कधी कधी लेखन विषयाइतकाच त्याचाही वावर तिथे असतो;पण लेखनविषय आणि लेखक यांचं असं काही रसायन तिथे झालेलं असतं की ,लेखकाचं तिथलं अस्तित्व आपल्याला खुपत तर नाहीच ,उलट त्याच्या दृष्टीकोनाचा, समृद्ध जाणिवांचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा सूक्ष्म परिचय आपल्याला होतो. असा अनेकपदरी आनंद देण्याचं काम आदरणीय जेष्ठ लेखिका शांताबाई शेळके यांनी केले आहे.
‘नक्षत्रचित्रे’या पुस्तकातून जणू काही नक्षत्रांचं देणं रसिक वाचकांना दिलं आहे.जे आपल्यासाठी कलावंतांचे जीवनगाणे कसं असतं याची महती देणारं आहे.यामध्ये आठ असामान्य व्यक्तिमत्वांचा प्रभाव लेखिका शांताबाई शेळके यांच्यावर पडला.जो त्यांच्या साहित्य कार्याला आजतागायत शिदोरी सारखा उपयोगी पडला.त्याचेच समर्पक शब्दात आणि सहज सुंदर सोप्या शैलीत शब्दचित्रे व्यक्ती चित्रे रेखाटली आहेत.
जेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा ‘गीतलेखन: पहिला धडा, आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे बाबुजी तथा सुधीर फडके यांचा ‘मंतरलेले दिवस’, वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा
‘आठवणींतले कुसुमाग्रज’, जेष्ठ लेखिका इंदिरा संत यांचा, ‘इंदिराबाई:काही भेटी’, बालमित्र भा.रा.भागवत , मित्रांना जिंकलेला रणजीत देसाई, लेखक आणि माणूस व.पु. काळे आणि लेखिका विजया राजाध्यक्ष यांच्यावरील ‘विजयाबाई’ असे  मर्मबंधातली ठेवीसारखे भावस्पर्शी लेख शांता शेळके यांनी गुंफलेले आहेत.
या पुस्तकाचे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक शांताबाईंच्या निधनानंतर सुरेश एजन्सीचे प्रकाशक बाळासाहेब कारले आणि शैलेंद्र कारले या दोघा पितापुत्रांनी प्रकाशित केले.अन् सदर पुस्तकाविषयी उठावदारपणाचा लेख लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिला आहे.
या पुस्तकातील लेख म्हणजे महनीय व्यक्तींच्या साहित्यिक कार्याची ओळख उठावदार करणारी आहे.भाषा शैली आणि शब्दकळा तर सतत वाचतच रहावे असे वाटते.त्यांची ही शैली आपणास गारुड करते.प्रत्यक्ष त्यांची मुलाखत लेखिका घेऊन त्याचे अभिवाचन करतायत असं वाटतं.यातील अनेक वर्णने,कोटेशन किंवा मायने आपणाला कार्यक्रमात कोटेशन पेरायला उपयोगी पडतील अशी अप्रतिम आहेत.लेखक म्हणून जाणीवपूर्वक काही वाचावे अन् व्यासंग वाढवावा ,असे वपुंच्या मनात कधी रूंजी घालीत असेल असं लेखिका शांताबाई शेळके यांना कधी वाटलं नाही.कारण माणसे हाच त्यांच्या निरीक्षणाचा, कुतूहलाचा,अभ्यासाचा आणि अथांग सहानुभूतीचाही विषय होता.
माणसं हाच त्यांचा पॅटर्न आणि पार्टनर होता.कारण वपु माणसं फार चांगली पाहत आणि त्यांच्यावर गुणदोषांपलीकडे जाऊन माणसांवर प्रेम करीत…
स्वामीकार रणजित देसाई म्हणजे दिलदार रसिक. जीवनाबद्दल अथांग औत्सुक्य असलेलं उमदं व्यक्तिमत्त्व.वाचन आणि प्रवास भरपूर करुन त्यांनी व्यक्तीमत्त्व संपन्न आणि समृद्ध बनवले होते.जे जे पवित्र, उदात्त,सुंदर भव्य असेल तिथे रणजित अंत:करणापासून लुब्ध होत आणि त्यांची उत्कृष्ट चित्रे ते आपल्या साहित्यातून रंगवत.असं दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या रणजित देसाई यांच्या आयुष्यातील अंतरंगाची ओळख होते.
‘गीतरामायणा’तल्या गीतांना उत्तम गायक हे बाबूजींचे सर्वपरिचित लोकप्रिय रुप माहीत आहे.पण ते सुद्धा सामाजिक बांधिलकी मानणारे कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते.
संगीतप्रेमाच्या जोडीनेच देशसेवेची प्रेरणाही बाबूजींच्या व्यक्तिमत्वात होती.
वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या साहित्य आणि स्नेहाच्या सुंदर आठवणींचा मिलाफ शांताबाई शेळके यांनी अप्रतिम शब्दांत गुंफला आहे. साहित्याशिवायची त्यांची स्वभाव वैशिष्टे अतिशय समर्पक शब्दात त्यांनी मांडलेली आहेत.वाचताना 
प्रत्यक्ष आपण कुसुमाग्रजांशी हितगुज साधतोय. इतकं सुंदर लेखन केले आहे.
   नक्षत्रचित्रांतील अक्षरचित्रे वाचून आपणाला सर्वश्रेष्ठ सर्वश्रुत साहित्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील अंतरंग आणि लेखिकेशी असणारा स्नेहल
सहवासातील सुखद आठवणींचे गाठोडे  वाचायला लाभतेय,हीच रसिक वाचकांना सदभाग्याची गोष्ट आहे.

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 

लेखन दिनांक- १४ फेब्रुवारी २०२६



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी