पुस्तक परिचय क्रमांक :२८१ वारी एक आनंदयात्रा







वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८१
पुस्तकाचे नांव-वारी एक आनंदयात्रा 
लेखक: संदेश भंडारे 
प्रकाशन-मनोविकास प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१८
तृतीयावृत्ती
पृष्ठे संख्या–१५६
वाड़्मय प्रकार-छायाचित्र मालिका
किंमत /स्वागत मूल्य-५५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८१ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -वारी एक आनंदयात्रा 
लेखक: संदेश भंडारे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
       पंढरीच्या वारीची छायाचित्र दर्शनकथा
 वारकऱ्यांची भजन-कीर्तनाची मांदियाळी अन् मुखाने ‘माऊली’नामाचा जयघोष, टाळचिपळ्याची संगत अन् मृदंगाच्या ठेक्यावर पताकांचे झेंडे नाचवत अन् तुळशीवृंदावन डोईवर घेत पाउले चालतात देहु-आळंदी ते पंढरपूरी…. वारकऱ्यांची पायवारी…..अफाट जनसमुदाय लोटतो.
‘वारी एक आनंदयात्रा’या छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले आहे;प्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी.

 छाया-प्रकाशाच्या लिपीने मानवी स्थिती-गतीची, अवस्थांची अभिव्यक्ती करणारे छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.पुणेरी ब्राह्मण, देवळी-कोनाडे, कुस्तीचा आखाडा, बहुरुपी, तमाशा,वारी आणि महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे जीवन यासारखे सामाजिक व सांस्कृतिक विषय छायाचित्र मालिकेतून प्रसिद्ध केले आहेत.
सामान्य माणसाच्या दृष्टीला न दिसणारे माणसांचे पैलू फोटोग्राफर भंडारे यांनी आपल्या छायाचित्रात प्रदर्शित केले आहेत.ती सगळी छायाचित्रे बोलकी असून 
वारीच्या प्रवासातील ठळक घटना प्रसंग अधोरेखित करतात.‘वारी एक आनंदयात्रा’या पुस्तकाला पद्मश्री डॉ.विखे पाटील साहित्य पुरस्काराचे कोंदण २००९साली लाभले आहे.तसेच या पुस्तकाचा अनुवाद इंग्रजी व फ्रेंच भाषेत झाला असून कानडी कोंकणी व तमिळ भाषेत अनुवाद होत आहे.
 छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी प्रत्यक्ष देहू ते पंढरपूर वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, वारीच्या परंपरेच्या साहित्याचा अभ्यास करून,‘एक संवेदनशील छायाचित्रकार आणि निरीक्षक’या नात्याने प्रत्यक्ष अनुभूती घेऊन;त्याचा परिपाक चित्रलिपीतून मांडला आहे.हा केवळ चित्रांचा अल्बम नसून पंढरीच्या वारीची 
आनंदयात्रा कॅमेऱ्यातून क्लिक केली आहे.
वारीत आबालवृद्ध,लहानथोर, उच्चशिक्षित ते निरक्षर एकोप्याने प्रवास व सहभोजन करतात. परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समस्त वारकऱ्यांचे आध्यात्मिक गुरू आहेत.कर्म,ज्ञान,भक्तीच्या मार्गावर सुखसमाधानाने ईश्वरभक्तीत वारकरी तल्लीन होऊन रमतात.भजन कीर्तन प्रवचन श्रवण करतात,फेर धरून नाचतात हरिपाठ करतात आणि वाटेवरच्या रिंगणात सहभागी होतात. वारीचा आनंद अनुभवायला हातात घेऊन पाने उलगडायला नकळत सुरुवात होते.इतकं
 देखणं आणि चित्ताकर्षक मुखपृष्ठ आहे.तर मलपृष्ठावरील ब्लर्ब आणि चित्र रक्ताच्या नात्यापेक्षा वारीतलं आपलेपणाचं माणुसकीची नातं जपणारं आहे.
  संत साहित्याचे अभ्यासक व पुणे विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.सदानंद मोरे यांची ‘वारी एक आनंदयात्रा' या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दांत या पुस्तकाचा आशय शब्दबध्द केला आहे.नव्या युगात परंपरा नव्या रुपात अवतरली आहे.अनुभवाच्या माध्यमातून वारीची फोटोस्टोरी सादर केली आहे. वारीतील आनंद,आत्मिक समाधान आणि कृतार्थता प्रथम नजरेने टिपून मग प्रकाशाच्या ॲगलने स्थिर करून कॅमेऱ्याच्या रेंजने क्लिक केली अन् या पुस्तकातून आपल्याला दाखविली आहे.
 ‘पांडुरंगाच्या दर्शनाने वारकरी धन्य होतो आणि वर्षभरासाठी जीवनात एक नवचैतन्य घेऊनच परततो.’अशी वारीची फलश्रुती नेमकेपणाने सांगितली आहे.असे प्रस्तावनेत आवर्जून डॉ.सदानंद मोरे यांनी उल्लेख केला आहे.
  छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी ‘निवेदनपर’लेखात वारीच्या इतिहासाची, परंपरेची वाटचाल,पालखी सोहळा, दिंड्यांचा दिनक्रम,समाज आरती,रिंगण अन् वारकऱ्यांची पायवारीचे वर्णन अतिशय अभ्यासपूर्ण शब्दात व्यक्त केले आहे. ‘विष्णुमय जग |वैष्णवांचा धर्म|भेदाभेद भ्रम|अमंगळ|’ही वारकरी संप्रदायाची भावना आहे.आजही सगळे वारकरी एकमेकांना ‘माऊली’म्हणतात. जात,धर्म याचा विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या पायावर नतमस्तक होतात.
लेखाच्या शेवटी संदर्भित पुस्तकांची यादी दिली आहे.
पंढरीच्या वारीची अप्रतिम छायाचित्रे आहेत.वाचक रसिकांचा आनंद द्विगुणित करणारी चित्रमाला….. ज्ञानेश्वर माऊली,ग्यानबा तुकाराम…

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २९ मे २०२६






Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे