पुस्तक परिचय क्रमांक:२७१ तराळ -अंतराळ



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७१
पुस्तकाचे नांव-तराळ-अंतराळ
लेखक: शंकरराव खरात 
प्रकाशन-कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१७ पुनर्मुद्रण 
पृष्ठे संख्या–५०२
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-४००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७१||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -तराळ-अंतराळ
लेखक: शंकरराव खरात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  क्रांतिसूर्य,दलितांचे कैवारी भारतरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते,लेखक , कादंबरीकार आणि दलित साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.

 “अग्नीमधून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही;बळही वाढत नाही म्हणून पददलित माणसांना हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होणार नाही.”
    –-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 

‘तराळ-अंतराळ' हे समाजशास्त्रज्ञ तथा वैचारिक आंबेडकरी चळवळीतील लेखक शंकरराव खरात यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे.’’महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे.”असा लेखक शंकरराव खरात आवर्जून उल्लेख करत.
 जीवनाभुवातून साकारलेली थोर लेखक शंकरराव खरात यांची ही आत्मकथा. अनुभूतीचे ढग भरून यायचे आणि त्यातून पाणी बरसायचे.माझ्या लेखनाचा झरा जिवंत ठेवण्यासाठी व लेखक म्हणून जगण्यासाठी त्यांनी काही पदाचा त्यागही केला आहे.ते म्हणतात की, “मी जीवनात भोगलेल्या जगलेल्या अनुभवाची नदी पाऊसकाळात भरुन वाहते.तशी वहात होती.पण मला ते सगळे पाणी अडवून अजून तरी माझ्या वाड्मयात वळवता आले नाही.
१९८४ साली जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून ते शिवाजी व मुंबई विद्यापीठाच्या सिलेक्शन कमिटी सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक विचारांचे  लेखन प्रकाशित केले आहे.  गावकुसाबाहेरील समाजाचे अंतरंग आणि जीवनाचे रहाटगाडगे त्यांनी अनेक कथा कादंबरीत मांडले आहे.जीवनातील संघर्ष,दाहकता आणि संवेदनशील समर्पक शब्दात समर्थपणे मांडली आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात (ललित),सांगावा तडीपार या साहित्याला पुरस्कार देऊनमहाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे.
‘तराळ -अंतराळ’ या आत्मकथेत लेखक शंकरराव खरात यांनीआयुष्याचा सारीपाट वास्तवतेच्या लेखणीतून सुसंगतपणे साकारला आहे.गरीबी, संघर्ष आणि सामाजिक विषमता यावरील त्याचे विवेचन आणि वर्णन वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.त्यांनी जीवनातील सुखदुःखाच्या घटना प्रसंग आणि गोष्टी अतिशय साध्या सोप्या भाषेत आणि ग्रामीण बोलीभाषेत व्यक्त केल्या आहेत.
चिकाटी, जिद्द,मेहनत आणि शिक्षण यांच्या जोरावर आपण जीवनाला सामोरे गेलो तर आपले ध्येय साध्य होते.हेच अधोरेखित करणारे त्यांचे आत्मचरित्र आहे.शिक्षणामुळे जीवनाला कलाटणी मिळते हे पटवून देणारे हे आत्मचरित्र..
 
ही आत्मकथा म्हणजे त्यांच्या समाजाची कथा आहे.एका वक्तीच्या,एका समाजाच्या, एका गावाच्या मानसिक, सामाजिक, वैचारिक जीवनात घडत आलेल्या, चाललेल्या विकासासाठी  दिलेल्या झुंजीची ही कथा आहे.तसेच गौरवाची गोष्ट म्हणजे या पुरस्कारविजेत्या आत्मकथेचे हिंदीतही भाषांतर झाले आहे.
‘पत्र’ वाचून  घेण्यासाठी वडिलांना गुरुजींच्या घरी जाऊन लाकडं फोडावी लागतात.झारीतल्या पाण्यासारखं पावसाळ्यात गळणारं माझेघर. वर्णन वाचताना आपणास आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.झाडलोट करायला वाड्यावर जाणाऱ्या आयाबाया,जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या आटपाडी गावचे वर्णन.खिशात दमडीही नसताना वडिलांनी लेखकांना दाखवलेली गावजत्रा.
लग्नकार्यातील खरकट्या अन्नावर गुजराण करणारा उष्टे हा लेख वाचताना जीवाची घालमेल होते.नकळत डोळ्यात अश्रू दाटून येतात.गावची रेडं-यात्रा,गाडीत हात घालून केलेली आंब्याची चोरी,मला शाळेत पकडून नेतात हा प्रसंग प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी कसं उचलून नेलं ते वाचताना त्या काळच्या शिक्षणव्यवस्थेचा उलगडा होतो.अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आपलं जीवन कसं घडवलं याचा जबरदस्त शब्दचित्र रेखाटले आहे.तसेच माझी दुसरी शाळा, गावकीतराळकी,वाळीत, साक्षरता प्रसार आदी लेख समाजव्यवस्थेचे अंतरंग उलगडून दाखविणारे आहेत.
  वंचित घटकातील  माणसाच्या संघर्षाची जाणीव करून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. हे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही,तर समाज समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- १४ एप्रिल २०२६






Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी