पुस्तक परिचय क्रमांक:२४७ माणसं



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४७
पुस्तकाचे नांव-माणसं
लेखक: व.पु.काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण एपू,२०१७
पृष्ठे संख्या–२१८
वाड़्मय प्रकार-व्यक्तिचित्र
किंमत /स्वागत मूल्य-१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४७||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-माणसं
लेखक:व.पु.काळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
माझ्या मनाचे आकाश लौकिकापल्याडच्या प्रसिध्दीपराडमुख असणाऱ्या महान माणसांच्या चांदण्यांनी,ग्रहताऱ्यांनी प्रकाशित झाले आहे.अशा माणसांपर्यंत सहवासाचे सदभाग्य मला लाभलं.
--व.पु.काळे 
माणसा माणसा,कधी व्हशीन माणूस
लोभासाठी झाला,मानसाचा कानूस..
–बहिणाबाई चौधरी 
पुस्तकांपेक्षा माणसं वाचली तर ज्ञान होतं. पुस्तकं माहिती पुरवतात.चालतीबोलती माणसं माहितीपल्याड खूप काही देतात, त्यासाठी भेटलेली माणसे वाचण्याचा छंद लावायला हवा.जीवनावर प्रेम करा.कारण मला भेटलेली हरेक माणसे चैतन्याचीच विविध रुपं होती. त्यांनीच मला कथेला विषय दिला अन् लिहिण्याला आत्मबळ दिलं.‘माणसं’ही लोकप्रिय कथाकथनकार
तथा लेखक व.पु.काळे यांची एक सर्वोत्तम साहित्यकृती. 
 भेटलेल्या माणसांचे अंतरंग उलगडून दाखविणारे पुस्तक.त्यांच्या स्वभाव गुणांचे कौतुके वर्णन करणारे लेख लाजवाब आहेत.म्हणूनच म्हणतात की,मनाचे रंग उलगडून दाखविणारे व.पु.काळे.त्यामुळेच रसिक वाचकांनी त्यांना ‘पार्टनर’ही बिरुदावली बहाल केली आहे.प्रत्येक कथेतून कथेच्या नायकाची स्वभावगुण वैशिष्ट्यांची ओळख घटना -प्रसंगातून चपखलपणे शब्दांची सरबराई करत केली आहे.त्यांचे लेख कुतूहल वाढवत राहतात.अश्या रमणीय कथा आणि त्यातील व्यक्तिमत्वे.
पत्त्यांच्या कॅटमधील बावन्नपानासारखी शीर्षक नसलेली शब्दचित्रे;पण विचारांचे सौंदर्य या व्यक्तिमत्वातून दर्शविणारे लेखन कथाकार व.पु.काळे यांनी केले आहे.
  ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांचे निरुपण करणारे किर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांच्या किर्तनातील ‘सवत’कथेचा किस्सा नक्कीच वाचनीय आहे.आपण एखाद्याकडून शब्द घेतला.तर नक्कीच त्याच्या विरुद्ध वागतो.हे पटवून देणारा विचार. खरोखरीच चिंतन करायला लावतो.
    ॲक्शनची रिॲक्शन पशुत्वाकडून माणुसकीच्या दिशेने होते, त्यालाच मी कृती म्हणतो.हे सिध्द करणारे आदरणीय दादा कुलकर्णी.माणसाचे आचरण हेच विद्यापीठ.आपल्या आचरणातून इतरांना प्रेरणा  देणारे समाजसुधारक. व.पु.काळे यांना कथा ऐकविणारे प्रसन्नकुमार.आनंदात जीवन जगणारे जिंदादील गजाभाऊ.चांगुलपणा पेरणारे वर्टी,आपलं दुःख विसरून दुसऱ्याचे सांत्वन करणारे व्ही.डी.देसाई अशी एकसोएक माणसं व.पु.काळे यांनी शब्दातून गुंफली आहेत.त्याजे रसग्रहण करताना अंतरंगाची ओळख होते.
  ‘शब्द हे शस्त्र आहे,जपून वापरा.’असं पुण्यातल्या रिक्षांच्या मागे हे वाक्य वाचायला मिळते.या वाक्याचा उलगडा अतिशय समर्पक शब्दात केला आहे. प्रिय शब्दाचा अर्थ ओळखीची आणि अनोळखी माणसं कसा लावतात याचं मार्मिक उदाहरण दिले आहे.
  मदतीसाठी धावपळ करणारे पांडुरंग गाडगीळ.मुलाच्या मित्र हेमंत,त्याने उनाडक्या करणाऱ्या रिकामटेकड्या माणसांची सांगितलेली कथा.विचार करायला लावते.व्यसनात गुरफटलेला माणूस तलफ झाली की कसा अस्वस्थ होतो.अशी त्यांच्याजवळ आलेल्या , भेटलेल्या, संपर्कातील अनेक माणसांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.
फारच अप्रतिम हा पॅटर्न आहे. ‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे वपु यांची ‘माणसं’हे पुस्तक आहे. लेखकाचा हा लेखनसंग्रह त्याच्या विचारविश्वाची झलक देते.या रचना केवळ साहित्य नाही, तर समाजाचातील चालतेबोलते आरसे आहेत. या साहित्यसंचातून माणसाच्या स्वभावाचे वैशिष्ट्यपुर्ण पैलू  प्रतिबिंबित होतात.ही व्यक्तीचित्रे शब्दबध्द करताना त्यांच्या निरीक्षणशक्तीला आणि लेखणीला त्रिवार सलाम! अफलातून आणि बहारदार 
शब्दांची रंगावलीतून माणसांची ओळख करून दिली आहे.ती सगळी वपु यांची माणसं.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- ११ सप्टेंबर २०२५


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी