पुस्तक परिचय क्रमांक:२५३ कुण्या एकाची धरणगाथा



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५३
पुस्तकाचे नांव-कुण्या एकाची धरणगाथा
लेखक : अभिमन्यू सूर्यवंशी 
प्रकाशन-समकालीन प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१ जानेवारी,२०१२
पृष्ठे संख्या–११८
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१२५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५३||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-कुण्या एकाची धरणगाथा 
लेखक: अभिमन्यू सूर्यवंशी 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
    ध्येयवादी तात्यांनी ज्या चार गोष्टींसाठी लढा दिला, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की,समाजातला एखादा सामान्यातल्या सामान्य माणूस एखाद्या ध्येयाने पेटून उठला तर शस्त्र, सैन्य, सत्ता आणि संपत्ती 
नसतानाही मोठे कार्य करु शकतो.हा विचार अधोरेखित करणारी ही गोपाळ मोरे यांची धरणगाथा आहे.
 एका शेतकऱ्याने आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी धरण कसं मिळवले.त्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी.ज्यांनी उभ्या आयुष्यात गुन्हेगारांची नांवे आणि गुन्ह्याचे स्वरुप सांगण्यासाठीच हाती लेखणी घेतली होती.अशा पोलिस दलातील निवृत्त अधिकारी श्री अभिमन्यू सूर्यवंशी यांनी लिहिलेलं पुस्तक,‘कुण्या एकाची धरणगाथा’जणूकाही One Man Army.
एका वेगळ्या जीवनाचे दर्शन घडविणारे पुस्तक.महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वांने आदिवासी भागातील सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठीआरम नदीवर ‘केळझर’धरणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या धरणांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौंधाणे गावच्या भूमिपुत्राची धरणगाथा. सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करणारे श्री गोपाळ मोरे यांच्या जीवनाची ही संघर्षमय कहाणी.
    श्री गोपाळ मोरे तथा समस्त गावकऱ्यांचे ‘तात्या’ यांनी छेडलेल्या संघर्षाच्या लढ्याचे स्वरूप बहुपेडी आहे. या नायकाने निसर्गाच्या विरुद्ध संघर्ष केला आहे.समाजातल्या घातक चालीरीती आणि विकृती याविरुद्ध लढा दिला आहे. जन्मापासून मरणापर्यंत मानगुटीवर बसलेल्या आदिवासींच्या दारिद्र्याविरुध्द लढा दिलेला आहे.केळझर धरण व्हावे म्हणून दस्तुरखुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेऊन धरण होण्याची कैफियत फक्त इयत्ता चौथी शिकलेल्या तात्यांनी पटवून दिली होती.आणि दिल्लीवरून परत गावी आल्यावर धरणाच्या कामाला गती मिळाली.गेली वीस वर्षे उभारलेल्या लढ्याला यश आले पाहून तात्या आनंदित झाले.सामान्य माणसांच्या अंतःकरणातील सत्यशक्ती हीच चित्शक्ती बनते.याच शक्तीतून भवताल उजेडाने न्हाऊन निघते.
या पुस्तकाला प्रस्तावना द.ता.भोसले पंढरपूर यांची धरणगाथा अधोरेखित करणारी आहे.अतिशय समर्पक शब्दात आणि वास्तवाचे भान ठेवून लेखन केले आहे.तर लेखक अभिमन्यू सूर्यवंशी यांनी 
एका वृद्ध ग्रामस्थांने धरणाची अभेद्य भिंत उभारायला गल्ली ते दिल्ली वाऱ्या केलेल्या श्री गोपाळ मोरे यांची चारसहा वाक्यात माहिती दिली.एक शेतकरी माणूस न थकता अठरा वर्षे एकाकी झुंज देत पशुपक्षी व शेती शेतकरी यांच्यामागे ‘काळ’होवून लागलेला दुष्काळ कायमचा नष्ट करण्यासाठी एका धरणापायी जीवाची बाजी लावतो,ही गोष्ट खाकी वर्दीतील लेखकाच्या जीवाला झोंबली अन् व्याकुळ करून गेली.आणि दाटून आलेलेआभाळ कागदावर सांडत गेले.आणि मग
‘कुण्या एकाची धरणगाथा'या पुस्तकाची निर्मिती झाली.ओल्या मातीवर पडलेले बी चैतन्याच्या हिरव्या रुपात तरतरुन येते , त्याप्रमाणे श्री गोपाळ मोरे यांची हृदय स्पर्शी धरणगाथा साकारली आहे.
  आपला दुष्काळी भाग पाण्याने भिजून सुजलाम सुफलाम व्हावा, शेतकरी सधन व्हायला हवा या एकाच स्वप्नपूर्तीसाठी मामलेदारापासून ते पंतप्रधानापर्यंत अहिंसक मार्गाने सगळ्यांचा पिच्छा पुरवणाऱ्या एका शेतकऱ्याची खरीखुरी कथा! इतिहासातील अनेक तुटक धागेदोरे जुळवत तब्बल ही चित्तरकथा पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली. अचाट, अविश्वसनीय तरीही साध्यासुध्या माणसांच्या जगण्याला बळ देणारी धरणगाथा!
 मनोवेधक ‘गोपाळसागर’केळझर धरणाचे मुखपृष्ठ तर मलपृष्ठावर धरणगाथेचे बीज समर्पक शब्दात उलगडणारा ब्लर्ब. या धरणगाथेचे लेखक अभिमन्यू सूर्यवंशी मनोगतात व्यक्त होताना म्हणतात की,
“देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याचा अहिंसक मार्ग जनतेला स्विकारायला लावला.त्याच पाऊलवाटेने श्री गोपाळ मोरे यांनी आपल्या देशातील सामान्य माणसाची न्याय्य मागणी मंजूर होण्यासाठी आणि ती शासकीय यंत्रणेकडून पूर्ण करून घेण्यासाठी अहिंसक मार्गाची निवड करुन एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.तो म्हणजे गोपाळ मोरे यांचा ‘गोपाळ मार्ग’आपलं आयुष्य पणाला लावून पुढील पिढ्यांसाठी हा वारसा तयार केला आहे.
त्याने सर्वांवर उपकार करून ठेवले आहेत.”असे लेखकांना वाटते. ही धरणगाथा साकारताना त्यांनी अनेक पुस्तकांची मदत घेतली.तसेच ही अनेक व्यक्तींशी संपर्क साधून त्यांनी तात्यांची माहिती संकलित केली आहे.यामधून ग्रामीण जीवनोन्नतीचे सशक्त आणि भेदक दर्शन घडविणारी एक पिढी.या तरुण पिढीने भूमीशी घट्टपणे जोडलेली आपली नाळ जाणीवपूर्वक सांभाळली आहे.
 प्रारंभी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि महात्मा गांधींच्या विचारधारेला प्रमाण मानून समाजकार्य करणाऱ्या या भूमिपुत्राने त्याच्या पुढील आयुष्यातही गांधींचे विचार कृतीत आणून धरणाचे स्वप्न यशस्वी करून दाखविले.आपल्या ध्येयाचे विस्मरण होऊ नये यासाठी प्रतिज्ञा करणे आणि ती निष्ठेने पाळणे ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.कारण त्यांनीमरणासन्न आईला धरण बांधण्याचे वचन दिले होते.आणि जोपर्यंत केळझर धरण होत नाही,तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती.खरतर विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे दु:ख,होरपळ अन् फरफट विश्वास पाटील यांचे ‘झाडाझडती’,‘मंगेश खारटे लिखित ‘कहाणी पानशेत पुरग्रस्तांची’, दत्तप्रसाद दाभोळकर लिखित ‘नर्मदा मैया’,तर कृष्णात खोत यांची ‘रिंगाण’आदी पुस्तकात रेखाटली आहे.मात्र धरण व्हावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा विषय ‘कुण्या एकाची धरणगाथा'यात प्रथमतः पुस्तक रूपाने आला आहे.पाणी म्हणजे जीवन याचसाठी आपल्या भागात धरण व्हावे म्हणून भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या श्री गोपाळ मोरे यांना शतशः प्रणाम आणि ही झुंजार कहाणी आत्मचरित्रात्मक कादंबरीतून मांडणाऱ्या लेखक अभिमन्यू सूर्यवंशी यांना मनापासून धन्यवाद!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- -१७ ऑक्टोंबर २०२५


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी