पुस्तक परिचय क्रमांक:२६४ बापमाणूस
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६४
पुस्तकाचे नांव-जग बदलणारा बापमाणूस
लेखक: जगदीश ओहोळ
प्रकाशन-जगदीशब्द प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ५५वी आवृत्ती
पृष्ठे संख्या–२४४
वाड़्मय प्रकार-वैचारीक ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य-३५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-जग बदलणारा बापमाणूस
लेखक:जगदीश ओहोळ
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
ज्ञानाचे प्रतीक महामानव, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्ववंद्य,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी विचारधारा मांडलेलं, तसेच कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेलं अन् नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न,विश्वरत्न डॉक्टर आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमराव ते मोटिव्हेशनल बाबासाहेब सध्याच्या पिढीसमोर ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकातून सुप्रसिध्द व्याख्याते तथा लेखक जगदीश ओहोळ यांच्या लेखणीतून साकारलेले अक्षरसाहित्य;ज्या पुस्तकाच्या पंचावन्न आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
आकर्षक आणि नेत्रदीपक मुखपृष्ठ ज्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी आणि प्रसन्न मुद्रा आपले लक्ष वेधून घेते.तसेच मलपृष्ठावर डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केलेल्या विचारवंतांचे अभिप्राय या पुस्तकाचा आशय अधोरेखित करतात.मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर, जेष्ठ विचारवंत व कामगार नेते डॉ.बाबा आढाव, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर,बीबीसी मराठी नवी दिल्लीचे संपादक, अभिजीत कांबळे, सुप्रसिद्ध वक्ते व विचारवंत आणि दैनिक लोकमतचे संपादक,संजय आवटे,संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि ‘गोष्ट पैशापाण्याची’या पुस्तकाचे लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे अभिप्राय पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण करतात.
मलपृष्ठाच्या आतील पानावर जेष्ठ विचारवंत आणि लोकप्रिय साहित्यिक डॉ.आ.ह.साळुंखे यांचा ‘पाठराखण’पर सर्व समावेशक लेख आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ठळक घडामोडी आणि महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा प्रेरणादायक पध्दतीने शब्दबध्द केला आहे.आपल्याकडे प्रेरक वैचारिक साहित्य म्हणजे परदेशी लोकांचे साहित्य.मग धडाधड त्यांचे नावे घेतात. त्या लोकांना व तरुणाईला बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरक प्रवास उलगडून दाखविण्यासाठी,सांगण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाला
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा योजना आयोगाचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांची समर्पक शब्दात प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात की,“लेखक जगदीश ओहोळ यांची लेखनशैली वाचकांना नक्कीच खिळवून ठेवणारी आहे.अनेक प्रसंगातून आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रुपं वाचकांच्या नजरेसमोर उभी केली आहेत.हे पुस्तक वाचून वाचकांचे जग नक्कीच बदलून त्यांना व बाळासाहेबांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल.”असे वाटते. “साताऱ्यात वर्गाबाहेर बसून शिकणारा एक अस्पृश्य विद्यार्थी ते कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी”,ही लेखक ओहोळ यांनी केलेली गुंफण ज्ञानपिपासक विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे.यातील बऱ्याच घटना प्रसंगांचे वर्णन हृदयाला भिडणारे आहे. मंत्रमुग्ध करणारे आहे.
‘मनातून’या लेखातून लेखक जगदीश ओहोळ वाचकांशी हितगुज साधतात.मनात घोंघावत असणाऱ्या विचार वादळाला मिळालेलं लिखित मुर्त स्वरूप म्हणजे मोटिव्हेशनल लेखन ‘जग बदलणारा बापमाणूस’ आहे.जीवघेण्या आजारातून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देणारं,अन् व्यासपीठावर विचार मांडण्याचे धैर्य देणारं नांव आहे.जग बदलणारा बापमाणूस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर!!!
भारतातील बहुजनांचं, अस्पृश्यांचे,स्त्रियांचे जग गुलामीचं होतं.त्यांचं जग समृद्ध करण्यासाठी व त्यांना स्वतःचे आकाश खुले करण्यासाठी,त्यांचे आयुष्यच बदलण्यासाठी उभे राहिलेले महामानव मुक्तीदाते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!या सगळ्यांचे जग बदलण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पण करून जग बदलून दाखवले.त्यांना जगण्याचे अस्तित्व निर्माण करुन देण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बापमाणसाने केले.
