पुस्तक परिचय क्रमांक:२७९ समासातल्या नोंदी




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२७९
पुस्तकाचे नांव-समासातल्या नोंदी
लेखक:प्रा.कुंडलिक कदम
प्रकाशन-परिस पब्लिकेशन सासवड ता पुरंदर जि.पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६,प्रथम आवृत्ती 
पृष्ठे संख्या–१५२
वाड़्मय प्रकार-ललित लेख
किंमत /स्वागत मूल्य-३५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२७९||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -समासातल्या नोंदी
लेखक: प्रा.कुंडलिक कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   दोन पिढ्यांतील वैचारिक अधिष्ठान वैचारिक लेखांतून गुंफणारे लेखक प्रा कुंडलिक कदम यांचे तिसरे अक्षरधन ‘समासातल्या नोंदी’.बालपणाच्या साठवणीतील आठवणी जाग्या करणारे लेख वैचारिक मंथन करायलाही भाग पाडतात.इतकं सकस आणि सहज सोप्या शब्दात त्यांनी आपल्या सहवासातील व्यक्तींच्या अंतरंगाची ओळख करुन देताना त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करून देतात.
लेखक तथा प्राध्यापक कदम सरांचा गोतावळा मोठा आहे.माणसं पारखून त्यांच्यावर लेखन करण्याची कला ही सहजसाध्य नाही.यासाठीआशयाच्या  निरीक्षणाचे अवकाश विस्तीर्ण करुन, पाहिलेल्या घटनेवर चिंतनमंथन करून विचारांचे सौंदर्य समर्पक शब्दात मांडले आहे.त्यामुळे या कथांचा आस्वाद घेताना वाचकांनाही त्यांचा गाव,बालपण,मित्र, गावातली सार्वजनिक ठिकाणं, शेतशिवार आणि गावातल्या हरहुन्नरी लोकांची आठवण येतेच.
   आकर्षक आणि देखणं मुखपृष्ठ आपल्याला कथा वाचायला उतावीळ करतं.तर मलपृष्ठावर लेखातील वैचारिक संदेश पेरणारी अवतरणे आपणास पुस्तकातील लेखमालिकेचा आशय पटवून देतात.
  वाचन साखळी समूहातील ‘वाचन श्री’ पुरस्कार विजेते माझे सन्मित्र प्रा.कुंडलिक कदम सर तथा लेखका प्रत्यक्ष माझ्या
घरी येऊन भेट दिलेलं पुस्तक म्हणजे माझ्या वाचनालयाचे संवर्धन करण्यासाठी अनमोल ठेवा आहे.व्याकरणातल्या शब्दांचा अर्थापुरता ‘समासातल्या नोंदी’ अर्थ अभिनंदन नसून यातील लेख म्हणजे माया, ममता,प्रेम,सहकार्य,मित्रत्व दातृत्व,गावचं गावपण, गावच्या प्रथा परंपरा आणि माणुसकीचं सिंचन कसं करावं याचा वस्तुपाठ आखून देणारे चव्वेचाळीस लेख. हे पुस्तक म्हणजे गावच्या समाजाची सांस्कृतिक विचारांची शिदोरी आहे. लघुकथारुपाने लेखकांनी वाचक रसिकांना आनंद द्विगुणित करायला शब्दबध्द केली आहे.यामध्ये संवाद आहे.कथा आहे.गोष्ट आहे.वर्णन आहे .तर उत्तरार्धात वैचारिक लेखाजोखा मांडला आहे.लेखांमध्ये वस्तुंच्या दर्शनी भागापेक्षा त्या पाठीमागील भावभावनांचा संदेश समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.ही यातील लेखांची खासियत आहे.प्रथा परंपरा श्रध्देने जपताना पुरोगामित्व स्विकारण्याची खरी गरज आहे.हे पटवून देण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो.
