पुस्तक परिचय क्रमांक:२५४ आंधळ्याचे डोळे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५४
पुस्तकाचे नांव-आंधळ्याचे डोळे
लेखक : वेद मेहता
अनुवाद:शांता ज. शेळके
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतियावृत्ती, ऑगस्ट,२००६
पृष्ठे संख्या–२३९
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्रात्मक कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-आंधळ्याचे डोळे
लेखक: वेद मेहता
अनुवाद:शांता ज. शेळके
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
अंधारात ज्ञानाचा प्रकाश चमकत ठेवणारे वेद मेहता!!!
इंग्रजी भाषेतील‘फेस टु फेस’हे दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आंधळ्या वेद मेहताचे आत्मचरित्र मराठी साहित्यातील सुप्रसिध्द लेखिका शांता ज. शेळके यांनी अनुवादीत केलेले अक्षरसाहित्य ‘आंधळ्याचे डोळे’.
स्वातंत्र्यपूर्वकाळातील एक हृदयस्पर्शी कथानक. भारतपाक फाळणीच्या काळातील माणूसपणाचं, धर्मभेदाचं वास्तव पटवून देणारं आत्मचरित्र. दंगेधोपे,दंगली आणि मुहल्ले घरे प्रत्येक पेटताना झालेल्या कुटूंबाच्या होरपळेचे व अस्वस्थतेचे दर्शन यातून दिसून येते.
डोळस माणसाने प्रत्यक्षात पाहिलेले घटना प्रसंग सूक्ष्म निरीक्षण करून टिपले नसतील एवढं दर्जेदार लेखन उघड्या डोळ्यांनी न पाहिलेल्या दृष्टीहीन वेद मेहताने आयुष्याचे चित्र अतिशय रसाळ आणि मधाळ शैलीत शब्दबध्द केले आहे.आत्मचरित्रात लेखकाचे व्यक्तीमत्त्व जेवढ्या पूर्णत्वाने प्रतिबिंबित व्हावयास हवे असते तेवढे वर्णन केले आहे. साधारणपणे या पुस्तकात वेदचा जन्म ते अमेरिकेतील पदवीपर्यंतचे शिक्षणाचा प्रवास या चरित्रात उलगडून दाखविला आहे.रसिक वाचकांचे चित्त विकसित आणि विशाल करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात नि:संशय आहे. आकर्षक प्रांजळपणा आहे.भारतातील बालपण आणि अमेरिकेतील तारुण्य याचे शब्दांकन रेखाटताना स्वतः चे अंधत्व वेद मेहता लपवित नाहीत किंवा त्याचे भांडवल करून कनवाळूपणा दाखवू इच्छित नाहीत.जीवनात आजारातून उद्भवलेले अंधत्व आणि त्याचे खास पैलू सहजतेने समर्पक शब्दात रेखाटले आहेत.
अमेरिकेतल्या अंधशाळेत मित्रांच्या सहवासात जे अनुभव आले आणि ज्या नव्या जीवनपद्धतीत स्वतःला रुळावे लागले.त्याचे वर्णन सहजपणे सुंदरशा शब्दसाजात ‘आंधळ्याचे डोळे' या चरित्रात केले आहे.
वेद मेहता,एका पंजाबी डॉक्टरचा मुलगा. वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे डोळे येतात (मेंदूचा ताप)आणि त्यातच तो आंधळा होतो. पंचेंद्रियांतले एक अत्यंत महत्वाचे इंद्रिय म्हणजे दृष्टी.तीच हरपल्यावर विकासाचे सारे मार्गच खुंटतात.समोर फक्त काळा कुट्ट अंधार !!! पण निसर्गतः वेद फारच बुध्दिमान होता आणि ज्ञानाची त्याची भूक विलक्षण तीव्र होती.पंजाबी घरात जन्मलेल्या वेदने मुंबईमधील दादरच्या अंधशाळेत लाहोरवरुन येवून शिक्षणाचे धडे गिरवले होते.तिथं प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी अमेरिकेतील अनेक विद्यापीठांशी संपर्क साधण्याची धडपड केली.शेवटी एका संस्थेने त्याला प्रवेश दिला.आपल्या व्यंगावर मात करून अमेरिकत त्याने सुमारे सात वर्षात जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून पदवीधर झाला.त्याची ही संघर्षमय जीवनगाणे म्हणजे ‘आंधळ्याचे डोळे’.ही कादंबरी चित्ताकर्षक, भावस्पर्शी आणि काव्याहून हृदयस्पर्शी आहे.अदम्य आत्मविश्वास,तीव्र ज्ञानलालसेची साधना आणि अनावर जीवनसक्ती यांची प्रेरणादायी आणि सुंदर गाथा आहे.