एक्कावन्नावा आवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी
रसिक वाचकांनी या मोटिवेशनल पुस्तकाचे अभिप्राय सोशल मीडियावर भरभरून लिहिल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.तसेच हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळालेल्या बापलेकाची गोष्ट नमूद केली आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ जिथं बाबासाहेब शिकले,घडले तिथं बाबासाहेबांचा गौरव ‘ज्ञानाचा प्रतीक’ म्हणून केला आहे.तिथंच या पुस्तकाचे प्रकाशन झाले.हा या पुस्तकाचा जागतिक गौरव आहे.
‘ जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकात
एकंदरीत सत्तावीस लेखांत बाबासाहेबांचे वैचारिक व्यक्तीमत्व रेखाटले आहे.त्याची शीर्षके विषयआशयाची यथार्थता पटवून देतात.लेख लेखनाची पध्दत तर अप्रतिम आहे.प्रथम शीर्षक तदनंतर त्यातील मध्यवर्ती कल्पना सार रुपाने समर्पक शब्दात मांडली आहे.तर पुढे लेखातील महत्त्वाचा प्रेरणादायी मजकूर चौकटीत ठळकपणे पुन्हा दिलेला आहे.तर काही लेखांपुर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृष्णधवल छायाचित्र आणि लेखाचा मतितार्थ यथार्थ शब्दात प्रस्तुत केला आहे.१)आईविनाचं पोरकेपण ते कोट्यवधी लेकरांची आई!२) वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन!३)वेध कोलंबियाचे!४) जागतिक अर्थतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!५) जर्मनीच्या बॉन विद्यापीठात!६) तहानलेला विद्यार्थी ते चवदार पाणी!७)करमाळ्यात कडाडले!८) शेतकरी नेते!९) महिला व कामगारांचे तारणहार!१०) माणगाव परिषद: राजकीय आंबेडकर पर्वाची सुरुवात!११) जगात आलं नवं आंबेडकर युग!१२)जग बदलणारा बापमाणूस !१३)सर्वहारा ते शासनकर्ता!१४)नवा कायदा,नवा देश -शिल्पकार आंबेडकर! १५)नवा पर्याय!,१६) उगवत्या सूर्याच्या देशात तळपतो प्रज्ञासूर्य!१७) कोलंबियाच्या इतिहासातील बा माणूस!१८)अमेरिकेत ‘स्टॅच्यू ऑफ इव्कालिटी! १९) जयभीम नेटवर्क हंगेरी!२०) बॅरिस्टर ते बॅरिस्टरच्या नव्या पिढ्यांची प्रेरणा!२१)अभ्यास ते अभ्यासक्रमात!२२) मेलबर्न मध्ये मार्गदाता २३)‘न्यूयॉर्क ते यॉर्क’प्रभाव आंबेडकर!२४)जगाचा प्रेरणास्रोत! २५)लाखोंची गर्दी,करोडोंची पुस्तकं अन् विचारांची मस्तकं!२६) अस्पृश्य ते बोधिसत्त्व २७) विश्वरत्न! इत्यादी प्रेरणादायी लेखमाला समर्पक शब्दात गुंफली आहे.हरेक वाक्य न वाक्य आपणाला विचार करायला लावते.इतकं काळजाला भिडणाऱ्या भावस्पर्शी शब्दांकनात विचारांचे सौंदर्य शब्दबध्द केले आहे.
जगातील विविध विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले आहेत.त्याचप्रमाणे विविध देशांतील चौक आणि उद्यानात त्यांचे पुतळे उभारले आहेत.तसेच अनेक देशातील महत्त्वाच्या रस्त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामभिधान दिले आहे.अनेक देशात ‘सोशल मोटिव्हेशनल सिम्बॉल’ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्विकारले आहेत.जगामध्ये भारतीय सुपुत्राचा ‘नॉलेज सिम्बॉल’म्हणून गौरव होत आहे.ज्ञानाच्या जोरावर जगामध्ये कार्यकर्तृत्व गाजवणारे बाबासाहेब! म्हणून जग त्यांच्या ज्ञानाला सलाम करते…. विचारांची प्रेरणादेणारे अप्रतिम पुस्तक, जग बदलणारा बापमाणूस!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ७नोव्हेंबर २०२५ विद्यार्थी प्रवेश दिन….

Comments
Post a Comment