क्षेत्र भेट अष्टविनायक रोपवाटीका विडणी




🌱🪴रोपवाटिकेस भेट 
आज आनंददायी शनिवार निमित्ताने जिल्हा परिषद आदर्श शाळा माझेरी पुनर्वसन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत विडणी ता फलटण येथील 'अष्टविनायक' रोपवाटिकेस भेट दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती तसेच रोपे तयार करण्याच्या पद्धती प्रत्यक्ष पाहिल्या.
 शेतकरी आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाने सुधारीत वाणांचा भाजीपाला अथवा फळभाज्यांची लागवड करण्यासाठी रोपवाटिकेतील रोपांची कशी निवड करतात? याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रोपवाटिकेचे मालक श्रीमान सुरेश पवार यांनी निकोप वातावरणात बीजापासून रोप तयार करताना मातीची निवड, खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन तसेच रोपांची निगा कशी राखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे अधिक माहिती घेतली.एका छोट्याशा बीजापासून लागवडीसाठी तयार होणाऱ्या रोपापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला.नुकतेच पेरलेले बीज, अनुकूल तापमानात ठेवलेले, अंकुरलेले, दोन पानांची रोपे तसेच योग्य पाणी व हवेच्या साहाय्याने वाढणारी हिरवीगार रोपे पाहताना विद्यार्थी विशेष उत्सुकतेने मग्न झाले होते.रोपांच्या ट्रे मधील रोपेही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मोजून पाहिली. अनोळखी रोपांची नावे विचारली.तर काहीजण तिथं ठेवलेल्या रोपांच्या पिशवीवरील इंग्रजी स्पेलिंग वाचून ती कोणती रोपे आहेत?हे आपल्या शेजारच्या मित्रांना सांगत होती.
या उपक्रमामुळे शेतकरी भाजीपाला शेती,ऊस लागवड व फळबाग तयार करताना रोपे कोठून व कशी उपलब्ध करतात याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन प्रत्यक्ष निरीक्षणातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
 शेवटी रोपवाटिकाकार श्रीमान पवार यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रोपवाटिकेस दिलेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
 या शैक्षणिक भेटीत इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी, श्री अरुण जाधव सर, श्री संतोष जगताप सर तसेच मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार लटिंगे सर सहभागी झाले होते.
🎋🌴🌱🌴🌳🌱

रोपवाटिकेतील मिरचीचे रोपं म्हणालं 
वांग्याच्या रोपाला ....
आज शाळेतली मुलं 
आपल्या का घराला .....
अरे शनिवारी मुलं 
जातात परिसर भेटीला.....
आज आपल्याकडे आलेत 
फळभाज्यांची रोपे बघायला ....

तुला-मला अन् कोबीला 
परसबागेत लावायला .....
आपलं अंकुरणं कसं 
असतं हे पहायला .......
आपल्या भाऊबंदांना 
जवळून बघायला .......
मळ्यात लावायला
 आईबाबांना सांगायला.......





Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी