पुस्तक परिचय क्रमांक:२३५ चिकन सूप फॉर टीन एज सोल
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३५
पुस्तकाचे नांव-चिकन सूप फॉर द टीनएज सोल
संपादन व संकलक- ‘जॅक कॅनफिल्ड’,’मार्क व्हिक्टर हॅन्सन’ आणि ‘किम्बर्ली किर्बर्जर’
अनुवादक-सुप्रिया वकील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जुलै ,२०१६
पृष्ठे संख्या–२१८
वाड़्मय प्रकार- अनुवादित कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१९५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३५||पुस्तक परिचय
चिकन सूप फॉर द टीनएज सोल
संपादन व संकलक- ‘जॅक कॅनफिल्ड’,’मार्क व्हिक्टर हॅन्सन’ आणि ‘किम्बर्ली किर्बर्जर’
अनुवादक-सुप्रिया वकील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जीवन,प्रेम आणि शिकणं या विषयीच्या अनुभवाधिष्ठीत किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा उलगडा करणाऱ्या गोष्टी कथा कहाणी.
किशोरवयीन वाचकांना भावनिक आधार देणारे. खऱ्या आयुष्यातल्या संघर्षांची आणि यशाची उदाहरणे.सकारात्मक विचारांना चालना देणारे. आत्मविश्वास वाढवणारे एक गोष्टींवर विश्व..
हे पुस्तक म्हणजे रसग्रहण करताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारं आणि डोळ्यात अश्रू आणायला लावणारं आहे. गरज भासेल तेंव्हा जिवलग मित्रमैत्रिणीं सारखं, तुमचा सखा बनून सदैव सोबतीला राहील.अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘यु कॅन डू इट’,असा विश्वास किशोरवयीन
मुलामुलींना करून देणारे आहे.जगभरात लोकप्रिय असलेल्या या पुस्तकाचे मराठीत अनुवादन सुप्रिया वकील यांनी सहज सुंदर सोप्या भाषेत केले आहे.
रसिक वाचक हो,आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणीवा उमलत असतात; डोळ्यात नवी स्वप्न हसत असतात. त्याचवेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशावेळी मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या, आधाराचा खंबीर हात देणाऱ्या, उमेद चेतवणाऱ्या आणि दुखावलेल्या मनावर हळू फुंकर घालणाऱ्या. पाय रोवून ठाम उभे राहायला शिकवणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. मनाशी अगदी हळुवार संवाद साधत निखळ मैत्रीची अनुभूती देतात तर गालावर असू फुलवता फुलवता नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करतात.
या पुस्तकाचा नेमकेपणाने परिचय करून देताना,महनिय व्यक्तिंनी या पुस्तकाची खासियत अभिप्रायात दिलेली आहे.अगदी आदरणीय कथाकार व.पु.काळे यांचे ‘वर्पुझा’पुस्तक कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात केली तर आपण मंत्रमुग्ध होतो.त्यासारखेच ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’हे पुस्तक आहे. तुम्हाला एखाद्या आवडीच्या विषयात रस असेल तर तुम्ही प्रथम ते वाचू शकता.
खरंतर हे पुस्तक ‘अक्षयपात्रासारखं’ आहे. ते कधीच संपत नाही.तुम्ही पुनः पुन्हा हे पुस्तक वाचाल.समस्येची उकल करायला. एखादा संदर्भ घ्यायला किंवा मार्गदर्शन मिळवायला तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचू शकता.यातील कथा दृढिकरण करणाऱ्या आहेत.आपण यातील कथा वाचन करून आपल्या मित्रांना सांगू शकता.
शेकडो किशोरवयीन व प्रौढ लोकांसमवेत
काम करुन त्या सर्वांचा आनंद द्विगुणित करुन, जवळपास दोन वर्षे या पुस्तकाचे लेखन, संकलन व संपादन केले आहे.
१) नातेसंबंधांविषयी २) मैत्रिबंधांविषयी
३) कुटुंबाविषयी४) प्रेम व दयाळूपणाविषयी ५)शिकण्याविषयी ६) कणखर आणि खंबीर ७)आगळा स्पर्श ८) करून बघा! अश्या आठ पॅटर्नमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केला आहे
आशयाशी समर्पक कृष्णधवल चित्रे
गरजेनुसार रेखाटली आहेत.यातील बहुतांश परिच्छेद,अवतरणे,काव्य आणि कोटेशन्स वाचल्यावर विचारांचे सौंदर्य अधोरेखित करतात.
नातेसंबंध “सगळ्या प्रकारची नाती…. असतात मोठी धरलेल्या वाळूसारखी. मूठ सैलावत हात उघडून धरला तर वाळू राहते जिथल्या तिथं. मात्र ज्या क्षणी तुम्ही मूठ मिटून वाळू धरून ठेवण्यासाठी पकड घट्ट करता, त्या क्षणी वाळू बोटांच्या फटीतून निसटू लागते. त्यातली जराशी जरी वाळू मुठीत उरेलही.पण बरीचशी निष्सटूनच जाते. नाते अशीच असतात.ती सैल सोडा,दुसऱ्या व्यक्तींचा आदर व स्वातंत्र्य राखा. मग ती अबाधित राहतील …जशीच्या तशी! पण ती जास्त घट्ट पकडायला जाल, स्वामित्वभावनेनं,तर ती निसटून जातील आणि कायमची संपतील.
–कलील जॅमिसन, ‘द निबर थिअरी’
मैत्रिबंध काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि झटकन निघूनही जातात.काहीजण थोडा काळ राहतात आणि आपल्या काळजावर पाऊलखुणा ठेवून जातात.मग आपणही आहोत तसेच कायम कधीही राहत नाही.--अनामिक
शब्दातला दयाळूपणा आत्मविश्वास निर्माण करतो.विचारांतला दयाळूपणा सखोलता निर्माण करतो.दातृत्वातील दयाळूपणा प्रेम निर्माण करतो.
इतरांना मदत करण्याच्या मोठ्या संधी क्वचितच येतात;पण छोट्या छोट्या संधी तर दररोज आपल्या अवतीभवतीच असतात.
अतिशय सुंदर आणि वाचनीय पुस्तक आहे.खरं तर पालकांना आपल्या मुलामुलींना हे पुस्तक वाचायला उपलब्ध करून दिलं पाहिजे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १४ जुलै २०२५
समर्पक शब्दात आशय मांडणी👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete