पुस्तक परिचय क्रमांक:२४८ काळी आई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४८
पुस्तकाचे नांव-काळी आई
लेखक : व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण,मार्च २०१७
पृष्ठे संख्या–१२८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४८||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-काळी आई
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
सहवासातली,भेटलेली अन् पाहिलेली माणसं चितारणारे तात्यासाहेब…
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षरग्रंथ निर्माण झाले.त्यातील अनेक कथांमध्ये ‘'माणदेशी माणसांचा' समावेश केलेला आहे.या व्यक्तिचित्रांत जुन्या कथेतील गोष्टी तर आहेच,पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे.
त्याकाळातील माणसांच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक स्थित्यंतरे लक्षात येतात.माणसांच्या स्वभाव वैशिष्टयांचे पैलू उलगडून दाखविण्याची किमया व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या लेखणीतून आणि कुंचल्यातून साकारलेली आहे.जसे की अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फुलं व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही अस्सल चित्रे मराठीच आहेत.माणदेशीच्या सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर या कथांतून सांगतात.तितक्याच दमदार लेखनशैलीने वाचन रसिकांना गारुडी करणारा कथासंग्रह ‘काळी आई.’मातृत्व आणि दातृत्व शिकविणारा हा कथासंग्रह.
यातील सर्व कथा भावस्पर्शी तर आहेतच.पण प्रेम माया आणि वात्सल्य यांनी ओथंबून भरलेल्या.गावच्या मातीची ऋणानुबंध जपणाऱ्या माणसांच्या अंतरंगातील भाव टिपकागदासारखे टीपून उठावदार केलेल्या या सगळ्या गोष्टी.
‘काळी आई’या पुस्तकात एकंदर चौदा कथांचा समावेश असून या कथांचे नायक अतिशय समर्पक शब्दात रेखाटले आहेत.सर्व्हिस मोटार,या दत्तारामचे झाले काय?काळी आई,लेले मास्तर,गुणा आई,नामा सुढाळाचे सुख-दु:ख,धार,बळीची गोष्ट, अनुभव,खेळ, दरवेशी, माझं गुणी जनावर, गोकुळा आणि कमळी या कथा.नावावरुच या कथांचे नायक नायिका आपल्या ध्यानात येतात.यातील काही कथा मनचंचला स्त्रियांच्या आहेत.
‘सर्व्हिस मोटार’ या कथेत इजा कुंभाराचा प्रपंच मांडत मांडत त्याच्या घराशेजारी वडाप मोटार अड्डा होतो.मग त्याचा मुलगा ड्रायव्हरच्या सांगण्यावरून हाॅटेल सुरू करतो.व्यवसायात पडल्यावर पतीच्या मदतीला घरच्या कारभारनीला हॉटेलमध्ये काम करावं लागतं.मग हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांशी तिचं बोलणं ओघानं आलंच.त्यामुळे इजाची सासऱ्याची चलबिचल व्हायची.नको ते इतरांच्याकडून खबरी कळायच्या.त्या इजाने सूनवर छचोरगिरी करणाऱ्या सख्या ड्रायव्हरला कसं बडवलं आणि त्याच्या मोटारीला तडाखे देऊन खिळखिळे केले.ती सर्व्हिस मोटारीची गोष्ट…
अतिशय शांत आणि संयमी असणारा मुलगा.शाळेत कितीही मुलांनी चिडविले तरी न रडणारा दत्ताराम.या मुलाच्या या स्वभावामुळे आई रमाबाईला चिड यायची. त्याचा बाप तर मुखदुर्बल आणि नेभळट. त्याला कसलीही हौसमौज नाही.कालौघात दत्तारामच्या काही बदल जाणवला नाही पण बाहेर मोडनिंबला शाळेत घातले.अन् बेचाळीस सालच्या काळात सनसनाटी बातम्या येऊ लागल्या.कुठे शाळा जाळली.गोळीबार झाला.पेटवापेटवी झाली.हरताळ सभा मिरवणुका धडाक्याने निघू लागल्या.शाळा कॉलेज बंद झाल्याने मुलं गावाकडे परतू लागली.आणि एक दिवस शाळेच्याच मुलांनी मोडनिंबचे हायस्कूल जाळले.मुलांची धरपकड झाली.आज उद्या दत्ताराम येईल या आशेवर माई जगत होती.पण कालांतराने तो आला नाही म्हणून तिने कचेऱ्या,तुरुंग धुंडाळले पण तो काय सापडला नाही.त्या दत्तारामची कथा-या दत्तारामचे काय झाले?
म्हाताऱ्या अप्पांनी साठी ओलांडली तरी काळ्या आईची सेवा करण्यात धन्यता मानली.तरणाताठी दोन पोरं व घरगाडा रेटणारी बायको साथीच्या आजाराने भरल्या ताटावरुन उठून गेली होती.आता कुणासाठी करायचं तर काळ्या आईची सेवा करायची.अहोरात्र मातीत खळायचं. जित्राबं सांभाळायची.अन् होईल तवर कष्ट करायचे.पण पूर्वी सारखं कष्ट करता येईना म्हणून सुदामा दाजीला जमीन विकायची ठरवलं.आणि मग शेतात जाऊन शेवटचे दर्शन घेऊन आले.अन् घरात झोपी गेले. सकाळी सकाळी दाजीबा येऊन हाका मारु लागला.बऱ्याच वेळाने अप्पा उठले आणि म्हणाले, “माझी जमीन विकायची नाही.तू चालता हो सुदामा!”. आपल्या जमीनीवर मातेसमान प्रेम करणाऱ्या अप्पाची गोष्ट, ‘काळी आई’.
गावच्या शाळेत करमेना म्हणून शाळेला रामराम करणाऱ्या लेखकांना लेले मास्तर भेटतात आणि पुनश्च त्यांची शिक्षणाची वारी त्यांच्या घरी राहून सुरु होते.त्या लेले मास्तरांची कहाणी.शाळेतल्या मुलीवर फिदा होणाऱ्या लेले मातरांची कहाणी. मुलगीही घरात राहणाऱ्या मुलांबरोबर पळून जाते.त्यामुळे मास्तरांची बायको त्यांना यथेच्छ सुनावते.गावकरी मास्तरांच्या लफड्यामुळे तक्रारी अर्ज दाखल करतात.त्यांची बदली दुसऱ्या गावी होते.आणि लेखकाला आयुष्याच्या जमाखर्च लिहिलेल्या वह्या देऊन लेले मास्तर गाव सोडून जातात.
गुणा,बाई असून शेतीकामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी. गावच्या भीमा पैलवानाने तारुण्यात तिच्याकडे बघत शड्डू ठोकला.दंड थोपडले. ईष्काशी इंगळी फुलवली म्हणून लग्नानंतर नवऱ्याला पैलवान बनवून त्या भीमा पैलवानाला चितपट करायचं.एवढं एकच मागणं मागितलं.आणि मग ती नवऱ्याच्या पहिलवानकीसाठी राबू लागली.पण रात्रीची नवऱ्यापासून एकटीचअलिप्त राहत होती.तीन वर्षांनंतर दोन्ही पैलवानांच्यात कुस्ती लागते.त्यात माझा बा जिंकतो.पुढे गुणा आई स्वतः मुलबाळ होत नाही म्हणून नवऱ्याचे दुसरं लगीन लावून देते.आणि शेताच्या झोपडीत अन्नत्याग करून मृत्यूला सामोरी जाते.ती कथा ‘गुणा आई’.
कालवड फळल्यावर आपण काय करणार याचं मनात इमले बांधणारा नामा सुढाळ.तिचं नवव्या महिन्यापर्यंत खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित करण्यासाठी तो जीवाचं रान करत असतो. तसेच लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी मुलंबाळं झाली नव्हती म्हणून बायको सारखी झुरत असायची.कालांतराने कपाशीच्या बोंडासारखी कालवड गर्भाने फुलू लागली.आणि त्याची बायको देवाच्या दारी धरणे धरु लागली.अचानक एके दिवशी त्याच्या बायकोला कोरडे उमासे होऊ लागले.नामाला कळल्यावर त्याचा आनंद द्विगुणित झाला.काही दिवसांनी कालवडीच्या अंगावरून गाभणपणाच्या खूणा नाहीशा होऊ लागल्या.यामुळे त्याची नाराजी वाढू लागली.लोकं नको ते बोलून दाखवू लागली.त्याची कथा म्हणजे ‘नामा सुढाळाचे सुख-दु:ख’.
श्री.व सौ.भिडे यांच्या नवजीवनाची कहाणी आणि चाकूसुऱ्यांना धार लावणारा हुसेन उन्हाच्या वेळी गारव्यासाठी घराकडे येतो. तहानलेला जीव पिण्यासाठी पाणी मागतो.अन् धार लावायची आहे का? यातून सुरू झालेल्या गप्पांची कथा म्हणजे ‘धार’.
थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवून शेकत असताना बळीरामाने सांगितलेल्या गोष्टी.नटरंगी बाया नवऱ्याच्या उपरोक्ष इश्काचे रंग कसे उडवतात.त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये.याचे स्वानुभवातून अनुभवलेली गोष्ट.तर दुसरी कुतूहल वाढवणारी नखरेल बाईची कहाणी ‘बळीची गोष्ट’अतिशय उत्कंठावर्धक आहे.
लेखक पुस्तके वाचण्यासाठी जगू कोष्टीच्या पडक्या घरात जायचे.तिथंच काहीवेळा मुक्काम करायचे.एका रात्री जगू दोस्तांच्या बरोबर शिकारीला जातो.
अन् रात्रीचं कडी काढून कुणीतरी आत आल्याचं कळल्यावर,उठून दिवा लावतात तर त्यांना पुतळा दिसते.तिला वाटतं जगू एकटाच असेल म्हणून ती आलेली.तिचं आणि जगुचं लफडं असतं.
मग असं करु नये म्हणून ते तिला रात्रभर हितोपदेश करतात.ती त्याचा हात हातात घेऊन भावना चाळवते.पण तो थंडच असतो.त्याचं शरीर पाघळत नाही.ती कथा ‘अनुभव’.
कोसळणाऱ्या पाऊस दमगीर झाल्यावर रानात फिरायला गेल्यावर ल्हावे पक्षी काय काय करतात याचं सुंदर वर्णन ‘खेळ’या कथेत केलेलं आहे.त्याच ल्हाव्यांची शिकार तीन पोरं कमी करतात.याचा हुबेहूब प्रसंग लेखणीतून साकारलेला आहे. कमळी, दरवेशी आणि गोकुळा याही कधा सुरेख आहेत.
अतिशय समर्पक शब्दात या कथातील माणसांची ओळख ओघवत्या शैलीत करून दिली आहे.साहित्यिक आप्पासाहेब तथा व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनीस सलाम….
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १५सप्टेंबर २०२५

Comments
Post a Comment