पुस्तक परिचय क्रमांक:२५२ पारितोषिक
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५२
पुस्तकाचे नांव-पारितोषिक
लेखक : व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, डिसेंबर,२०१३
पृष्ठे संख्या–१३६
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१६०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-पारितोषिक
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
सुप्रसिद्ध जेष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांचा आस्वाद घेताना आपण मंत्रमुग्ध होतो.कुतूहल वाढवणाऱ्या आणि गाव खेड्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या या कथा असतात.त्यांनी अनेक कथांमधून गावीतील व्यक्तिंची,सहवासातील माणसांची आणि निसर्गाचा मुक्तपणे आस्वाद घेणाऱ्या पशुपक्ष्यांची शब्दचित्रे आपल्या लेखणीने उठावदार करून त्यांची नाममुद्रा उठावदार केली आहे. यातील कैक जणांच्या मदतीने गावाकडच्या जंगलात लेखकांनी शिकार केलेली आहे. अशा व्यक्तिंचा कथासंग्रहात लेख प्रसिद्ध करून त्यांच्या स्वभावगुणांना, मराठी कथेच्या प्रवासाला‘पारितोषिक’या कथांतून गौरवण्यात आले आहे.या कथासंग्रहातील कथा प्रामुख्याने तीन प्रकारात विभागल्या आहेत.कथा,व्यक्ती आणि स्मरणे.कथा कधी हास्याची मुक्त उधळण करीत असतात तर कधी त्याकाळातील आर्थिक आणि सामाजिक स्तराची ओळख करून देतात.तर कधी बालपणीच्या आठवणी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत घेत वाचकांना बालपणीच्या शाळकरी वयातल्या आठवणी डोळ्यासमोर तरळून येतात.तर शिकारीला गेल्यावर तिथल्या गमतीदार आठवणी भुरळ घालतात.
अशा एकापेक्षा एक सरस कथा लोकप्रिय लेखक
व्यंकटेश माडगूळकर यांनी ‘पारितोषिक’कथासंग्रहात समाविष्ट केल्या आहेत.यातील सगळ्या कथा प्रकाशनापुर्वी त्याकाळच्या नामांकित आणि लोकप्रिय दिवाळी अंक आणि मासिकात प्रसिद्ध झालेल्या असून.यातील काही कथांनी बक्षिसे मिळविली आहेत.मौज,आवाज ,सत्यकथा, स्वरमाला, केसरी, दीपज्योत आणि रविवार सकाळ पुरवणीत प्रकाशित झालेल्या आहेत.तसेचप्रारंभी संभाजीनगर वास्को गोवा येथे एप्रिल १९७५ साली संपन्न झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणाचा समावेश आहे.
या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे , ‘कथा ही सांगायची वस्तू आहे,लिहायची नव्हे, असा सिद्धांत मांडलेलाच आहे.The art of telling stories is in oral one and not a written one…. प्रत्येक लेखकाचा कथेचा बाज,कथाबीज,शैली, आणि कथेची लेखकाचा दृष्टीकोन त्यांनी शब्दबध्द केला आहे.तसेच कथा लघुकथा,दीर्घकथेचा ऊहापोह सुंदर शब्दात व्यक्त केला आहे.
ग्रामजीवना संबंधी लेखकाने लिहिणे हे सगळ्याच देशातून घडलं आहे.तसेच सुरुवातीला आपलं लक्ष आपल्या आसपासच्या जीवनाकडे असतं. आपल्या सभोवतांलचंच जीवन रंगवलं जाते.पुढे ते घासून-पुसून नीटनेटकं करण्यात काही काळ जातो आणि तदनंतर स्वतःचं असं खास बळ मिळाल्यावर मग आपल्या प्रादेशिक जीवनाकडे कथेचा मोहरा वळतो.खेडी गेली,म्हणजे जे राहील,ते हीकथाविषयच होणार नाही का?कथा कशाचं चित्रण करते.शहरी जीवनाचं की खेड्याचं, आजच्या खेड्यातील कालच्या खेड्याचं मोटेचं इलेक्ट्रिक मोटरचं, हा प्रश्न अगदी गौण आहे.ती उत्तम कथा आहे की नाही, एवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या कथेने कलात्मक उंची गाठली आहे की नाही हे पाहणं सगळ्यात महत्वाचं.कथेचं भवितव्य उज्ज्वलच आहे.जगात एक श्रोता आणि एक वक्ता आहे, तोपर्यंत. कथा राहील तर तिला विषयाची वाण कशी पडेल ?माणसं आहेत तोवर ती ह्या ना त्या पद्धतीने वागणारच.त्यांच्या मनात किंवा मनाबाहेर काहीतरी घडत राहणार आणि ते कोणीतरी शब्दात पकडून ठेवणार.आनंद देण्याचं शब्दातलं सामर्थ्य नाहीसे झाले आहे आणि एक दुसऱ्याल्या गोष्ट सांगायला थांबला असं कधी घडले का? तर नाही.
या लिखित भाषणातून आपणाला लोकप्रिय साहित्यिकांच्या गाजलेल्या कथांची माहिती मिळते.तर पारितोषिक, सेवा,कागद,पडद्यामागचा प्रवेश,घोरपड आणि देवाला पत्र.तर कथेत रेखाटलेल्या व्यक्तींच्या हौशी,दादू,भाऊ वैद,मणिभाई,आक्का, उमाजी या कथा तसेच गावाचे आख्यान सांगण्यासारखं गाव,पावसाच्या
नक्षत्रांचे पडणे,त्यांची बोलाभाषेतली विशेषणं ,म्हणी आणि पावसाचे प्रकार आणि पेरणीची सराय असं पावसाचे कवतिक सांगणारी कहाणी पाऊस. ग्रामीण भागातल्या लोकांची करमणूक म्हणजे गावच्या चावडीवर होणारा तमाशा.याचं अस्सल आणि अचूक वर्णन ‘तमाशा आणि तमासगीर’या कथेतून व्यक्त केले आहे.रसग्रहण करताना प्रत्यक्ष आपण तमाशा बघण्याचा भास निर्माण होतो.इतकं सूक्ष्म निरीक्षणात्मक लेखन केले आहे.वडिलांनी एकदा लेखकाच्या हातून लॉटरीचे तिकीट काढले आणि शंभराचे बक्षिस लागले. यामुळे गावातल्या कित्येकांनी खाऊचे आमिष दाखवून लेखकाच्या हातून लॉटरीचे तिकीट काढले.त्याची गोष्ट,‘माझा हातगुण’कथेत मांडलीय तर शाळेतल्या देशपांडे बाईंवर लेखक आणि त्यांच्या दोन मित्र नाऱ्या आणि वकील कसे एकतर्फी प्रेम करत होते.त्या प्रेमाची कथा,‘आम्ही तिघे आणि देशपांडेबाई’.
एकंदर नेहमीप्रमाणेच उत्तम आणि वाचक रसिकांना गारुड करणाऱ्या समस्त कथा.जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनीस सलाम!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- -१०ऑक्टोंबर २०२५

Comments
Post a Comment