पुस्तक परिचय क्रमांक:२६६ स्वीकाराची जादू
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६६
पुस्तकाचे नांव-स्वीकाराची जादू
लेखक:सर्वश्री
प्रकाशन-वॉव पब्लिशिंग, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०२५पुनर्मुद्रण
पृष्ठे संख्या–९८
वाड़्मय प्रकार-वैचारीक ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य-१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -स्वीकाराची जादू
लेखक:सरश्री
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
‘विचार नियमन’ आणि ‘शोध स्वतःचा’चे रचनाकार सरश्री यांनी हिंदी भाषेतील या आवृत्तीचा अनुवाद मराठीत केला आहे. आपणाला झटकन पटकन आनंद मिळवायला कोणती गुरुकिल्ली वापरायची याचे प्रात्यक्षिकसह विवेचन करणारा हा वैचारिक ग्रंथ ‘स्वीकाराची जादू’.
धावपळीच्या जीवनात सध्या हरेक माणूस कुटूंबाच्या सुख समाधानासाठी अहोरात्र काम करत असतो.ते काम करताना खऱ्या आनंदाच्या शोधात भटकत असतो.पण खरा आनंद न गवसल्याने धनदौलत, मानसन्मान, पदप्रतिष्ठा,नावलौकिक आणि करमणूक अशा भौतिक सुखाच्या गोष्टीत आनंद शोधत राहतो.पण त्याला खरंच आनंद सापडतो का? म्हणून सरश्री म्हणतात की,“स्वीकाराच्या जादूमुळे सुखाचा खजिना प्राप्त करायचा की अस्वीकाराच्या शापाने जीवनभर तक्रारीच करत बसायचे हा निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल”असं लेखकाचा हेतू
ब्लर्ब मधून अधोरेखित होतो.सरश्रींनी दिलेला संदेश म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रकाशाचा एक छोटासा किरणच ज्ञानाच्या तेजसूर्यापर्यंत कसं जावं अन् आनंद कसा मिळवावा? हेच या पुस्तकाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
आनंदाचे इंगित उघडून देणाऱ्या ‘स्वीकाराची जादू’या पुस्तकाच्या एक लाख पंचावन्न हजारांपेक्षा जास्त प्रतींचा खप झालेला आहे.सुखाचा स्वीकार करा आनंदाचा लाभ मिळेल.दु:खाचा अस्वीकार करा तर आनंदच लाभेल.या पुस्तकात लेखांचा समावेश दोन खंडात असून पुन्हा एकूण चौदा भागात केलेला
आहे. प्रस्तावनेत या पुस्तकाचा लाभ कसा घ्यावा याचे समर्पक शब्दात विश्लेषण केले आहे.उत्तरार्धात तेजज्ञान फाऊंडेशनची माहिती दिली आहे.पहिला खंड स्वीकार… आनंद मिळविण्याचा मार्ग तर दुसरा खंड आनंदाचे प्रकार व त्यातील बाधा या नावाने आहे.पहिल्या खंडात एक ते आठ भाग समाविष्ट असून दुसऱ्या खंडात नऊ
ते चौदा भाग आहेत.
‘स्वीकाराची जादू’या पुस्तकाचे रसग्रहण आपण जर खुल्या मनाने आणि दिलाने करून सूत्र,मंत्र आणि मुद्रा यांचा उपयोग करत कोणतेही अनुमान न लावता केलात
तर हे पुस्तक तुमच्या जीवनात जादू निर्माण करेल आणि तुमचे जीवन आनंदमय करेल.असं प्रात्यक्षिकासह वर्णन या पुस्तकात दिले आहे.काही उदाहरण दाखले आपण वाचताना आपण प्रथमदर्शनी म्हणू शकतो की हे करणं इतकं सरळ सोपं नाही.लगेच आनंदाला भरतं येईल हे ही अशक्य आहे.पण पुढे पुढे वाचताना दिलेल्या सूचनांचे पालन केले तर सहजपणे आपणाला समजेल असं सरश्री यांनी नमूद केले आहे.
माणूस भीती आणि असुरक्षिततेमुळे संकुचित जीवन व्यथित करत असतो.या संकुचितपणामुळे तो इतका आक्रसून गेला आहे की शरीराबरोबर त्याचे विचार,बुध्दी व मन देखील संकुचित झाले आहे.यातून बाहेर येऊन विकसित होण्यासाठी त्याला कारणाशिवाय मिळणारा आनंद प्राप्त करावा लागेल.आनंद मिळवण्यासाठी स्वीकाराची जादू शिकून पहिले पाऊल उचलू या…
“क्षणभंगूर आनंदालाच खरा आनंद मानून माणूस आयुष्यभर अज्ञानातच जगतो, अन् अवघं जीवन वाया घालवतो.”लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पुस्तक उपयोगी पडेल असे मला वाटते.
हे पुस्तक वाचताना आपण आपले आत्मपरीक्षण करु शकतो.स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.तसेच आपल्या नकारात्मक भावनांचे दमन करु नका व त्यांचा उद्रेकही होऊ देऊ नका.मध्यम मार्ग स्विकारुन नकारात्मक भावना व्यक्त कराव्यात.
आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटना व पैलूंचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी या पुस्तकाचे रसिक वाचकांनी स्वागत करावं असं पुस्तक आहे.
परिचरक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २५जानेवारी २०२६

Comments
Post a Comment