पुस्तक परिचय क्रमांक:२७० शहीद भगतसिंग



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७०
पुस्तकाचे नांव-शहीद भगतसिंग 
लेखक: प्राचार्य व.न. इंगळे 
प्रकाशन-साकेत प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६ 
सहावी
पृष्ठे संख्या–१५२
वाड़्मय प्रकार-चरित्र
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७०||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -शहीद भगतसिंग 
लेखक: प्राचार्य व.न.इंगळे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

 वंदे मातरम्!!!इन्कलाब जिंदाबाद!!! भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती मशाल प्रेरणाज्योत, ‘शहीद भगतसिंग’.ते केवळ क्रांतिकारकच नव्हते तर निर्धर्मी समाजवादी विचारांचे लेखक व पत्रकार होते.तसेच त्यांचे ग्रंथप्रेमही विलक्षण होते. यातून आपणाला दिसते त्यांची अभ्यासू वृत्ती आणि विवेकवादी दृष्टी. “जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मातृभाषेचा आणि इतर भाषांचा अभ्यास केला पाहिजे.”हे त्यांचे विचार आजही लागू पडणारे आहेत.त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता.त्यांचे हे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती म्हणून सर्वांना प्रेरणादायी आहे.
लाखो तरुणांच्या हृदयातील ताईत असणारे देशप्रेमी आणि क्रांतिवीर भगतसिंग यांचे आत्मचरित्र ‘शहीद भगतसिंग’हे पुस्तक सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य व.ना.इंगळे यांनी लिहिले आहे.
नवयुवक हाच खऱ्या अर्थाने क्रांतिचा अग्रदूत असतो.आजच्या नवयुवकांपुढे हे आत्मचरित्र म्हणजे मरगळलेल्या युवकांच्या मनाला चेतना व प्रेरणा देणारे आहे.शहीद भगतसिंग यांची जन्मशताब्दी  दिनांक २८सप्टेंबर २००६पासून वर्षभर साजरी झाली होती.समाज विज्ञान समितीचे अध्यक्ष सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय श्री पी बी सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी लेखकांना लाभली.त्याचवेळी भगतसिंग यांचे चरित्र लिहीणार असल्याचे घोषित केले. ‘भगतसिंग यांची क्रांतियात्रा’हे चरित्र १०ऑगस्ट २००६रोजी शुभारंभ करुन ३०ऑक्टोंबर २००६रोजी लेखनाला विराम दिला.अन् पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

निधर्मी लोकशाही समाजवादी सत्ता भारतात आणण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनातील हरेक क्षण कामी लावला. शहीदभगतसिंग यांना फक्त साडेतेवीस वर्षाचे आयुष्य लाभलं.जीवनाची लांबी लहान पण खोली जितकी खोल तितकीच उंची आभाळाला भिडणारी उंचच उंच!!!
याच काळात त्यांनी देशाला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या बहुमोल योगदानाची महती आणि त्यांच्या कार्याचे 
गगनचुंबी कर्तृत्त्व लेखकांनी संदर्भ साहित्याचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून समर्पक शब्दात क्रांतिकारी गाथा शब्दबद्ध केली आहे.अभ्यासलेल्या ग्रंथांची सूची अंतिम पृष्ठावर दिली आहे.भगतसिंग यांची वाट काट्याकुटयांनी व खाचखळग्यांनी भरलेली होती.ती एक क्रांतिची यातनामय यात्रा होती.या यात्रेत ते घडत होते.विचाराने प्रौढ बनत होते कृतीने शूरवीर होते.अन् क्रांतिच्या विचारानं प्रज्वलित होत होते. त्यांना आयुष्य कमी लाभले पण त्यांनी आकांक्षेची मशाल अंतिम श्वासापर्यंत पेटती ठेवली होती.
क्रांतिचे महान कार्य उठावदार करण्यासाठी त्यांची अभ्यासू आणि विवेकवादी वृत्ती!ग्रंथ हे गुरु आहेत.ते संस्कृतीरक्षक व संस्कृतीवाहक आहेत. त्यांनी किशोरवयातच चुलते अजितसिंग यांच्या घरगुती ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले होते.नॅशनल कॉलेज लाहोर येथे प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी ‘नवजवान भारत सभा’हा पक्ष स्थापन केला होता.ध्येयवादी ज्वलंत आणि जळजळीत क्रांतिकारकत्व,ग्रंथप्रेमी,मातृभाषेचे अभ्यासक आणि पत्रकार अश्या वैचारिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली होती.

अमृतसर येथील जालियनवाला बागेत स्वातंत्र्य चळवळीच्या सभेसाठी एकत्र जमलेल्या समुदायावर इंग्रजांनी अमानुषपणे केलेल्या अंधाधुंद गोळीबारात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला होता.ही दु:खद बातमी लाहोरमध्ये शिकत असलेल्या भगतसिंग यांना समजल्यावर दुसऱ्या दिवशी शाळेत न जाता कुणालाही न सांगता तडक ते चालत अमृतसरला पोहोचले.तिथं गेल्यावर आपल्या बांधवांच्या रक्ताने माखलेली माती त्यांनी बाटलीत भरून आणली.त्या मातीनेच भगतसिंग यांना इंग्रजांविरुद्ध उठाव करायला प्रेरणा दिली.
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती असेंब्लीत बॉम्ब टाकला होता. पुढं काय घडेल याची तमा न बाळगता इंग्रज सरकारच्या कानावर आदळावे यासाठी त्यांनी हे काम केले होते.या खटल्याचे रसग्रहण करताना तपशीलवार माहितीचे विश्लेषण लेखकांनी केले आहे.
संदर्भासह स्पष्टीकरण नोंदविले आहे.
राष्ट्राचे वर्तमान उज्ज्वल करणे.मोठमोठी साम्राज्ये उलथून टाकणे.पतितांचं उत्थान करणं; अन् साऱ्या जगाला प्रगतिपथावर नेणं युवकांच्या हातात असते.समाजाचा भाग्यविधाता युवकच असतो.खरा युवक जराही न डगमगता हसता हसता मृत्यूला कवटाळतो.बेड्यांच्या तालात राष्ट्रप्रेमाचे गाणं गात फाशीच्या तख्तावर आरुढ होतो…असे नवयुवकच शहीद भगतसिंग यांचे विचार आणि आदर्श जपू शकतात.
अप्रतिम शब्दांकनात शहीद भगतसिंग यांचे आत्मचरित्र लेखक इंगळे यांनी रेखाटले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २६फेब्रुवारी २०२६


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी