पुस्तक परिचय क्रमांक:२८० वंगचित्रे




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८०
पुस्तकाचे नांव-वंगचित्रे
लेखक: पु.ल. देशपांडे 
प्रकाशन-साकेत प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१३
दहावी
पृष्ठे संख्या–२२४
वाड़्मय प्रकार-ललित व्यक्तिचित्रं 
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८० ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -वंगचित्रे
लेखक: पु. ल. देशपांडे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील बहुआयामी लाडके व आदरणीय व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या निरीक्षणातून, ऐकून आणि प्रत्यक्ष भेटीतून पाहिलेल्या बंगाल राज्यात बंगाली भाषा शिकायला तीन महिने गेले होते.तेंव्हा पाहिलेली शहरे, शांतिनिकेतन प्रवासात पाहिलेल्या व भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि समाजातील प्रवृत्तींचे वर्णन मार्मिकपणे हलक्याफुलक्या शैलीत लेखकांनी केले आहे.वाचताना हास्याचे लकेर उमटतेच.इतकं समर्पक शब्दचित्रण लेखणीतून साकारलेले आहे.प्रत्यक्ष वंग प्रांताची घरबसल्या भटकंती करायला लावणारं लेखन आहे.

भाषा शिकायची असेल तर ती जिथं आतून उमटते अशा ठिकाणी जाणेच श्रेयस्कर असते.माणसाला कसली ओढ केव्हा अस्वस्थ करील हे सांगणे अशक्य आहे. भाषा पुस्तकातून शिकता येत नाही.त्या भाषेचे शब्द, उच्चार त्यांचे साहचर्य,रसरुपगंध निर्माण करण्याची शक्ती ही जिथे ती भाषा जिवंत पिंडातून उमटत असते तिथं जाऊन ऐकणे आवश्यक आहे.जसं ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी तसेच भाषा देखील अशीच अनुभवावी.
वंगप्रांतातील वर्धमान शहरात फेरफटका मारताना त्यांनी मुर्तीच्या कारखान्यात सरस्वतीची मुर्ती घडत असताना पाहिल्यावर ते म्हणतात की,“ज्ञानाधिष्ठित संस्कृतीची देवता सरस्वती.शुभ्रता म्हणजे रंगांचा अभाव नव्हे.सर्व रंगांचे मिलन होय. सप्तसुरांचा आणि सप्तरंगांचा जिथे आदर होतो तिथेच मानवी संस्कृती फुलते.”
बंगाली भाषेचे गुणगान करताना आदरणीय जेष्ठ  साहित्यिक पु.ल.म्हणतात की, “स्त्रिया बोलायला लागल्या की शब्दांचा फुलसडा पडल्यासारखे वाटते.बंगालमध्ये देवापेक्षा देवीचे माहात्म्य मोठे आहे.बंगाली वाड्मयही नायिकाप्रधान.रवींद्रनाथांची नाटके आणि शरदबाबुंच्या कादंबऱ्याही नायिकाप्रधान.” गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन आश्रमाच्या भिंती उभ्या करताना अनेक वादळवाऱ्यांना तोंड दिले आहे.
‘वंगचित्रे’ हे पुस्तक  पु.ल.देशपांडे यांनी एकोणीसशे सत्तरच्या जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांतल्या बंगालातल्या वास्तव्याचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून शब्दबध्द केले आहे.बंगाली लोक,त्यांची भाषा आणि साहित्य याची ओळख करून घ्यायला ते गेले होते. जगप्रसिध्द बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतन आणि श्रीनिकेतन आश्रमात त्यांचे वास्तव्य होते.तिथं ते बंगाली भाषा शिकताना त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात केले आहे. दौत आणि औत या दोन शब्दांची महती अभ्यासायची असेलतर याच पुस्तकात समजून घेता येते.बिनभिंतीच्या शांतीनिकेतनमध्ये छात्रछात्री ज्ञान कसं मिळवतात.याचं सुंदर विश्लेषण विवेचन उदाहरणे आणि दाखले देऊन केलेलं आहे. 
  पु.लं.देशपांडे यांच्या बहारदार लेखणीतून साकारलेले हे पुस्तक म्हणजे वर्णनात्मक लेखांची रसभरीत मेजवानी आहे.आपण त्यांचे लेखन वाचताना खरोखरीच मंत्रमुग्ध होऊन जातो.तिथं अनुभवलेल्या गोष्टी ते महाराष्ट्राशी तुलना करत त्यांचे विश्लेषण केले आहे. फरक स्पष्टपणे मांडला आहे तर काही गोष्टींचे कौतुक केले आहे.जसं पाहिलं तसंच मांडलं आहे.
  पु.लं.नी ही ‘वंगचित्रे’ खुमासदार शैलीत अन् चरचरीत फोडणीच्या शब्दासारखी बंगाली भाषा अवगत करताना त्या भाषेचे अलंकारिक सौंदर्य धुळाक्षरापासून ते  लयबध्द बोलीभाषेतील कितीतरी शब्दांचे मराठीशी असलेला एकजिनसी अथवा विरोधाभास वाचताना अतिशय गंमत वाटते.शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा आत्मसात करताना आलेल्या वास्तव अनुभवांचा लेखाजोखा आलेखासारखा, त्यांनी अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन आश्रमात कलाविष्कार सादर करणारी अलौकिक व्यक्तिमत्वांची रोपटी आणून लावली आहेत.आज त्यांचे कितीतरी वटवृक्ष कल्पवृक्ष झाले आहेत. काही नष्ट झाले असतील पण जे काही आहेत त्यांच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते असे पु.ल.म्हणतात.सेवा त्याग समर्पण करत नवनव्या प्रयोगांची अन् नवनिर्मिती करण्याची जणू त्यांना धुंदी! शब्द,सूर आणि रेषा ही इथली उपास्यत्रयी. कलाभुवनाचा टुमदार रंगमंच.समूहगान व समूहनृत्य ही मानसाची पुर्वीपासूनची गरज आहे . पोरासोरापासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांना ठेका धरायला लावणारी असंख्य गाणी चालीसकट रवींद्रनाथांनी दिली आहेत. शाळेच्या पाठात खरंतरं या गीतांचे बीजारोपण केले आहे.तेही आपल्या अवतीभवतीच्या परिसराचे आणि दैनंदिन जीवनातील घटनांचे लेखन सहजपणे केले आहे. बालवाचनमाला कशा असाव्यात हे शांतीनिकेतनमध्येच जाणून घ्यावे.सगळ्या धड्यांमधून मुलांना घराच्या चार भिंती बाहेर नेऊन हिंडवलेले.मुलांपुढे एक एक धडा एक एक चित्र घेऊन येणारा असतो.
अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दांत आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आणि बंगाली भाषा अन् साहित्याचा मापदंड लिहिलेला आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २० एप्रिल २०२६



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे