पुस्तक परिचय क्रमांक:२३४ महावाक्य समग्र देवदूत
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२३४
पुस्तकाचे नांव-महावाक्य समग्र देवदूत
लेखक: सुधाकर गायधनी
प्रकाशन-कुसुमाई प्रकाशन, तपोवन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -द्वितीय आवृत्ती २८जानेवारी २०२४
पृष्ठे संख्या–६३२
वाड़्मय प्रकार-काव्यग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य-१०००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव:महावाक्य समग्र देवदूत
लेखक: सुधाकर गायधनी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिऱ्हाईक कसं ते फिरकेना…
मग सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गर्दी पेलवता पेलवेना….
याच ओळी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत म्हणून दाखविल्या होत्या.तेव्हा श्रोत्यांची अंतःकरणं हेलावली होती.
लेखक सुधारक गायधनी यांना यशवंतराव चव्हाण यांनी पाठविलेल्या पत्रात त्यांनी उल्लेख केला आहे की, “या काव्यात लोक जीवनाच्या युगायुगाच्या शहाणपणाचे सार आहे’’ लोकप्रिय साहित्यिक सुधाकर गायधनी लिखित, “महावाक्य”समग्र देवदूत या जगातील विविध भाषांमध्ये अनुवादित झालेल्या महाकाव्यातील रचना आहे.सहाशे बत्तीस पृष्ठांचा हा काव्यसंग्रह आहे.यामध्ये लेखकाचे जीवनातील ठळकपणे वैशिष्ट्ये दाखविणारी छायाचित्रे आहेत. अनेक नामवंत देशीपरदेशी विचारवंत साहित्यिकांनी अभिप्रायाची मोहर उठवली आहे.
नेणिवेच्या डोहातली नायिका प्रतिमा कवीला प्रिय वाटत असलीतरी तिच्यासह तिच्या सहप्रतिमांनाही कवी प्रिय वाटायला हवा.महाकवी संत तुकोबाराय म्हणतात की, “तुका म्हणे माझे|शब्द बुडोपरी अर्थ पाण्यावरी|तरंगावा…
कविता म्हणजे नेमकं काय? सर्वमान्य अशी मान्यता एखाद्या व्याख्ये सारखी दिसत नाही.अनेक साहित्यिकांचे अनेक विचार.उत्कट भावानुवाद, लयबध्द शब्द रचना,तर लेखक तथा कवी सुधाकर गायधनी म्हणतात की, “अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्य गर्भ असा उद्गार!तोच कवितेचा सत्त्वबिंदू ठरतो.कविता सहजसाध्य साधना नाही. त्यासाठी चिंतन ऊर्जेचा दाह सहन करावा लागतो.तेंव्हाच त्या अक्षरांच्या चित्रलिपीला प्राणसत्त्वासह अक्षरत्व प्राप्त होते. शब्दांची विटकळं रचून कवितेचे किल्ले बांधता येत नाहीत. सोनं सुंदर आहे असं आपण म्हणत नाही तर आभूषणे सुंदर आहेत असं म्हणतो.
अनेक साहित्यिकांचा काव्याचा दृष्टिकोन त्यांनी प्रारंभीच्या लेखातून अधोरेखित केला आहे.एवढं बाकी खरं,की कवीला आपल्या काव्याचा अभिमान वाटला पाहिजे.आपल्या काव्याला जपलं पाहिजे.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याच्याकडून होणारी कलानिर्मितीसुध्दा समाजमनाची अभिव्यक्ती आसते.
या महावाक्य ग्रंथात पंचसर्ग आहेत. पहिल्या सर्गात मोत्याचा चारा शोधीत भटकणाऱ्या दर्यावर्दी पाखरांनो.दुसऱ्यात गेलो पक्षीवंशा झालो स्वानुभव, तिसऱ्या हे पसायदान नाही वरदान.., चौथ्या मागच्या वेळी मला प्रभू येशू…तर पाचव्यात चला,
नागकेशराच्या विळख्यातून मुक्त व्हा…
अशी काव्यमाला आहे.
एकूण दोन परिशिष्टे असून प्रा.डॉ. प्रल्हाद वडेर यांचा‘मराठीत महाकाव्य जन्मा आले’आणि माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण,माननीय सुशीलकुमार शिंदे,प्रा.शरच्चंद्र मुक्तिबोध, कविवर्य कुसुमाग्रज यांची पत्रे आहेत. नरेंद्र बोडखे यांचा सोने आणि चिंध्या हा लेख सामाजिक जाणीव आणि मूल्य यावर विश्लेषण करणारा आहे.
ग्रंथकर्ते सुधाकर गायधनी यांच्या साहित्य कर्तृत्वाचा महामेरू, गौरवशाली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मान व पुरस्कार,प्रदेश गमन परिचयात आहे.
नखे रोवायलाही टिचभर कुठे नाही दिसली जागा…
म्हणून सारखा वायूमंडळ पोहत गेलो..
प्यायलो नाही कधी अडवल्या झऱ्याचे पाणी…
मेघातल्या आसवांनी तहान भरत आलो…
माणूस असे जगावे की बागेतल्या फुलांचे
कुणी गजरे कुणी हार व्हावे
माणूस असे खल्लास होत जावे
की जसे हळूहळू कुप्पीतले अत्तर उडावे
साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या अक्षरयात्रींनी,वाचकरसिकांनी रसग्रहण करावा असा मराठी साहित्यविश्वातील मानदंड आहे…अप्रतिम, अप्रतिम अन् अप्रतिम…. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’च्या जवळचे मराठीतील पहिले महाकाव्य आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १३जुलै २०२५

Comments
Post a Comment