पुस्तक परिचय क्रमांक:२३२ इल्लम
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२३२
पुस्तकाचे नांव-इल्लम
लेखक: शंकर पाटील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण मे २०१८
पृष्ठे संख्या–९८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: इल्लम
लेखक: शंकर पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक व कथाकथनकार शंकर पाटील.मराठी रसिक वाचक व प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले कथांचे अक्षरयात्री. त्यांचे लेखन हास्यमस्करी करत कधी विचारचक्र सुरू करते.ते रसिकांना हळूच उमगते.सामाजिक जाणीवावर बोट ठेवणारे त्यांचे लेखन.अनेक वाचनीय कथासंग्रहात सारखाच ‘इल्लम’हा कथासंग्रह आहे.त्यांच्या कथांचे बीज खेड्यातील माणसं आणि त्यांची जीवनशैली.वास्तव लेखन अन् लेखनशैली थेट कोल्हापुरी काळजाला भिडणारी.त्यामुळे कथांचे रसग्रहण करताना वाचक मंत्रमुग्ध होतोच.शब्दांच्या मळ्यात पाटीलकी करत,जोमदार आणि सकस कथांचे पीक घेणारे लेखक शंकर पाटील.
‘इल्लम ‘या कथासंग्रहातील कथांतून उलगडणारी ग्रामीण भागातील व्यक्तिचित्रे चिंतन करायला निश्चितच भाग पडतात.सगळ्या गोष्टी झऱ्याप्रमाणे वाहणाऱ्या खेड्यातील.घर,पार, पाणवठे आणि शेतशिवार अन् चावडीत रंगणाऱ्या गप्पा
गोष्टींची आठवण मनी रेंगाळतात जेव्हा आपण रसिकतेने त्यांच्या कथांचा वाचन आस्वाद घेत राहतो.
‘इल्लम’कथासंग्रहात एकूण बारा कथांची मेजवानी त्यांनी मांडली आहे.इल्लम या कथेची ओळख करुन देणारं अन् नजरेत भरणारं मुखपृष्ठ तर मलपृष्ठावरील ब्लर्ब त्याचं कथेतील परिच्छेद कथेचा आशय आणि विचार अधोरेखित करतो.
संपतराव मोहिते यांनी काबाडकष्ट करून कोरडवाहू जमीनीवर फळबाग फुलवून जोडीला कुक्कुट पालन,हातमाग कारखाना अन् पशुपालन करुन रग्गड पैसा मिळवलेला असतो.घर बंगला गाड्या दिमतीला असतात.पत्नी सांगण्यावरुन सगळं चांगलं झालंय.आता जरा जीवाला आराम घ्या.जगाची सफर करा.हे मनात घेऊन कौटुंबिक सहली काढतात.त्यामुळे त्यांना मित्र भेटतात.. चर्चा गप्पा सतत सुरू असतात.आपण भरपूर कमवले. पण सगळीकडे आपलं नाव झालं पाहिजे. यासाठी काय करावे.याचा उलगडा करणारी ‘इल्लम’कथा.
सर्जेराव,आप्पासाहेब आणि रावसाहेब हे जिवलग
मित्र बैलांच्या जंगी टकरी बघायला म्हणून इस्लामपूरला जायचं ठरवितात.मग मुक्कामाला आजच ताईकडे जायचं ठरवून ते जातात.तर तिथं
व्यसनी मेहुण्याच्या तक्रारी ऐकाव्या लागतात.अन् तुमच्या बहीणीला माहेराला घेऊन जायला सांगतात.ती ‘मुराळी’कथा.
