पुस्तक परिचय क्रमांक:२५१ कृष्णाकांठ
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२५१
पुस्तकाचे नांव-कृष्णाकांठ खंड-१
लेखक : यशवंतराव चव्हाण
प्रकाशन-रोहन प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, जानेवारी,२०२०
पृष्ठे संख्या–३१६
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२५१||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-कृष्णाकांठ
लेखक: यशवंतराव चव्हाण
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
महाराष्ट्राचे थोर भाग्यविधाते आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी जीवनपट संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरील कराड गावातून आपल्या आयुष्याकडे बघत ‘कृष्णाकांठ’हे आत्मचरित्र लिहिले आहे.ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांच्या समस्या,स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक बदल तसेच स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या घडणीचा आलेख उठावदारपणे मांडला आहे.सन १९१२ ते १९४२ या काळातील जीवनाची ओळख करून देणारी मौलिक जीवनगाथा म्हणजे ‘कृष्णाकांठ’एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विधिमंडळातील सचिवापर्यंतच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक जीवनातील आठवणींचा मागोवा आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग यांचा आलेख प्रस्तुत केला आहे.
हे आत्मचरित्र केवळ राजकीय नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीनेही महत्त्वाचं मानलं जातं. बालपण, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द, कॉंग्रेसचे संघटन, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महान व थोर नेत्यांचा कारावासातील सहवास आणि त्यावरील वैचारिक मंथन अशा अनेक घटनांची दखल घेत.आयुष्यातील विविध घटनांचा ऊहापोह करणारे आत्मचरित्र‘कृष्णाकांठ’.
अतिशय प्रवाही भाषेत आयुष्यातील चढउतार त्यांनी निरपेक्षपणे यात नमूद केले आहेत.
अहमदनगर येथील १९८४ सालच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते म्हणतात की, “आलं तर आलं तुफान..तुफानाला घाबरून काय करायचं.तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे.तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही.तुफानाला तोंड देण्याची जी शक्ती आणि युक्ती आहे.त्यातून तो काहीतरी करु शकतो आणि घडवू शकतो,”अशी माझी धारणा आहे.
—यशवंतराव चव्हाण
अनेक साहित्यिकांनी आणि नेते मंडळींनी या पुस्तकाची वाहवा केली आहे. राजकीय धुरंधर असणारे यशवंतराव साहित्याच्या क्षेत्रातही नाममुद्रा उठावदार करणारे शारदेचे पुजारी आहेत हे त्यांच्या आत्मचरित्रातील लिखाणावरून लक्षात येते.यशवंतराव चव्हाण साहेब साहित्य रसिक होते.त्यांची वाणी शांत आणि धीरगंभीर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी तशीच लेखणी.कृष्णेच्या पाण्यासारखी संथ आणि आपलेपणाची वाटणारी.आशय विषयाची मांडणी समर्पक आणि यथार्थ शब्दात करणारी लेखणी..
मुखपृष्ठावर यशवंतराव चव्हाण साहेबांची मुद्रा आपले लक्ष वेधून घेते.तर मलपृष्ठावर असणारा ‘ब्लर्ब’ त्यावेळच्या निवडणूका आणि सद्यस्थितीतील निवडणुका कश्या पद्धतीने होतात.याचे प्रकटीकरण विश्लेषणात्मक पध्दतीने उठावदार केलेले आहे.हे आत्मचरित्र आदरणीय साहेबांनी तीन प्रकरणात समाविष्ट केले आहे.पहिले जडणघडण,दुसरे वैचारिक आंदोलन, आणि तिसरे निवड आणि शेवटी व्यक्ती, स्थळ, प्रसंग आणि विषयाची सूची दिलेली आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकांठ’हे आत्मचरित्र मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा ठेवा आहे.
सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून कार्यकर्ता म्हणून आपली राजकीय कारकीर्दीचा सुरुवात करुन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंगलकलश आणण्याचा मान मिळवणारे आणि भारताचे उपपंतप्रधानपदी विराजमान झालेले यशवंतराव चव्हाण साहेब.त्यांच्या आत्मचरित्रातून महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास समजतो.जो ग्रामीण भागातील तरुणांना सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी प्रेरणा आणि स्फुर्ती देणारा आहे.
मलपृष्ठावरील ब्लर्ब वरील परिच्छेद आत्मचरित्रातील आशय अधोरेखित करतो.ते म्हणतात की,“गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून,दहा निवडणुका मी लढवल्या.कधी चुरशीच्या,कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी,तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकलेल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या.पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली,तर माझ्या सर्व निवडणुका मोठया वादळी होत्या.प्रतिपक्षांनी त्यावेळी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकांत माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषण शैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले;आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची!”
जीवनाला अमृत देणाऱ्या कृष्णामाईचे गुणगान करत तिच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक विस्ताराची माहिती देत, उगमस्थान क्षेत्र महाबळेश्वर ते सागराचे मुखक्षेत्र राजमहेंद्रीपर्यंतचा तिच्या प्रवाहाची ओळख होते.त्याची अलौकिक महती सहज सुंदर शब्दात त्यांनी प्रारंभी लिहिली आहे.काठावरील महत्वाची गावे आणि खेडी सुजलाम सुफलाम झालेले तिचे कृष्णा खोरे. ‘कृष्णाकांठ’आत्मचरित्रात जन्मभूमी देवराष्ट्रे,कार्य भूमी कराड, शिक्षणासाठी कोल्हापूर आणि पुणे येथील वास्तव्यातील प्रसंग तसेच सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोबतच्या चर्चा,बैठका आणि सभा, भोगलेले तुरुंगवास,आलेलं अनुभव राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी, आंदोलने, सत्याग्रह कॉंग्रेसचे संघटन व सातारा जिल्ह्यातील लढविलेल्या निवडणूका यांचा गौरवशाली इतिहास त्यांनी शब्दात व्यक्त केला आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २ ऑक्टोबर २०२५

Comments
Post a Comment