प्रत्येक लेख म्हणजे एक स्वतंत्र विचार जो बालपण आपण काय केलं आणि सद्याची मुलं काय करतात?याची वास्तव ओळख करून देतात. आपणास मंथन करायला लावतात.इतकं सुंदर लेखन केले आहे.  यातील बहुतांशी लेख दैनिक सकाळच्या पुरवणीत आणि आभासी पटलावरील फेसबुक व व्हाटसअप समूहावर प्रसिद्ध झालेले आहेत.त्यामुळे प्रशंसा आणि कौतुकाची किनार या ललित लेखांना लाभलेली आहे.
लेखन समृद्ध करणाऱ्या लपतळवाडी गावाला आणि गावच्या मातीला हे अक्षर साहित्य अर्पण केले आहे. मनोगतात लेखन प्रा.कदम सरांचा साहित्यिक प्रवास आणि अक्षर साहित्य निर्मितीतील ज्ञात अज्ञात व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संस्काराची पखरण करणारे सर्व लेख आहेत.प्रत्येक लेखातून नवविचार आणि व्यक्तिच्या स्वभावाचे पैलू उलगडणारे लेख.वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित करत मनाला कुंपण घालून जीवन जगण्याचा संदेश देणारे गुरुजी.बहीणभावाचे अतुट नातं जपणारा ‘दोन रुपये’मधील रमेश. मातेच्या हाताच्या दुखण्यावर मलम लावून मायेची फुंकर घालणारी ‘स्पर्श’मधील मुक्ता.गावच्या प्रथा परंपरांचा एकीचा गावगाडा पटवून देणारे‘वनभोजन’.
अवखळ आणि अल्लड मुलांचा सांभाळ करताना आजीची होणारी दमछाक ‘उपाय’कथेतून स्वानुभव दिसते.‘विचारांची पेरणी’ जून गावचा वतनवारसा आणि माती गावचीनाळ दृढमूल करायला लावणारा नामदेव. आपले कोणतेही महत्वाचे काम पूर्ण करताना मदतीचा हात दिलेल्या लहानथोर व्यक्तींचा मनापासून कृतज्ञतापूर्वक उल्लेख ‘थॅंक यू’डायरीत करणारे पूर्वाचे आजोबा..
  अप्रतिम लेख ‘माणसांची ओळख’माणसं ओळखणं ही एक कला आहे.ती प्रत्येकाला सहजसाध्य होत नाही. यासाठी त्यांचा सहवास लाभून अनुभव घ्यावा लागतो. माणसं सहवासातून, अनुभवातून, विचारातून, वागण्यातून अन् बोलण्यातून ओळखता येतात.माणूस समाजशील प्राणी आहे.त्याला समवयस्क मित्र आणि नातेवाईकांचा सहवास आनंद देतो.धकाधकीच्या जीवनात रिफ्रेश करणारी कथा ‘गेट टुगेदर’.तसेच एक गाव काय करतं याची प्रचिती देणारा ‘माणुसकीचा झरा’अप्रतिम कथा मनाला भावली. ‘जाणीव’कथेतून लेखकांच्या आजीच्या परोपकाराची जाणीव ठेवणारी कथा आपणास संस्कारक्षम वागणं कृतीतून सिद्ध करणारी आहे.
 राधाआज्जी जी कुणालाही एक अंडे सुध्दा फुकटात देत नाही.पण मोलमजुरी करणारी शेवंता संसाराला हातभार लावण्यासाठी नवीन काहीतरी करतेय म्हणून मोफत अंडी देऊन मदतीचा हात देतेय.ती ‘अंडी’कथा माणुसकीची जाणीव करून देणारी आहे.
  गावच्या मातीतील गोष्टींची आठवण करून देणाऱ्या अप्रतिम ‘समासातल्या नोंदी'या पुस्तकात ललित लेख अतिशय वाचनीय आहेत.वाचक रसिकांना या पुस्तकाचे रसग्रहण करायला आवडेल असे मला वाटते.तसेच लेखक तथा प्राध्यापक कुंडलिक कदम सर आपल्या लेखणीस त्रिवार वंदन…..
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई 
सातारा 
लेखन दिनांक- १६ मे २०२६


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे