पुस्तक परिचय क्रमांक:२५५ मेवाड नरेश महाराणा प्रताप
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५५
पुस्तकाचे नांव-मेवाड नरेश महाराणा प्रताप
लेखक: विनोद श्रा.पंचभाई
प्रकाशन-चपराक प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २१फेब्रुवारी,२०२०
पृष्ठे संख्या–११२
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५५||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-मेवाड नरेश महाराणा प्रताप
लेखक:विनोद श्रा.पंचभाई
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
भारतभूमीला अनेक शूरवीरांची आणि असामान्य योध्द्यांची परंपरा लाभली आहे.ज्यांच्या पराक्रमाच्या किर्तीचा सुगंध अजूनही भारतवर्षात दरवळत असतो आणि अनेकांना प्रेरणेचा दीप बनत जगण्याची उमेद देतो त्या मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या चरित्र आणि चारित्र्याची झलक या ग्रंथातून अनुभवता येते.तो ग्रंथ ‘मेवाड नरेश महाराणा प्रताप’विनोद श्रा.पंचभाई यांनी अतिशय समर्पक शब्दात आणि रसाळ भाषेत लिहिला आहे.
सोळाव्या शतकात होऊन गेलेले मेवाड नरेश महाराणा प्रताप हे अद्वितीय योध्दे होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि तुलनेने कमी असलेल्या सैन्यबळासह त्यांनी मेवाड प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती दिली होती.त्यांच्या अविश्वसनीय पराक्रमाची अन् दुर्दम्य साहसाची यशोगाथा विनोद श्रा.पंचभाई यांनी ‘मेवाड नरेश महाराणा प्रताप’या कादंबरीत शब्दबध्द केली आहे.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. अश्याच संवादाचा पूल निर्माण करून आजच्या अस्थिरतेच्या,कट्टरवादाच्या काळात महाराणा प्रताप यांच्या देदीप्यमान आयुष्याचा ओझरता परिचय ‘मेवाड नरेश महाराणा प्रताप’या पुस्तकातून अधोरेखित केला आहे.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच मेवाड नरेश महाराणा प्रताप यांचाही शौर्याचा इतिहास झंझावातासारखा आजच्या तरुण पिढीला समजला पाहिजे यासाठी या सारांशाने कादंबरीचे लेखन केले आहे.
या ऐतिहासिक कादंबरी स्वरुपातील ग्रंथाला लेखक, प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे.वर्तमानात चांगलं काम करुन भविष्याचा अचूक वेध घ्यायचा असेल तर इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करून आणि प्रेरणा घेतल्यास शौर्य आणि पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होत नाही.हे समजते.
अकबर बादशहाला तब्बल पंचवीस वर्षे झुलवत ठेवणाऱ्या या महानायकाने जे अतुलनीय साहस दाखवलं तो मेवाड प्रांतातील राजपूत घराण्याच्या संस्कृतीचा स्वाभिमानी वारसा आणि त्याग आहे. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या पिढीला आपल्या अलौकिक परंपरेच्या वारशाचे दर्शन घडविणारे चित्रण कादंबरीकार पंचभाई यांनी प्रभावीपणे केलंय.महाराणा प्रताप यांचे संघर्षमय जीवन अनुभवायचे असेल,त्याग-समर्पण आणि व्यापक उदात्त जीवनमूल्यांचा परिचय करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक लाख मोलाचा संदेश देणारे आहे.
मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची ऐतिहासिक घटना ‘हळदीघाटचे’ युद्ध होय.ही लढाई कोणी जिंकली यापेक्षा क्रुरकर्मा सम्राट अकबराच्या विरोधात धीरोदात्तपणे कोण उभं राहिलं?याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.मेवाडसारख्या एका छोट्या प्रांतातील एका धैर्यवान राजाने ही किमया साधली. ती ही सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगून.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वाभिमानाने प्रांताचे रक्षण करणारा राजा.आकर्षक मुखपृष्ठ आणि कादंबरीचा आशय उठावदार करणारा मलपृष्ठावरील ब्लर्ब ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण करतो.
या कादंबरीचे लेखन एकोणवीस भागात केलेलं आहे.चितोडची लढाई,महाराणा निवडीचा पेच, राज्याभिषेक,आदिवासी भिल्लांचे सहकार्य, मीनाबाजार,उदयपूरचा राजदरबार,कुंभलगड,अकबराचा आग्रा दरबार,महाराणांचे झोपडीतील वास्तव्य, मानसिंगाची शिष्टाई,अरवली पर्वत परिसर,हळदीघाटचा रणसंग्राम,चेतकचे संस्मरणीय बलिदान,हळदीघाटच्या युद्धानंतरची परिस्थिती,दिवेर विजय, दलबीरचा रणसंग्राम आणि अकबराची युद्धबंदीची घोषणा आणि अंतिम पर्व असा धावता आढावा या कादंबरीत घेतला आहे.
एकदा का ही कादंबरी वाचकाच्या हातात पडली की वाचनात गर्क होतील अशी लेखनशैली आहे.मी तर एका बैठकीतच या ग्रंथातील शौर्यशाली आणि स्वाभिमानी गाथेचा आस्वाद घेतला.काहीतरी सकस आणि दर्जेदार साहित्य वाचायला मिळाले अन् देशप्रेमाचे,जिद्दीचे स्वराज्याचे शौर्याचे आणि धिरोधात्तपणाचे झरे ही कादंबरी वाचल्यावर पाझरु लागतात.पाझरणं, झिरपणं,आणि हृदयाच्या गाभाऱ्यात मुरणं यासाठी असं साहित्य दीपस्तंभसारखे यशाचा मार्ग दाखवते.
“मी, आई भवानी व भगवान एकलिंगजी यांना शपथ वाहून प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत मातृभूमिचा एकूण एक प्रदेश शत्रुच्या तावडीतून मुक्त करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही! निवांतपणे आराम करणार नाही.आपल्या मेवाड राज्याच्या पावन भूमीवर स्वातंत्र्यासाठी आड येणारा एकही शत्रू जिवंत आहे तोपर्यंत मी झोपडीत राहीन. जमिनीवर झोपेत.सोन्या-चांदीच्या भांड्यात न जेवता पत्रावळीवरच जेवणार. गोडधोड सुग्रास भोजन न करता साधेसुधे अन्न ग्रहण करणार!तसंच कोणत्याही भोगविलासाच्या अन् राजसी सुखांच्या आहारी न जाता सर्वसाधारण जीवन जगणार!”अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे अतुलनीय योध्दे, महापराक्रमी आणि स्वाभिमानी राजे महाराणा प्रताप यांच्या शौर्याची ही कादंबरी.समर्पक शब्दात प्रस्तुत केली आहे.राज्याच्या रक्षणासाठी आयुष्याच्या समिधा करून गनिमीकाव्याने अकबराच्या बलाढ्य फौजेला नेस्तनाबूत करणाऱ्या बलशाली महानायक मेवाड नरेश महाराणा प्रताप यांचा धगधगता इतिहास जागृत करणारे हे पुस्तक.
अकबराच्या साम्राज्यविस्ताराच्या काळात त्यांनी आपले स्वातंत्र्य कधीच गमावले नाही. अकबराने अनेक वेळा मैत्री व संधिचे प्रस्ताव दिले, परंतु महाराणांनी स्वाभिमानाला कदापीही झुकवले नाही.या पुस्तकात हल्दीघाटीच्या युद्धाचे वर्णन उत्कंठावर्धक पद्धतीने केले आहे. महाराणा प्रताप यांनी शौर्याने मोठ्या मुघल सेनेला तोंड दिले. त्यांच्या घोड्याचे, चेतकाचे वर्णनही भावनिक आणि प्रेरणादायी आहे. युद्धानंतरच्या कठीण परिस्थितीतही महाराणांनी अरवली पर्वतरांगांत राहून जनतेच्या हितासाठी संघर्ष सुरूच ठेवला.
लेखक विनोद श्रा पंचभाई यांनी दाखवले आहे की, महाराणा प्रताप यांचे जीवन म्हणजे त्याग,धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक.त्यांनी आपल्या जनतेसाठी सुखसोयींचा त्याग करून, अखेरपर्यंत मेवाडचे स्वातंत्र्य टिकवून ठेवले.
लेखक विनोद श्रा.पंचभाई यांच्या लेखणीला त्रिवार मानाचा मुजरा!!! ज्यांच्या लेखणीतून स्फुर्तिदायक आणि प्रेरणादायी कादंबरीची निर्मिती झाली.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २३ ऑक्टोंबर २०२५

Comments
Post a Comment