रामूला तीन लाखांची लॉटरी लागते.मग काय?गावकरी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढतात. भाऊबंद आईवडील एकत्र येतात.सगळे कौतुक करतात.आई त्याला म्हणते, “आता तिघींनी चांगले गळाभर दागिने कर.”यावर रामूच्या पत्नीला राग येतो.रात्री ती त्याला बजावते. “ह्या लॉटरी तिकीटातील एकही पैसा मी कुणालाही देऊ देणार नाही.नाहीतर मी जाळून घेईन.”असा दम मारते. त्यामुळे त्याचा कोंडमारा होतो .जपलेले नातेसंबंध तुटायला लागलेत.कुणालाही तोंड नदाखवता निघून जावे असे त्याला वाटते. पुन्हा ती म्हणते, “ ते तिकीट मला द्या माझं दोन भाऊ आणि मी पैसे आणायला उद्या जाते.”मग त्याचे टाळकं सटकतं. संताप आल्याने तो तडक परड्यात जाऊन तिकीट दोन्ही हातात धरून टारकण फाडून टाकतो.ती कहाणी ‘लॉट्री’.
‘आयडिया पाहिजे’ही नवनिर्मितीची कथा इतरांना मदतगारी करणाऱ्या दिलदार भूपाल जरगेची कथा.भरपुर शिकायची इच्छा असताना गावातल्या शाळेत कसातरी शिकला.शिक्षणासाठी तो कोल्हापूरला गेला पण तिथं ओळखीच्या नात्याने कोणी नसल्याने पुढं शिकता आले नाही.पण त्याची कल्पनाशक्ती अफाट होती.कळतं झाल्यापासून कसलही मशीन हातात आलं की ते खोलायच आणि पुन्हा जोडायचे ही सवयच जडली.मग त्याने घरातच रिपेअरिंग करायचे जनरल वर्क्स यांच्या भिडस्त स्वभावाने तोटाच होऊ लागला मग त्याने दुरुस्तीची किंमत लेखी बीलाने देऊ लागला.चार पैसे मिळू लागले पण त्यांच्यात घराची गुजराण होईना म्हणून वडिलांनी शेतात भांगलायला जा.याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील.याचा त्याला राग आल्यावर तो काहीतरी करून दाखवण्याचा इराद्याने गाव सोडायचं पक्कं करतो.लवकर तो सुदिन उगवतो. जयसिंगपूरचे अडत व्यापारी श्रीमंधर मगदूम गावात नातेवाईकाला भेटायला गावात आलेले असतात.भूपाल व त्यांची
गाठ पडते.ते नातेवाईकच भूपालचा विषय निघाल्यावर त्यांच्या हुशारीची तारीफ करतात.मग त्याला येता का जयसिंगपूरला? म्हणून विचारतात.मग पत्ता देऊन एक आठवड्यानंतर या म्हणून सांगतात.मोठ्या व्यापारी पेठेत तो व्यवसायाचे गुपित शिकून घेतो.अन् इतरांकडे नसणाऱ्या जर्दाची निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू करतो.आणि जमा बसल्यावर आईवडिलांना इकडे आणायला गाडी पाठवितो…ही आयड्याची कल्पना कथा.
प्रामाणिकपणे कष्ट करून शिक्षण घेऊन शिक्षक झालेल्या शेलार गुरुजींची कथा.गुरुजींनी शाळेत चमकदार कामगिरी केली. तसेच त्यांनी महपुरुषांची चरित्रे लिहिली.पण कोणत्याही प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशित करण्यास नकारघंटा वाजवली.मग पदरमोड करून गुरुजींनी स्वता:च छापली. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिफारस केल्यामुळे पुस्तकांची विक्री जोरदार झाली.भांडवलही मिळून दीडपट फायदा.या त्यांच्या पुस्तक लेखनामुळे एका नामांकित प्रकाशकाकडून उत्तम संधी प्राप्त झाली.शिक्षकाच्या पगारापेक्षा जास्तीची धनप्राप्ती.ती कहाणी म्हणजे ‘अघटित’.
बी.ए.एम.एस.डॉक्टर मिठारी यांच्या दवाखान्याचा बोलबाला वाढलेला असतो.त्यामुळे दोन वर्षांत त्यांचे बस्तान बसते.त्यांचा चाहतावर्ग वाढतो. मास्तर, भरमाप्पा यांची बैठकच दवाखान्यात असायची.एके दिवशी त्याच परिसरातील जागा उच्चशिक्षित डॉक्टर खरेदी करून तिथं एका वर्षाने नवीन हॉस्पिटल सुरू करतात.आता आपल्यावर गंडांतर येणार पेशंट सगळे तिकडे जाणार असं मिठारी डॉक्टरला वाटते.मग त्यांची ही मित्रमंडळी नव्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटला वेगळंच सांगून फितवतात.त्यामुळे कालांतरानं हॉस्पिटल बंद पडते.अन् ते हॉटेल विसावा होते.अशी इरसाल कथा ‘गदा’.