नार्मन कूझिन्स यांची प्रस्तावना या कादंबरीला लाभली आहे.वेद मेहता यांनी त्यांच्या सहवासात नाताळ व उन्हाळ्याची सुट्टी घालवली आहे.अनेक प्रसंगाचे ते साक्षीदार आहेत.त्यामुळे वेद मेहता यांची जीवनागाथा प्रस्तावणेतून उठावदारपणे मृदांकित होते.यातील भावस्पर्शी प्रसंगाची आशयघनता समजून येते.
त्यांच्या मूळ पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकातील सर्वच आशयाचा मजकूर कधी टाईपरायटरच्या साह्याने तर कधी टेपरेकॉर्डरवर सांगून लिहिले आहे.पण प्रत्यक्ष लेखकाला या पुस्तकाचे वाचन करणं त्यांच्या अंधत्वाने शक्य झाले नाही.पण डोळस माणसांना रसग्रहण करायला व्यंगावर मात करणाऱ्या वेद मेहता यांचे एक सुंदर भावस्पर्शी जीवनागाणे साहित्यरुपात वाचकांना मंत्रमुग्ध करेल असे रेखाटले आहे.सव्वीस लेखातून ही कादंबरी शांता शेळके यांनी अनुवादित केली आहे. समर्पक शीर्षकातून त्यातील आशय उमगतो.बालपण,स्वप्न व सत्य, हिमालयाच्या पायथ्याशी,अशोकचे दुखणे, पंचमढी परिसर, संगीत शिक्षण, लाहोरला पुन्हा परतणे, पुढील शिक्षण,थोरल्या बहिणीचे लग्न, फाळणीचे बीज, अमेरिकेला जाणे,आर्कान्सास अंधशाळा शाळेतलं राजकारण, घोड्यांच्या जगातले गाढव,शाळेचा निरोप,कॉलेजचे शिक्षण,के ची चित्रकथा, मैत्रीण मेरी आणि इंग्लंडकडे आदी लेखमाला गुंफली आहे.
भारतातील आणि अमेरिकेतील शाळांमध्ये वेदला अनेक शिक्षकांनी ज्ञानपरायणात मदत केली.त्यांनी वेदला ब्रेल प्रणाली, श्रवणाधारित शिक्षण, वाचनासाठी तंत्र आणि संवादाची आत्मनिर्भरता दिली.काही मित्रांनी सुरुवातीला अंधत्वामुळे वेदपासून अंतर ठेवून वागले.पण नंतर त्याच्या आत्मविश्वासामुळे प्रभावित झाले.
वडिलांनी मित्रांनी त्याला सामाजिक आणि भावनिक वाढीला आधार देतात. या आत्मकथेत प्रत्येक व्यक्तिरेखा वेद मेहतांच्या आयुष्यावर परिणाम करते.
कोणी त्यांना धैर्य देते, कोणी प्रेम देते, आणि कोणी जगाकडे पाहण्याची (मनाने पाहण्याची) नवी दृष्टी देते.शिक्षणासाठी वडिलांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले.
या पुस्तकात त्यांनी अंधत्वावर मात करून “आपली दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असावा” हा जीवनमंत्र अंगिकारला. जीवनातील अंधारात प्रकाश शोधला, स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले, आणि आत्मविश्वासाने जगाला सामोरे गेले.या आत्मकथेत त्यांच्या आतल्या भावनिक संघर्षाचे, घराबाहेर राहून शिक्षणाच्या धडपडीचे आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे जिवंत वर्णन केले आहे.वाचकाला ही कथा प्रेरणा, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवते.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक-२२ऑक्टोंबर २०२५
दिवाळी पाडवा

Comments
Post a Comment