चार मित्रांच्यात लागलेल्या पैजेची कथा कैफ मध्ये अतिशय सुंदर शब्दात रेखाटली आहे. त्यांच्यातील तिघेजण कधीतरी मद्यपान करणारे असतात तर एकटा रुद्रगोंडा पाटील दारु अजिबात पित नसतो.त्याने आज पियावी यासाठी त्याच्या प्रत्येक पेजला सोबत पैसे देण्याचे ठरवितात.पण तो बाधत नाही.तो म्हणतो तुम्ही पिला की मला न पिण्याची कैफ चढते.
तुकाराम आंबी दररोज पंचगंगा नदीवर नाव चालवायचा त्यावेळी प्रवास करणाऱ्या माणसांकडून सुखदुःखाच्या गोष्टी कळायच्या.तो एखाद्याच्या दु:खी घटनेने अस्वस्थ व्हायचा.त्याची नावाडी कथा भावस्पर्शी आहे.कारण त्याच्या मुलीला घेऊन मास्तर पळून गेला.ही घटना त्याच्या मनाला खटकते.तो आभाळाकडे बघत म्हणतो, “मी आजवर नदीतले भोवरे चुकवत सगळ्यांना सुखरूप पल्याड आल्याड न्हेलं.अन् तू मला भोवऱ्यात लोटलसं.
मंडळे अण्णांच्या आयडिया,त्यांची शक्कल लढवून जिंकून दाखवयाची न्यारी तऱ्हा ‘सुपीक डोकं ‘या गोष्टीत छानच खुलवलीय.
चन्नाप्पा पत्नीच्या मागणीवरून मेहुण्याला शेत खरेदीला उसने पैसे देतात.त्याबद्दली तो त्यांना शेतातली पिकलेलं धनधान्य द्यायचं असते.पण सहा महिने झालं तरी तो पत्रही पाठवत नाही अन् धान्य घेऊन येत नाही म्हणून नवराबायकोत दुरावा होतो.बोलणं कमी होत.मग चन्नाप्पाची पत्नी नेमकं काय झालंय हे बघायला भावाकडे येते.अन् बाहेरच त्याचा
पाणउतारा करते.मग सगळी घडलेली हकीकत बहिणीला कळल्यावर ती शांत होते.ती कथा ‘इख’.
वडिलांच्या आठवणींची गोष्ट म्हणजे अप्पा अतिशय इत्यंभूत वर्णन केले आहे. लहाणपनीच पित्याचे छत्र हरपले होते. त्यांच्या आठवणी आणि मृत्यूचा प्रसंग भावस्पर्शी शब्दांकनात ‘अप्पा’ या कथेत मांडला आहे.
अतिशय भावूक आणि करुणादायक प्रसंग मालिकेने रेखाटलेली वास्तव कथालेखकाच्या अक्का नावाच्या धाकट्या आईचीच कथा. लग्नानंतर ती अनेकदा आजारी पडते.जणूकाही सगळ्या आजारांवर जीवन तिची असावं.असं भावाची भावना व्हायची.परमेश्वराने सगळी दुःख तिच्याच वाट्याला का घातली असं आक्काची आठवण मनी आली का वाटायचं.सासरची परिस्थिती सधन नसल्याने प्रत्येक आजारपणं तीची माहेरातच करावी.कित्येक आजारांवर तिने कशी मात केली.हे वाचताना मन हळहळते.इतकं मर्मभेदी लेखन “चंदूरची अक्का”या समारोपाच्या लेखात मांडली आहे.
अप्रतिम कथांनी मेजवानी इल्लम कथासंग्रहात आहे…
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ११जुलै २०२५
Comments
Post a Comment